मी जात सोडली............. -देवेंद्र भुजबळ, मा. माहिती संचालक, महाराष्ट्र शासन

                                                    


     मी जात सोडली.होय, आपण बरोबरच वाचलं आणि वाचत आहात. मी जात सोडली.अर्थात आम्ही आमच्या जातीला जात न म्हणता समाज म्हणत असतो. इथं मात्र मी समाज न म्हणता जातच म्हणणार आहे.  आता हे वाचल्याबरोबर ,आपल्या मनात लगेच प्रश्न निर्माण होईल,तो म्हणजे मी कुठच्या जातीचा आहे म्हणून !  पण आता मी हे आपणास  सांगणार नाही. कारण एकदा "मी जात सोडली" हे जाहीरपणे जाहीर केल्यावर जातीचं नावसुध्दा काढणं बरोबर नाही. खरं म्हणजे , मी जात पात मानत नाही, असे  म्हणत कळत नकळत आयुष्य भर जात मानत आलो . काही वेळा , सरकारच्या नियमांमुळेही जात मानावी लागल्यामुळे ती मानली .आपल्या मनावर जातीचा इतका पगडा कसा बरं राहतो ?  माझ्या आजीनं,वडिलांनी,आईनं,सर्व भावांनी जो पंथ स्वीकारला होता, ज्याचा उपदेश मला माझ्या वयाच्या आठव्या वर्षी देण्यात आला होता, त्या पंथाच्या प्रवर्तकाने समाजाला जात पात न पाळण्याचा ,स्त्री पुरुष समानतेचा  संदेश दिला होता. हे आम्ही अभिमानाने सांगत आलो . पण प्रत्यक्षात  मात्र  त्या उपदेशांचं पालन काही करत आलो नाही. मी खरं म्हणजे ते उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणायला हवे  होते. पण कर्म कांड करण्यातच मशगुल राहिलो.                 


          मी ज्या भागातून आलेलो होतो,त्या भागात जात न पाळण्याची चळवळ सुरू झाली होती. त्या चळवळीनुसार शाळेत नाव घालताना अर्जात  जात या  रकान्यात "अजात" असं लिहिण्यात येऊ लागलं होतं. असं करूनही जाती व्यवस्था नष्ट तर झाली नाहीच , पण काही वर्षांपूर्वी अजात असणाऱ्यानीच आपल्याला  इतर मागासवर्गीय  समजावं,म्हणून शासनाकडे मागणी केली होती.आता काय परिस्थिती आहे, कोणास ठाऊक. तर माझं शाळेत नाव घालताना,माझ्या प्रवेश अर्जात कदाचित  "अजात " असंही लिहिल्या गेलं नसावं  इतकंच नव्हे तर जात,धर्म,राष्ट्रीयत्व हे रकानेसुध्दा रिकामेच ठेवल्या गेले असावेत.  हे सर्व माझ्या वयाच्या २५व्या वर्षी लक्षात आलं. नोकरीसाठी अर्ज दाखल करताना एका ठिकाणी माझ्या निदर्शनास या बाबी  आणून देण्यात आल्या.  शोध घेतला असता,पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ सोडल्याचा माझ्या दाखल्यातच हवे ते उल्लेख नव्हते,असं मला दाखवण्यात आलं .  म्हणून मी पुणे विद्यापिठाचं  संबंधित  कार्यालय गाठलं .त्यांनी रेकॉर्ड काढून पाहिला. तर त्यात कॉलेज सोडल्याच्या दाखल्यात ज्या नोंदी होत्या, त्याच घेण्यात आल्याचं त्यांनी  सांगितलं. आता परस्पर काही नोंदी करता येणार नाही, असं सांगून कॉलेजमध्ये जाण्यास सांगितलं . म्हणून जिथून मी पदवी मिळवली होती, ते अहमदनगर कॉलेज मी गाठलं. तिथे आमचे लोकप्रिय अधीक्षक बिपीन सर यांना भेटलो.त्यांनी रेकॉर्ड पाहिला तर मी तिथे एसवायला प्रवेश घेताना, ज्या हडपसर कॉलेजचा दाखला जोडला होता,तो त्यांनी दाखवला. तिथून मग हडपसर कॉलेज,भारती विद्यापीठ करत करत मी दहावी नापास झालेल्या अकोला येथील न्यू इरा स्कुलमध्ये  पोहोचलो. त्यावेळेस फडके सर मुख्याध्यापक होते. त्यांनी क्लार्कला सांगून जुना रेकॉर्ड काढायला लावला. परत तेच आढळून आलं. माझ्या चौथी सोडल्याच्या  दाखल्यातच त्या बाबी नव्हत्या.  चौथी मी नॉर्मल स्कुल मधून पास झालो होतो. तिथे गेल्यावर ,नशिबानं मला शिकवणाऱ्या निंबाळकरबाई मुख्याध्यापक झाल्या होत्या. त्या आम्हा भावंडाना,घराला चांगल्या ओळखत होत्या. त्यांनी सांगितलं त्या प्रमाणे मी तहसीलदाराकडे जाऊन माझी जात,धर्म,राष्ट्रीयत्व यांचा उल्लेख असलेलं ऍफिडीवेट करून घेतलं. अर्जासह ते शाळेत दिलं. त्यानुसार निंबाळकरबाईंनी क्लार्कला सांगून आवश्यक ते सर्व उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला मला दिला ,अर्थात दुय्यम प्रत असे लिहून.यथावकाश जातीच्या नव्हे तर गुणवत्तेच्या आधारावर मला अनेक  सरकारी नोकऱ्या  मिळाल्या. साधक बाधक विचार करून एक नोकरी मी स्वीकारली.  काही  वर्षे लोटली. हे सर्व काही मी विसरून गेलो होतो. पण पुन्हा चौथी सोडल्याचा दाखलाच कामात आला,तो पासपोर्ट काढताना !  माझी पदवी,पदव्युत्तर पदवी,इतर अनेक कोर्सेसची प्रमाणपत्र, सरकारचं  ना हरकत प्रमाणपत्र,असं सर्व काही असताना, माझ्या अर्जासोबत चौथी सोडल्याचाच दाखला जोडावा लागला. मग पासपोर्ट मिळाला. 


            आता तर जात प्रमाणपत्र इतकं आवश्यक होऊन बसलं की शाळेत प्रवेश घ्यायचा असो,सरकारी नोकरी,अन्य काही कायदेशीर बाबींसाठी जात प्रमाणपत्र आवश्यकच  होऊन बसलं आहे . आजही माझे पुतणे,पुतण्या,त्यांची मुलं यांच्यासाठी माझा चौथीचा दाखला आणि जात पडताळणी समितीचं  प्रमाणपत्रच  कामी येतंय.  मी जात पाळत नाही,असं मी समजत होतो. म्हणून लग्नसुध्दा आंतरजातीय करायचं   ठरवलं  होतं . पण अशा काही घटना घडत गेल्या की, जातीतल्याच मुलीशी वाजत गाजत लग्न झालं.  अनेक वर्षांनी माझ्या लक्षात आलं, अरे मीच नाही तर,आपल्या थोर, क्रांतीकारक समजल्या जाणाऱ्या,स्वतःला तसं समजून घेणाऱ्या, चांगली पदं,प्रतिष्ठा मिळविलेल्या सर्वच  तथाकथित  मित्रांनी लग्न करताना आपापल्या जातीतीलच मुली पाहून,पसंत  पडलेल्या मुलीशीच रितिभातीनुसार लग्न केलं आहे.मिच काही एकटा नाहीय!  ही बाब लक्षात आल्यावर माझी अपराधीपणाची भावना थोडी कमी झाली.                                                              


           पुढे  माझ्या पदामुळे मला जातीच्या अनेक कार्यक्रमांना बोलावण्यात येऊ लागलं. आपली जात,हा समग्र समाजाचाच एक  भाग आहे,ईतर समाजातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या व्यक्तीही आपापल्या जातीच्या कार्यक्रमांना जातच असतात,आपण गेलं तर काय हरकत आहे ? असं स्वतःला समजावत मी ही माझ्या जातीच्या कार्यक्रमांना जात राहिलो. जात पाळत आलो.   दरम्यान, जे अधिकारी, कर्मचारी ज्या जातीचे आहेत,  त्या जातीचे  प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून  प्रमाणित करून घेण्याचा शासन आदेश जारी झाला . मला  जातीच्या आधारावर नोकरी,पदोन्नती मिळाली नसल्याने मी असं प्रमाणपत्र का सादर करावं ? अशी भूमिका घेतली. तर आमच्या  संबंधित आस्थापना  अधिकाऱ्याने समजावून सांगितले, सर ,प्रमाणपत्र घेऊन टाका,अन्यथा पुढच्या पदोन्नतीला बाधा येईल ! व्यावहारिक विचार करून मी तसं प्रमाणपत्र मिळवलं . ते कार्यालयास सादर केलं .त्यामुळे खरंच माझ्या पदोन्नतीला बाधा आली नाही. अर्थात माझी पदोन्नती जातीच्या आधारावर मिळाली नव्हतीच म्हणा.पण कदाचित जात पडताळणी प्रमाणपत्र  सादर केलं नसतं तर पदोन्नतीत बाधा येऊही शकली असती !  आता मात्र मी   ठरवलं आहे की,  मी जात  पाळणार नाही. जातीचा राजीनामा देण्याची काही कायदेशीर तरतूद असल्यास माझ्या  माहितीत  नाही. आपल्याला माहिती असल्यास आपण मला ती जरूर सांगावी .त्यानुसार  जात सोडण्याच्या कायदेशीर बाबीचा अवलंब करण्यास मी तयार आहे.  या निवेदनाद्वारे "मी जात सोडली" असं जाहीर करत आहे. काही पावलं म्हणून मी जातीच्या सर्व प्रकारच्या व्हाट्सएप ग्रुपमधून आता लगेच बाहेर पडत आहे. जातीच्या कुठल्याही कार्यक्रमास यापुढे हजर राहणार नाही ,असेही जाहीर करत आहे. यापुढे जातीचा म्हणून मला कुणी कशात सहभागी होण्याची गळ घालू नये. आता बोलाविले तरी मी येणार नाहीच ,ही बाब अलहिदा . असो. अजूनही काही करता येण्यासारखं असल्यास ते मी  करेंनच. आपल्यालाही आणखी  काही सुचत असल्यास कृपया मला अवश्य कळवा.


 


- देवेंद्र भुजबळ,मुंबई.


   +९१ ९८६९४८४८००.