करोना संशय-कल्लोळामुळे चाकरमानी झाले अस्पृश्य - संदेश जिमन




        एरव्ही एप्रिल-मे महिना आला की हजारो मुंबईकर आपल्या कोकणातील गावी जायला उतावीळ होतात. शिमगा, मे महिना आणि गणेशोत्सव या तीन महत्त्वाच्या काळात गावी जायचं म्हणजे जायचंच. शिवाय अधूनमधून गावी फेरफटका असतोच. सणासुदीला, लग्न, बारसं वगैरे घरगुती समारंभाला, कोणाच्या मयताला-बारावं-तेराव्याला, कधी ग्रामदैवतांच्या जत्रेला, पालखीला, दिवाळीला... कोकणात जाणारा मुंबईकर म्हणजे चाकरमानी. कोकण रेल्वे असो की एसटी बस, खासगी गाडी असो वा ट्रॅवल्सच्या गाड्या, अनेकजण विविध मार्गांनी कोकणात पोहोचतात. मुंबई, ठाणे आणि या महानगरांच्या जवळपासच्या शहरांतून, म्हणजे नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वसई, विरार, पालघर, भिवंडी... कुठूनकुठून चाकरमानी कोकणात, आपल्या जन्मभूमीत, आपल्या गावच्या घरी जायला उत्सुक असतो. त्यासाठी तो तीन-तीन महिने आधीच रांगा लावून किंवा ऑनलाइन तिकिटं काढून ठेवतो. पैशांची तजवीज करून ठेवतो. आपल्या घरच्यांना खायच्या वस्तू, घरी वापरायच्या वस्तू, भेटवस्तू सगळं खरेदी करून ठेवतो. आपलं घर, आपलं गाव, आपले गावकरी आपली आतुरतेने वाट पाहात असतील, ही त्याला खात्री असते.
        यंदाही तशीच खात्री होती. पण, करोनामुळे गाव बदललं. गावचं गावपण स्थानिक आणि स्वयंघोषित पुढार्‍यांनी बळकावलं. बदलून टाकलं. गावाची ओढ लागून कोकणात आपल्या गावी जाणारे आपल्याच गावात परके झाले. आपल्या गावानं आपल्याला अस्पृश्य केल्याचा विदारक अनुभव या चाकरमान्यांना येत आहे. करोना जागतिक महामारीनं ही वेळ आणली आहे. आपलीच माणसं आपल्यापासून दुरावलेली पाहण्याचं दुर्भाग्य मुंबईकर चाकरमान्यांच्या नशिबात आलंय. कुठून झक मारली आणि उलटसुलट प्रवास करून गावी आलो, अन् इथं आपल्याच मातीत आपण परके झालो, अशी खंत त्यांना वाटत आहे. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण? ही मानसिकता नक्की कशी झाली? हा स्वार्थीपणा कसा निर्माण झाला? माणसामाणसात असे भेद कसे निर्माण झाले? खरंच करोना हे एक निमित्त आहे की यापुढे भविष्यात ही माणुसकीच्या भेदाची भिंत कायम राहणार आहे? पुढील महिन्यात पावसाळा आहे, त्यानंतर श्रावणापासून सण सुरू होतील. त्यानंतर सर्वांचा आनंदाचा सण गणेशोत्सव असेल. यावेळी नक्की कसं वातावरण असेल? भेदाभेद निवळतील की वाढतील? यासंदर्भात, विचार करून डोक्याचा पुरता भुगा होऊन बसला आहे. 
         मुळात कोकणवासी मराठी माणूस हो कष्टकरी, अल्पसंतुष्ट आणि सदोदित हसरा. तो कोकणात असो की शहरात, आपल्या गावावर नितांत प्रेम करतो. हेच प्रेम घेऊन तो यंदा या मायभूमीकडे धावत गेला. पण त्या भूमीनं त्याला रोखलं. तो शहरातून आलाय म्हणजे नक्कीच तो महामारी घेऊन आलाय, या संशयानं पछाडलेले ग्रामस्थ त्याला प्रवेश करू देईनात. त्यानं 14 दिवस संस्थात्मक बाह्य विलगीकरण कक्षात आणि 14 दिवस घरात कोरंटाइन व्हावं, असे फतवे निघाले. तेही चाकरमान्यांनी मानले. पण त्यामुळे अनेक स्वार्थी व स्वयंघोषित नेतेमंडळीचे फावत गेले. त्यांची मजल वाढली. त्यांची दादागिरी वाढली. त्यांचा जाच वाढला. ‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं’ अशी म्हण आहे. ती खरी आहे. कारण, आजकाल गावाच्या वेशीवर बांबू, बॅरिकेडस्, दगडधोंडे लावून रस्ते अडवले आहेत. कोणाला? तर याच गावच्या मुंबैकर सुपुत्रांना. त्यांना मनाई आहे गावात यायची. खरंतर ही स्थानिक मंडळी तेवढ्यापुरती. एकूणच कोकणातील चाकरमान्यांची सध्या अवस्था ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली आहे. ‘आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना’ असं झालंय्. लॉकडाऊन, रेड झोन, हॉट स्पॉट, कोरंटाइन, आयसोलेशन हे सारे शब्द गेल्या तीन महिन्यात प्रत्येक भारतीयाला तोंडपाठ झाले आहेत. त्यात सारेच भरडले आहेत. पण कोकणवासीय चाकरमान्याची याच काळात याच शब्दांमुळे चाललेली, किंवा चालवलेली लूट असह्य करणारी आहे. 
 चारही लॉकडाऊनच्या काळात, ठरावीक अंतरानंतर नियमांमध्ये अधूनमधून बदल होत होते. पहिला लॉकडाऊन सगळ्यांनी गंभीरपणे घेतला पण नंतर नंतर सगळेच कंटाळले. नंतर अनेकांना रोजगाराची भीती भेडसावू लागली. हा लॉकडाऊन एवढ्यात उठत नाही, हे कळताच सगळे परप्रांतीय आपापल्या राज्यात पळू लागले. त्यांना फुकट न्यायची व्यवस्था झाली. पण कोकणच्या लोकांनी घोडं मारलं होतं. त्यांच्यावरचा अन्याय पुन्हा दुसरं रूप घेऊन आला. आधी फुकट, मग पर्यायी, मग अटी-नियमात अडकलेली अमिषं दाखवून एसटीनं अन्याय केला. लोकं मग वाट फुटेल तशी कोकणात पळू लागली. कोणी खासगी गाडीनं, कोणी पायी चालत, कोणी ट्रॅकवरून, कोणी कसं तर कोणी कसं... परप्रांतीयांना सगळ्या सवलती देणारं सरकार कोकणच्या चाकरमान्यांना विसरलं. त्याची लूट सुरू झाली. ती सुरूच आहे. खासगी गाडीवाल्यांनी जिवावर उदार होण्याचा आव आणत अव्वाच्या सव्वा भाडे आकारले. नंतर महत्प्रयासाने गावी पोहोचल्यानंतर वेशीवरच्या लाठ्या-काठ्या-बांबू-दगड-बॅरिकेड्स यांचे अडथळे ओलांडून गावात प्रवेश केला न् केला तोच त्यांना कुठल्याकुठे कोरंटाइन करण्याचे ‘आदेश’ देण्यात आले. संस्थात्मक विलगीकरणात सोयीसुविधांच्या नावाने बोंबच. म्हणजे एखादा आरोपी, एखादा गुन्हेगार, एखादा खुनी, एखादा अट्टल चोर, दरोडेखोर, एखादा पॅरोलवर सुटलेला कैदी किंवा महारोगी गावात आला आहे आणि त्यामुळे सगळं गावंच बरबाद होणार आहे, अशा फालतू अविर्भावात गावचे म्होरके सज्ज झाले. चाकरमान्यांची अशी व इतकी वाईट अवस्था याआधी कधी झाली नव्हती. ज्या गावानं आजवर मान दिला, पैशाची अपेक्षा केली, ज्या गावावर आपण भरभरून प्रेम केलं तिथं असा अपमान सोसायची वेळ आली.
        खरंतर चाकरमान्यांनीही यंदा गावी जायचं कारण नव्हतं. लाखो चाकरमानी कोकणात कशाला गेलेत? यंदा आंबे नाही खाल्लेत, फणस नाही खाल्लेत तर काही फरक पडणार नाही. मे महिन्यात दरवर्षीप्रमाणे कोकणसफर करण्याचा मनसुबा नाही आखला तरी फरक पडणार नव्हता. पण आपल्याच लोकांना खाज. आधी मूर्खपणा करायचा आणि नंतर इतरांच्या नावानं शंख करायचा, ही खोडही कोकणी माणसाचीच. अगदीच महत्त्वाचं, अतिमहत्त्वाचं काम असेल तर ठीक. आणि आता तर स्वतःचं आरोग्य हेच अतिअतिअति महत्त्वाचं काम उरलं आहे. इथे सगळेच इतर व्यवहार व्यर्थ आहेत. कोकणी माणसानं गावातल्या लोकांना तिथं सुखी राहू द्यावे, आपण इथं कुठं शहरात आहोत, तिथं सुखरूप राहावं, हेच इष्ट. आणि त्यातूच जास्त ओढ लागली तर तिथं जबरदस्तीनं कोरंटाइन व्हायची आणि गावकर्‍यांचा तिरस्कार सहन करण्याची तयारी करावी. 
        इथं शहरात कंपन्या बंद आहेत, लोकल ट्रेन-बसेस सगळे बंद आहे. एका चाळीत किंवा इमारतीच्या एका खोलीत कितीजणं दाटीवाटीनं राहणार? त्यापेक्षा कोकणात जाऊन आपल्या गावच्या घरची कामं तरी करू, अशी त्यांची इच्छा आहे. इथं बेकार, निरोद्योगी राहण्यापेक्षा तिथं जाऊन काहीतरी करू, अशी त्यांची भावना आहे. ती चुकीची नाही. पण संयम नाही, हेच खरे.  
 एकतर कोकणात काही मोजके अपवाद वगळले तर करोनाबाधितांवरील उपचारासाठी इस्पितळे नाहीत. खासगी दवाखाने रिस्क घेत नाहीत. सरकारी इस्पितळांच्या मर्यादा आहेत. कोकणात मुळातच डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालय कर्मचारी यांची मुबलकता नाही. त्यामुळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज किंवा गोवा इथल्या ठिकाणी उपचारासाठी जावं लागतं. रत्नागिरी, सावर्डे, चिपळूण पुढे कणकवली अशा महत्त्वाच्या ठिकाणी इस्पितळं आहेत. पण त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. सध्या तर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची हीऽऽ गर्दी उसळली आहे. मागच्या महिन्यात रत्नागिरी जिल्हा ग्रीन झोन झाला होता. पण काही करोनाबाधित तिथं पोहोचले आणि पुन्हा हा जिल्हा संवेदनशील झाला. 
       सगळ्यात चीड येते ती खासदार, आमदार, मंत्री, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी राजकारणी लोकांची. या लोकांमध्ये फार कमी लोकांचा अपवाद वगळता सगळेच्या सगळे एकाच माळेचे मणी. सगळे आपली शेपटी आपल्या ..आत खुपसून आपापल्या बिळात दडून बसले आहेत. तिकडे आपले चाकरमानी मरताहेत, याची त्यांना काही काळजीच नाही. हे लोक आपल्या परिसरात उत्तम इस्पितळ बांधण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. ती तयारी ग्रामस्थांनी, चाकरमान्यांनी केलेली आहे. मुंबईस्थित कोकणवासियांनी वर्गणी काढून आपापल्या गावपरिसरात, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं सुसज्ज इस्पितळ उभारण्याचा निर्धार केला आहे. लोकसहभागातून सामाजिक विकासाचे प्रयत्न होत असताना नतद्रष्ट राजकारण्यांना शरम वाटली पाहिजे. सरकार कुठे कुठे धावत येणार? ग्रामपातळीवर सामाजिक आणि राजकीय समन्वयाने या गोष्टी व्हायला नकोत का? 
 हजारो चाकरमानी गावी जात असताना भ्रष्ट पोलिस, सुस्त राजकारणी आणि पैसे उकळण्यासाठी टपून बसलेले खासगी गाडीवाले यांच्या संगनमताने कोकणवासी लुबाडला जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील गावोगावी जाणारे कितीतरी चाकरमानी आपल्या बॅगा, पिशव्या सांभाळत आणि पैसे वाटत निघाला आहे. त्याच्या पैशावर डल्ला मारायला चोरलोक टपलेलेच आहेत. त्यात परिवहन महामंडळाने आधी मोफत नंतर सवलतीत नंतर पैसे भरून नंतर दुप्पट पैसे भरून अशा प्रकारे गाड्या उपलब्ध करून दिल्या. त्यात लाखो परप्रांतीय मजूर, श्रमिकांच्या फुकटगिरीमुळे चाकरमान्यांना सोयीसवलती मिळू शकल्या नाहीत. परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात मोफत प्रवास, त्यांच्या खाण्यापिण्याची मोफत व्यवस्था आणि इथल्या कोकणवासीयांच्या नशिबात फरफट, पायपीट, उपासमार, लुटालूट. हे सारं कधी थांबणार. त्या करोनापेक्षा ही सामाजिक भेदाभेद आता असह्य होत चालली आहे. म्हणजे मुंबईकर-ठाणेकर कोकणवासी थैल्या भरभरून कोकणात चालला आहे आणि गरीब बिचारा मजूर परप्रांतीय हात हलवत आपल्या यूपी-बिहारमध्ये परतत आहे, असे चित्र उभे केले जात आहे. ही मंडळी वर्षानुवर्षे मुंबईत राहिली. त्यांच्याकडे गावाला जाण्याइतकेही पैसे नाहीत? की आपल्याकडच्या लोकांनाच ती मंडळी गरीब आणि दरिद्री असल्याचा साक्षात्कार होत असतो? ही माणुसकीची अवहेलना आहे. न्याय सगळ्यांना सारखाच हवा. 
 शहरातून गावात आलेल्यांची व्यवस्था ग्रामपातळीवर वाडीवस्तीवरील यंत्रणांनी करावी, असं ठरलं होतं. त्यात काही तथाकथित म्होरके पुढारी अचानक निर्माण झाले. त्यांनी सूत्रं आपल्या हातात घेतली. वाडीमंडळं बाजूला झाली आणि या म्होरक्यांचं प्रस्थ वाढलं. आता त्यावर नियंत्रण आणावे लागेल. सर्वांनी एकमेकांना समजून घेऊन काम केलं पाहिजे. गावागावात समाजमंदिरं, देवळं, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा आहेत. पण प्रत्येक गावात दवाखाना, इस्पितळ का नसावे? याचा विचार झाला पाहिजे. आज जातीधर्म यापेक्षा आरोग्यसेवा महत्त्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. करोनाचे संकट एवढ्यात संपणारे नाही. या करोनाने आपल्याला कायमस्वरूपी धडा दिला आहे. आता देवळांपेक्षा आणि समाजमंदिरांपेक्षा इस्पितळं उभारली पाहिजेत, हा तो धडा. म्हणजे भविष्यात माझा चाकरमानी कोकणी माणूस तिथल्या तिथे उपचार घेऊन घरी जाऊ शकतो. कशाला हवी मग कोरंटाईनची मगजमारी आणि स्थानिक म्होरक्यांची दादागिरी?
       आता सरकारनं एसटी आणि कोकण रेल्वे सुरू करून सर्व नियम, बंधनं पाळून कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्यासाठी सोय केली पाहिजे. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येईल. पण त्यानंतरही अटी, नियम, बंधनं असणारच आहेत. त्याची सर्वांना एव्हाना सवय झाली आहेच. भविष्यातही ती कायम राहील. समाजसंघटना, मुंबईस्थित ग्रामस्थ मंडळं या चाकरमान्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करत आहेच. ती पुढेही करत राहतील. पण सरकारनं मदत केली पाहिजे. गेले काही दिवस दोन-अडीच-तीन दिवस चालत चालत आपलं गाव गाठण्यासाठी जाणारे कोकणप्रेमी चाकरमानी ज्या जिद्दीनं वाटचाल करत आहेत, त्या वेडाला आणि त्या जिद्दीला खरंच सलाम केला पाहिजे. जागोजागी अडवणारे पोलिस आणि स्थानिक यंत्रणा यांनी त्या वाटाड्यांना मदत केली पाहिजे. 
          सगळ्या आमदार, खासदार आणि राजकीय लोकांनी आपल्या या प्रांतात आपला निधी विकासकामांना आणि सामाजिक उपक्रमांना त्वरीत देऊ केला पाहिजे. आज त्यांच्या तोंडावर त्यांच्यावर टीका करणारे लोक उद्या त्यांच्या थोबाडीत मारायला कमी करणार नाहीत, याची याद राखा. अजून वेळ गेलेली नाही. कोकणी लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. तसंच गावपातळीवरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्राममंडळाचे लोक, वाडीवाडीवरील स्वयंघोषित पुढारी, पक्षांचे पदाधिकारी, मंत्र्यांचे चमचे, आमदारांचे सचिव, पालकमंत्री आणि समस्त तथाकथित हितचिंतकांना माझी कळकळीची विनंती आहे की याच काळात पुढे येऊन सर्वांना मदत करावी. नाहीतर, खरंच तुम्हा लोकांना गावकरी आणि चाकरमानी थारा देणार नाहीत. त्यांच्या गावातून आणि मनातूनही तुम्हाला हाकलून दिले जाईल. 
       रस्ते, पाणी, रोजगार या प्रश्‍नांवर वर्षानुवर्षे निवडणूक लढणारे आणि जिंकणारे लोक यापुढे ‘आरोग्य’ या विषयाला प्राधान्य देतील का? नाही दिले तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. या पुढारी लोकांना आपल्या परिसरात एखादे रुग्णालय उभारता येऊ नये, ही खंत नाही तर चीड आहे. पक्षाचे झेंडे मिरवणारे समस्त राजकारणी यापुढे सजग झाले पाहिजेत. ते निष्क्रिय झाले आहेत. स्वार्थी झाले आहेत. त्यांनी आताच जर जागे होऊन लोकांना मदत केली नाही तर लोक त्यांना खरंच कायमचं नष्ट करतील. 
       लोक आता संतापले आहेत. त्यांचा संयम संपत चालला आहे. नोकरी, रोजगार, उद्योग, व्यवसाय, सगळ्यावर बंदी आली आहे. पैसे नाहीत. पुंजी संपत आली आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. शेती करावी, घर शाकारावं, वाडीतील झाडांचं काय करायचं, मुलांच्या शिक्षणाचं काय करायचं? गावी असणार्‍या म्हातार्‍याकोतार्‍यांचं काय करायचं, सगळ्याच सरकारी योजना आपल्याला मिळत नाहीत, कुठून पैसे आणायचे? प्रश्‍न पडत आहेत. त्यावर उत्तर नाही. 
      एकच विनंती आहे की आमचा कोकणवासी चाकरमानी शहरातून गावी जायला निघाला की त्याची आरोग्य तपासणी व्हावी. तो निगेटिव्ह असेल तर त्याला प्रवासाला परवानगी द्यावी. तो कोकणातील गावात प्रवेश करण्यापूर्वी त्याची तिथेच पुन्हा आरोग्य तपासणी व्हावी. तो पूर्णतः निरोगी असेल तर त्याला त्वरीत त्याच्या घरी जाऊ देण्यात यावे. त्याला व त्याच्या कुटुंबाला हकनाक संस्था विलिगीकरण कक्षात आणि नंतर होम कोरंटाईन करण्यात काय अर्थ आहे? तशी तर रेड झोन मध्ये टाळेबंदी आहेच. चाकरमान्यांना त्यांच्या घरात डांबून घराला कुलूप लावून कैदी करण्याचे अघोरी प्रकार जिथे जिथे घडताहेत, त्या ठिकाणी ग्रामविकास मंडळांनी, ग्राम दक्षता पथकांनी आणि स्थानिक प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सहकार्य केले पाहिजे. एकेकाळी एका ताटात जेवणारे लोक एकमेकांना पाहून तोंड फिरवत आहेत. कोणी कोणाला वाळीत टाकत आहे, अस्पृश्य असल्यासारखी वागणूक देत आहेत. या सगळ्यांची आवश्यकता आहे का? हे सारं थांबणार कधी?
       हे सारं थांबलंच पाहिजे. नाहीतर करोनाचं नाव होईल आणि गावागावात गट-तट पडतील. मुंबईवाले विरुद्ध गाववाले असा संघर्ष विनाकारण सुरू होईल. म्हणून दोन्ही बाजूवाल्यांना एकच विनंती आहे की, गरज नसेल तर नका जाऊ यंदा गावाला. आणि गेलात तर समन्वयानं रहा. मुंबईहून आलेल्यांना स्थानिकांनी वाळीत टाकण्याएवढी वूर वागणूक देऊ नये. त्यांना सहकार्य करा. त्यांच्या राहण्याची, जेवणाखाण्याची, सुविधांची व्यवस्था करा. करोना जाईल, पण मनातली किल्मिषंही गेली पाहिजेत! ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ म्हणत आपला गाव, आपला समाज, आपला परिसर, आपलं राष्ट्र सुजलाम् सुफलाम् आणि आरोग्यदायी होण्यासाठी प्रयत्न करू या!
0 0 0 
- संदेश जिमन
(9819200887)