'कर्मवीरांची  शाळा' लेखिका - सुनिता अविनाश नाशिककर, पोलिस उप अधीक्षक,मुंबई.


       शैक्षणिक क्षेत्रातील महर्षी डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते.                  कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील हुपरी या माझ्या गावच्या  रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कुल या शाळेत  मी शिकत असतांनाचा एक प्रसंग सांगत आहे. 
डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांना अण्णा असे संबोधिले जाई, तर  अण्णांच्या  संस्थेत मी शिकत होते.  त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील  योगदानाबद्दल मला  नितांत आदर होता .पुढे तो  दिवसेंदिवस तो वाढत गेला.त्यातूनच अण्णांचे शिष्य बॅरिस्टर पी.जी.पाटील यांनी अण्णांवर लिहिलेला शालेय पुस्तकातील संपूर्ण पाठ मी मुखोद्गगत केला होता.२२ सप्टेंबर या  अण्णा  यांच्या आमच्या शाळेत  वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.सर्व सहभागी स्पर्धकांची भाषणे झाली . आणखी कोणास बोलायचं आहे काय ? म्हणून विचारले असता मी मनाचा हिय्या करून उठले व सर्व पाठ धडाधड बोलून दाखवला. या पाठामध्ये बॅरिस्टर पी.जी.पाटील सरांनी लिहिले होते कि, "एके दिवशी अण्णांच्या वसतिगृहात मी गेलो होतो. रात्री जेवणाची वेळ झाली होती. अण्णांनी मला जेवणाचा आग्रह केला असता वसतिगृहातील जेवण ते कसले असणार ?  म्हणून मी भूक नसल्याने सांगीतले. मध्यरात्रीपर्यंत उपाशी असल्याने झोप येत नव्हती. अण्णांनी ते  ओळखले व वसतिगृहात माझ्यासाठी जेवण मागविले. भाकरी,पिठलं व कांदा हे जेवण मी खाल्ले असता मला ते पंचपक्वाना पेक्षा चांगले वाटले. मी अण्णांना कडकडून मिठी मारली "'  निरागसपणे मी सर्व पाठ म्हणत होते.कौतुक मिश्रित हास्याने सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अर्थातच मला प्रथम क्रमांक मिळाला.         त्या दिवशी आमच्या गावच्या आठवडे बाजारात आमच्या आवडत्या   साळुंखेबाई भेटल्या .माझ्यासोबत असलेल्या माझ्या आईजवळ येऊन  त्यांनी माझ्या भाषणाबद्द्ल खूप कौतुक केले.असो. 
        थोड्याच दिवसात बॅरिस्टर पी.जी.पाटील सर व आदरणीय सुमती पाटील मॅडम  रयत शिक्षण संस्थेच्या मुलांच्या  शाळेत येणार होते .माझ्या शिक्षकांनी मला सदर पाठ हा  बॅरिस्टर पी .जी.पाटील यांनी लिहिलेला असुन मी तो आपणा पुढे तसाच सादर करीत आहे असे म्हणून पुन्हा तेथे मला भाषण करण्यास सांगितले .त्या भाषणास बॅरिस्टर पी.जी.सरांनी व आदरणीय सुमती पाटील मॅडमनीसुध्दा  मनापासून दाद दिली.  कर्मवीरांची शाळा, ध्येयवादी - मुलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देणारे शिक्षक यांच्यामुळेच मी घडत गेले. डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या  ९ मे या  स्मृतीदिनानिमित्त माझ्या आठवणी आपल्याला सांगाव्याशा वाटल्या. आपल्याला आवडल्यास जरूर शेअर करा.                            


       पुनश्च एकदा डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपली रजा घेते.