"गगनभरारी"चा वेलू गेला गगनावरी   - डॉ. सतीश शिरसाठ

 


      प्राध्यापक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.


 


       महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदावर कार्य  केलेले देवेंद्र भुजबळ हे एक असामान्य साहित्यिक आहेत,त्यांच्या "गगनभरारी" या पुस्तकातून ठायी ठायी दिसते. "गगनभरारी"  या पुस्तकातून त्यांनी वर्णन केलेले अनेक क्षेत्रातील महिलांचे कार्य पहाता, ते केवळ व्यक्तिचित्रणच आहे,असे वाटत नाही तर ते समाज चित्रण आहे.समाजाच्या अनेक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या जीवनाचे हे पारदर्शक वर्णन अमूल्य आहे;  तो समाजाचा ठेवा आहे. थोर साहित्यिक पद्मश्री  मधु मंगेश कर्णिक यांनी या पुस्तकाला सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या प्रस्तावनेत   ते म्हणतात, परिस्थितीच्या  प्रतिकूलतेमुळे केवळ जमिनीवरच  खुरडत राहणं शक्य असलेल्या सर्व सामान्य  महिलांनी ,मनोबळावर ,परिश्रमावर आणि आकांक्षेच्या जोरावर आकाशात उंच भरारी कशी घेतली याचे प्रत्ययकारी चित्रण श्री देवेंद्र भुजबळ यांनी केलेले  आहे ; यासाठी त्यांनी निवडलेल्या स्त्रियासुध्दा आपापल्या परीने    वैशिष्ट्यपूर्ण आहेत व त्यांचे जीवनातील कार्य तर त्याहून  वैशिष्ट्यपूर्ण व अचंबित करणारे आहे.                                                  


      जालना जिल्ह्यातील एका खेड्यातील महिला सुशिलाबाई साबळे यांनी  दारिद्र्याशी लढून स्वतःचे आणि कचरा वेचणाऱ्या महिलांचे जीवन प्रकाशमान केले,याबद्दल त्यांचे देशात आणि विदेशातही सत्कार झाले आहेत. आपल्या देशातील वाढत्या असंघटित कामगारांच्या जीवनातील अनुभव त्यांच्या गाठी आहे. त्या अमानवी प्रवृत्तींशी लढल्या.स्वतःबरोबर त्यांनी इतरांनाही आनंदी आणि मोठं केलं. संगीताची पूजा करणाऱ्या भाग्यश्री पांचाळे, चिपांझीसारख्या प्राण्यांवरही माणसाइतकेच प्रेम करणारी जेन,अनुवादासारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या कामाला ओलावा देणाऱ्या आणि त्या कार्याला पवित्र मानणाऱ्या डॉ. विद्या सहस्त्रबुद्धे, दूररदर्शनमधील सृजनशील निर्मात्या डॉ. किरण चित्रे, वृत्त निवेदिका वासंती वर्तक, एचआयव्हीग्रस्त मातांना वैद्यकीय मदतीबरोबरच मायेचा हात देणाऱ्या डॉ. रेखा डावर, संवेदनशीलतेने साहित्याच्या अनेक क्षेत्रात विहार करणाऱ्या आणि जिद्दीच्या जोरावर मुंबई सारख्या शहरात स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या  कवयित्री, लेखिका, प्रकाशक श्रीमती लता गुठे, एक कल्पक आणि उपक्रमशील सामाजिक व वाचक चळवळीतील कार्यकर्त्या बेबीताई गायकवाड, पर्यटनासारख्या अवघड क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवून अनेक क्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या ,कोकणातील पहिल्या टीव्ही पत्रकार मानसी चेऊलकर, मूळच्या अमराठी असूनही मराठी भाषेचे वैभव पाहून त्याच्या प्रकाशात अवघ्या विश्वाला गवसणी घालणाऱ्या प्रीती कोटीयन,स्वतःच्या अंधत्वावर मात करून आपल्या कर्तृत्वाने स्टेट बँकेत अधिकारी झालेली,समाजाला प्रकाशदीप ठरलेली सुजाता कोंडीकिरे, वाहन अपघातात दोन्ही पाय आणि बँकेतील नोकरी गमावलेली पण जिद्द न गमावता कुटुंबाचा  आधार बनलेली कंटेंट रायटर  सुजाता नायकुडे  अशा अनेक आकाश ज्योतीना भुजबळ साहेबांनी या पुस्तकात रेखाटलय.                                                             खरं तर घर खरेदी-विक्री या व्यवसायावर पुरुषांचा पगडा आहे. मात्र इस्टेट एजन्सी व्यवसायात चिकाटी,कायदेशीर बाबींची पूर्तता आणि सचोटीने शीतल जोशी यांनी एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण केलाय. लातूरच्या प्रा.स्मिता दगडे हा असाच  महिला सक्षमीकरणातला दीपस्तंभ ! सकारात्मक बदल घडविण्याचं सामर्थ्य स्मिताताईनी ओळखून शिक्षणाची कास धरून त्या आज अनेक पारितोषिकं आणि सन्मानाला  पात्र ठरल्या आहेत. श्रीमती श्रध्दा सांगळे यांचीही यशाची कथा सर्वांना आदर्शवत आहे.शिक्षणाची, संगीताची अनेक शिखरं त्यांनी पादाक्रांत केली आहेत. समाजातील  वाढते मानसिक आजार आणि त्यातुन अनेक व्याधींचे ,विनाशाचे प्रमाण वाढते आहे. यावर प्रचार, प्रसार,उपचार याबरोबरच योगासारख्या बाबींचे शिक्षण नाशिकच्या डॉ. नीलम मुळे देतात.                        


    मुंबईतील ओल्गा डिमेलो यांची यशोगाथा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.  पतीवियोगाने खचून न जाता त्यांनी दाखवलेली जिद्द आणि त्याला कवितेच्या रुपात दिलेली अभिव्यक्ती निश्चितच प्रशंसेला  पात्र आहे. घरची काहीही पार्श्वभूमी नसताना  सामान्य कुटुंबातुन आलेल्या नागपूरच्या संपादक शोभा जयपूरकर, दुसऱ्या लातूर येथील संपादक शीला उंबरे ,तिसऱ्या मुंबईतील संपादक वैशाली आहेर  या महाराष्ट्राच्या तीन वेगवेगळ्या प्रांतातील तीन महिला पत्रकारांच्या कथाही त्यांनी दाखवलेली चिकाटी, कष्ट या  जोरावर मिळवलेल्या यशामुळे प्रेरणादायी आहेत.   शहरी जीवनाचा त्याग करून  कोकणातील अंध मुलामुलींसाठी  रत्नागिरी जिल्ह्यात घराडी येथे   स्नेहज्योत निवासी शाळा सुरू करणाऱ्या आशाताई कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या भगिनी यांच्या कार्याची प्रेरणा समाजाला दिशा दर्शक आहे. पूर्णवेळ गायिका असलेल्या गीता माळी यांनी तर संगीताचा मळा फुलवला आहे.त्यांच्या या कार्याला देशविदेशात अनेक बाजूनी दाद मिळाली आहे. आकांक्षा हेलसकर यांनीही प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश,करत असलेले कार्य ,त्यांचा झालेला सन्मान हा समाजाचा मोठा ठेवा आहे; ऐवज आहे.                       


     आजच्या जगातील वेगवान जीवनशैली, भंगलेली कुटुंब पद्धती यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे वेळ देऊ शकत नाही. त्यासाठी संतुलित आहार आणि त्या सोबत फळं, भाज्या यांचा समावेश करण्याची गरज डॉ. शारदा  महांडुळे ह्या स्त्रीरोगतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ  व्यक्त करतात.आहार,आरोग्य या बरोबरच स्त्रियांच्या विविध बाजूंचा विचार करून त्यांचे त्या प्रबोधन करतात. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी  भूषविले आहे.   महिला सबलीकरण  हे साऱ्या मानवजातीच्या कल्याणाचे साधन आहे; या बाबींचा विचार करून कार्य करणाऱ्या या प्रकाशरेखा आहेत.आपल्या कार्याने त्यांनी सर्वापुढे जो आदर्श निर्माण केलाय ते निश्चितच प्रशंसनिय आहे. त्यांच्या कार्याला देवेंद्र भुजबळ यांनी शब्दबन्ध करून भरारी प्रकाशनाने   गगनभरारीच्या रूपात  समाजासमोर पेश केले आहे.