सवतसडा धबधबा खुणावतोय पर्यटकांना   लॉकडाऊनमुळे सवतसडा येथे सन्नाटा


चिपळूण /लोकनिर्माण  (संतोष कुळे)
पावसाळ्यात निसर्ग हिरवा शालू नेसल्याचे विलोभनीय दृष्य सध्या दिसत आहे. सर्व नदी नाले आणि धबधबे ओसंडून वाहत आहेत. मात्र,कोरोनामुळे लॉक डाऊन केले असल्याने सध्या पर्यटक धबधब्यांकडे फिरकत नाहीत. अशीच स्थिती मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण पेढे परशुराम येथे असलेल्या सवतसडा धबधब्याची झाली आहे. दरवर्षी गर्दीने फुलून जाणाऱ्या सवतसडावर यंदा मात्र भीषण शांतता दिसत आहे. 
       पावसाळ्यात जुलै आणि  ऑगस्ट महिन्यात सर्वच धबधबे ओसंडून वाहत असतात. धबधब्यावरून फेसळणारे पाणी पडताना पाहून त्या पाण्यात भिजण्याचा मोह सर्वानाच होतो.  निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यामध्ये विलोभणीय दृष्य पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. त्यात धबधबे म्हणजे पर्यटकांसाठी खास आनंदाची पर्वणीच असते. तरुणीचे आकर्षण जास्त या धबधब्यांकडे असते. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण पेढे परशुराम येथे सवतसडा धबधबा तरुणाईचे खास आनंद घेण्याचे ठिकाण आहे. दरवर्षी या धबधब्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पर्यटकांची गर्दी असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने धबधब्यात भिजण्याचा आनंद तरुणाईला घेता येत नाही. त्यामुळे सवतसडा हे ठिकाण सध्या सुनसान बनले आहे. धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याला पर्यटकांची ओढ लागली आहे. जेव्हा या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक येतात, तेव्हा दोन महिने छोट्या व्यावसायिकांचा धंदा ही होत असतो. विशेषता या ठिकाणी मका कणीस  आणि वडापाव चहा विकणारे मोठया प्रमाणात असतात. त्यांचेही नुकसान झाले आहे.  आज लॉकडाऊनमुळे सवतसडा धबधब्यावर जाण्यास बंदी असल्याने इकडे कोणीच फिरकत नाही.   कोरोनामुळे  नागरिकांना  आनंद घेता येत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र, यावर्षी सवतसडा पर्यटकांची प्रतिक्षा करीत आहे.