कोरोना:मन सांभाळा! -- देवेंद्र भुजबळ, मा. माहिती संचालक, महाराष्ट्र शासन

     



   कोरोनामुळे जगात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवाचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे की काय ? असं  भयावह वातावरण आहे.  मुळातच गतिमान,  स्पर्धाशील जीवनामुळे दिवसेंदिवस मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात कोरोनामुळे  लॉक डाऊन, हालचालींवर बंधनं, घरातच सतत बसून राहणं, नेहमीचं जन जीवन ठप्प होणं , बिघडत चाललेले नाते संबंध, एकटेपणाची भावना,आर्थिक परिस्थिती, भविष्याची अति चिंता ,अशा अनेक बाबी माणसाचं शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरत आहेत. शारीरिक आजाराची अंतर्गत, बाह्य लक्षणं सहज दिसून येतात. त्यांचं मोजमाप करण्यासाठी विविध प्रकारची साधनं, उपकरणं उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित उपचार करणं  शक्य होतं. तसंच शारीरिक आजार दाखवणं ,त्यांच्यावर उपचार करणं यात कमीपणा मानला जात नाही.  मात्र  काही  मानसिक आजारांच्या बाबतीत बाह्य लक्षणं दिसून येत नाही.  आपल्याला  काही  मानसिक आजार आहे, हे एक तर संबंधित व्यक्ती किंवा तिच्या जवळच्या  माणसांच्या लक्षात येत नाही. आलं तरी मानसिक आजार हे दुबळेपणाचं  प्रतिक समजल्या जातं म्हणून असेल किंवा त्या विषयी समाजात अजून हवं तेव्हढं जन जागरण झालं नसेल,यामुळे  शास्त्रीय उपचार करून न घेता मानसिक आजार  लपविण्याकडेच समाजात मोठया प्रमाणात कल दिसून येतो.  मानसिक आजारांवर त्वरित योग्य उपचार करून न घेतल्यास रुग्ण आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलतो.काही प्रकरणात रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या जीवावरसुध्दा उठू शकतो. म्हणून मानसिक आजार, त्यांचं स्वरूप, प्रकार,उपचार या सर्व बाबी समजून घेण्याची गरज आहे.
       मानसिक आजार होण्याची प्रमुख कारणें म्हणजे आनुवंशिकता, स्पर्धात्मक युग, दैनंदिन जीवनातील ताण तणाव ,सर्व क्षेत्रात जाणवणारा संयमाचा अभाव, मोडकळीस येत चाललेली कुटुंब व्यवस्था ,वाढते शहरीकरण आणि ग्रामीण भागात निसर्गाचा लहरीपणा ही  आहेत.
        मानसिक आरोग्य म्हणजे काय ? हे आता आपण  समजावून घेऊ या. तर मानसिक आरोग्य म्हणजे आपलं  उद्दिष्ट कष्टपूर्वक  साध्य करीत असताना ,प्रसंगी अपयश आल्यास ते पचविणे आणि यश मिळाल्यास यशाच्या  नशेत  न राहता ,वर्तमान जगताना भूतकाळाचा अनुभव व त्या दृष्टीने घेतलेला भविष्याचा सकारात्मक वेध म्हणजे मानसिक आरोग्य होय. व्यक्तीने नातीगोती  जपली पाहिजेत. परंतु या  नात्यागोत्यात  गुंतून न राहता, आपले सामाजिक तसेच व्यावसायिक भान ठेवत कोणत्याही प्रकारचे वैफल्य न बाळगता केलेली वाटचाल म्हणजे ही ही मानसिक आरोग्य होय.
       काही वेळा मुबलक साधन सामुग्री उपलब्ध असूनही व्यक्तींच्या जीवनात एक प्रकारचे नैराश्य येते.  कधी कधी नकार किंवा पराभव सहजपणे न स्वीकारल्यामुळे अशी  व्यक्ती निराशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी जाते.  मानसशास्त्रात व्यसनाला सुध्दा मानसिक आजार समजल्या जातं,हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीला  मानसिक आजार झाला आहे, हे ओळखण्याची  काही लक्षणं म्हणजे, व्यक्तीची झोप बिघडणे ,भूक कमी होणे, चिडचिड वाढणे, एकलकोंडेपणा, दैनंदिन कामकाजात  चुका ,वजन खूप कमी  होणे किंवा खूप वाढणे , अवास्तव भिती वाटणे ,  आत्मविश्वास कमी होणे ,जीव घाबरणे ,काम करण्याची इच्छा कमी होणे, आत्महत्या करण्याची धमकी दे राहणे,   आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे, मुलांच्यात शिक्षणावर विपरीत परिणाम होणे ,  त्यांची संगत बिघडणे, खोटे बोलणे, स्वच्छता - टापटीपपणा कडे दुर्लक्ष होणे, चेहरा चिंताग्रस्त दिसणे इत्यादी आहेत.आपल्याला मानसिक आजार झाला आहे, हे बऱ्याचदा  संबधित व्यक्तीलाच एक तर समजत नाही किंवा समजलं तरी तो दुर्लक्ष करत राहतो. नाकारत राहतो. अशावेळी 
 कुटुंबातील व्यक्तींनी , कार्यालयातील सहकाऱ्यांनी,  वर्गातील मित्र-मैत्रिणींनी आपल्या जवळच्या  व्यक्तीत तशी लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्या व्यक्तीला धीर देऊन ,समजावून घेऊन तिला सोबत घेऊन तत्काळ मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे ,योग्य उपचार करणे, आवश्यक असल्यास समुपदेशन  करून घेणे आवश्यक ठरते.
      मानसिक आजाराचे  प्रमुख प्रकार म्हणजे मनाची  दुभंग अवस्था, नैराश्य किंवा उदासीनता (डिप्रेशन),   सतत वाटत वाटणारी भिती, चिंता  (एक्झाईटी) मनोलैंगिक विचार , मनो शारीरिक विकार, अति आनंदी - अति दु:खी अवस्था (बायपोलर)  इत्यादी होत. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वसाधारणपणे वरील लक्षणांबरोबर नैराश्य, स्मृतीभ्रंश,  महिलांमध्ये मासिक पाळीशी संबंधित तसेच बाळंतपणापूर्वी किंवा बाळंतपणानंतर उद्भवणारे मनोविकार दिसून येतात.  बालकातील मनोविकारांमध्ये प्रामुख्याने वर्तणुकीतील  दोष किंवा विकृती ,नैराश्य ,अनामिक भिती इत्यादी लक्षणे दिसून येतात.
           वाढत्या मानसिक आजारांसाठी आज  प्रामुख्याने सोशल   मीडियाला जबाबदार धरले जाते.  पण सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे,हे आपण मान्य केले पाहिजे .म्हणून  सोशल मीडियापासून दूर राहूण्याचा प्रयत्न न करता आपल्या अभ्यासासाठी, माहितीसाठी, व्यक्तिमत्त्व विकासासाठी सोशल मिडियाचा  वापर कसा करावा हे  आपण पाहिलं पाहिजे.तसंच मुलांना सुध्दा तसं शिकविणें  गरजेचे आहे.
     जगात मानसिक ताण तणावामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे. या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी आणि या विषयावर मोकळेपणाने सर्वांनी बोलावं म्हणून  जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने १० ऑक्टोंबर हा मानसिक आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे, यावरूनच या विषयाचं गांभीर्य लक्षात येतं.आपलं मन आपले मित्र आहे . पण हा मित्र शत्रू होणार नाही, आपलाच घात करणार नाही, यासाठी आपण दक्ष राहिलं पाहिजे. यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार, ध्यान धारणा, प्रार्थना, सकारात्मक विचार याचा अवलंब केला पाहिजे.                                                            हा लेख  जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ. संजय कुमावत , समुपदेशक डॉ. नीलम मुळे  यांच्या मी पूर्वी घेतलेल्या  मुलाखतींवर आधारित आहे.त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्याला शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 
  - देवेंद्र भुजबळ- 9869484800.