जागतिक हायपर टेंशन जागरूकता दिन


- डॉ. यश वेलणकर 


आज १७ मे हा हायपर टेंशन जागृती दिवस आहे.
२००५ साला पासून हा दिवस WHO साजरा करू लागली. माणसाचा रक्तदाब कशामुळे वाढतो ,तो खूप वाढला तर कोणते दुष्परिणाम होतात या विषयी माहिती लोकांपर्यंत पोचवणे हा आजच्या दिवसाचा उद्देश आहे.कारण हायपर टेंशन हा आजार ही साथी च्या आजारा सारखा वाढत आहे.सध्या चाळिशी नंतरच्या तीस टक्के व्यकीना हा आजार असतो असे संशोधन आहे.हा आजार आता तरुण वयात ही वाढतो आहे.
रक्तदाब वाढला तर मेंदूतील रक्त वाहिनी फुटून अर्धांग होतो, सतत रक्तदाब वाढून राहिला तर हृदयाला सतत अधिक काम करावे लागल्याने ते थकते.रक्तदाब वाढून राहिला तर मूत्रपिंड देखील खराब होतात. करोना रोगाचा त्रास देखील हायपर टेंशन असेल तर अधिक होतो असे दिसत आहे.
        रक्तदाब वाढणे हा चुकीच्या जीवनशैली मूळे होणारा आजार आहे.आहारात अधिक मीठ, व्यायामाचा अभाव आणि मानसिक तणाव या तीन गोष्टीमुळे रक्तदाब वाढतो. कोणतेही संकट आहे असे विचार मनात असतात त्या वेळी रक्त दाब वाढतो. प्राण्यांचा ही असा रक्तदाब वाढतो.मात्र ते अमूर्त विचार करू शकत नाहीत.त्यामुळे घटना संपली की त्यांचा रक्तदाब शांतता स्थिती मध्ये येतो.माणसाचे मात्र असे होत नाही. तोंडावर हास्याचा मुखवटा चढवला तरी मेंदूतील संकटाच्या विचाराची फाईल काम करीत राहते आणि शरीरातील रक्तदाब वाढवते.याच साठी संकटाच्या विचारांना दाबून न ठेवता सजगतेने त्यांना सामोरे जायला हवे.त्यांच्या मुळे शरीरात जाणवणारे परिणाम म्हणजे संवेदना जाणून त्यांचा स्वीकार करायला हवा.अधूनमधून दीर्घ श्वसन करून शरीर शांतता स्थितीत आणायला हवे.काहीही खात असताना सजग राहून यामध्ये छुपे मीठ नाही ना ते पाहायला हवे.रोज शरीराच्या साऱ्या स्नायूंची हालचाल करायला हवी. रक्तदाब ही शरीरातील वास्तव घटना आहे. औषध कंपन्या त्यामध्ये व्यवसाय शोधत असल्या तरी ती संधी त्यांना आपणच देत असतो.आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि निरोगी जीवनशैली अंगिकारली तरच हायपर टेंशन ची साथ आपण थांबवू शकतो.कोणतीही लस विकसित होईल आणि ही साथ थांबेल अशी शक्यता नाही कारण या आजाराला कोणताही जंतू कारणीभूत नाही. 
 हा संदेश कॉपी पेस्ट करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवला तर आजचा दिवस पाळण्याचा उद्देश सफल झाला आणि त्यामध्ये आपण काही हातभार लावला असे होईल.


- डॉ. यश वेलणकर 9146364940