आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)

स्ट्रक्चरल ऑडिटबाबत फेरविचार न केल्यास आंदोलन -रमेशभाई कदम यांचा इशारा



चिपळूण /सॊ.  सोनाली मिर्लेकर



      चिपळूण शहरातील जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशा आशयाच्या नोटीसा नगरपरिषदेने संबंधित इमारतींना दिल्या आहेत. यासाठी वास्तू विशारदांचे एक पॅनल करण्यात आले असून त्यांच्याकडून १० दिवसात अहवाल सादर करावा असे कळविले आहे. यासाठी एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. हे नागरिकांना न परवडणारे आहे. तरी मुख्याधिकार्‍यांनी या प्रकरणी लक्ष घालून तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते व माजी आमदार रमेशभाई कदम यांनी दिला आहे.


                          ★★★★



  रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या  प्रकल्पांना सरसकट विरोध करण्याची मानसिकता बदलण्याची गरज - मनोज शिंदे


देवरुख / संदीप गुडेकर 
येणार्‍या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका कायम राहिल्यास भविष्यात रत्नागिरी जिल्हा विकासात्मक दृष्टीकोनातून पाठिमागे जाणार आहे. वाढती बेरोजगारी, प्रकल्पांना होणारा विरोध, सर्वांगीण विकास आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे संपर्कमंत्री तथा गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच रत्नागिरीत जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे कोकण प्रभारी मनोज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  


               ★★★


   रत्नागिरी जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तपदी श्री. संजय नारागुडे
रत्नागिरी /सुनील जठार



रत्नागिरी जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तपदी श्री. संजय नारागुडे हे नुकतेच रुजू झाले आहेत. यापूर्वी चे अधिकारी श्री. हाश्मी यांची बीड येथे बदली झाली आहे.
     श्री. नारागुडे हे गेली ३० वर्षे या विभागात कार्यरत आहेत. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील आहेत.


                      ★★★
चिपळुणातील काही खासगी डॉक्‍टर सिटी स्कॅनसाठी अधिक पैसे घेत असल्याची रुग्णांची तक्रार
चिपळूण /ओंकार रेळेकर 
कोरोना रुग्णांकरिता राज्य सरकारने सिटी स्कॅनच्या दरांवर नियंत्रण आणले आहे. सिटी स्कॅनसाठी दोन ते तीन हजार रुपयांहून अधिक शुल्क आकारता येणार नाही, असे आदेश जारी करण्यात आले आहेत, तरीही चिपळुणातील काही खासगी डॉक्‍टर सिटी स्कॅनसाठी चार ते सात हजार रुपये शुल्क घेत आहेत. यामुळे रुग्ण, नातेवाईक हतबल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे.


                     ★★★★★
  राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के
मुंबई /लोकनिर्माण न्युज


       राज्यात आज १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नविन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५८ हजार १०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


                     ★★★★
फसवणुक  टाळण्यासाठी शेतकर्‍यांना बियाणे राखून ठेवण्याचा सल्ला
खेड /प्रमोद आंब्रे
नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापनांसह स्थानिक विक्रेत्यांसह होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्याकडील बियाणे राखून ठेवण्याचा सल्ला उपविभागीय कृषि अधिकार्‍यांमार्फत देण्यात आला आहे. दरवर्षी नवीन बियाणे खरेदी केल्यास शेतकर्‍यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. सुधारित बियाणे एकदा खरेदी केल्यानंतर तीन वर्षे त्याचा वापर करता येतो. बियाणे पुढील हंगामासाठी राखून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांनी महत्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.         


                             ★★★★



चित्रनगरी कोल्हापूर येथे सुरू होत असलेल्या दख्खनचा राजा जोतिबा व इतर मालिका मध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना व तंत्रज्ञांना काम मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने निवेदन सादर


           


 मुंबई -कोल्हापूर / लक्ष्मण राजे


          कोल्हापूर येथे सुरू होत असलेल्या मालिका  " " "दख्खनचा राजा जोतिबा"*व इतर मालिका मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्हयातील स्थानिक कलाकार व तंत्रज्ञानां काम मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने कोल्हापूर चित्रनगरीचे उपव्यवस्थापक मा. श्री.भांदिगरे यांना निर्माता     


                                 श्री.विजयजी शिंदे ( नाना ) ( अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ ) यांच्या हस्ते निवेदन सादर करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक श्री.ग्यान नरसिंगानी, निर्माता रंगराव कोटकर, आर्ट डायरेक्टर सतीश बिडकर ( संचालक :अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) दिग्दर्शक किशन बोंगाळे ,  अभिनेता महादेव  साळोखे , अशोक सुर्यवंशी, अभिनेत्री कवीता चव्हाण , दिपा पुजारी  अमर कोळी , शिवाजी वायदंडे, सुनिल देसाई , गौतम सावंत आणि प्रदीप जाधव, तसेच इतर सर्व संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते.हे निवेदन सादर करण्यासाठी विशेष मार्गदर्शन श्री.बाळासाहेब गोरे यांनी केले.अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने कलाकारांना आणि तंत्रज्ञांना या पुढे देखील सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल अशी माहिती बाळासाहेब गोरे यांनी दिली आहे.


                               ★★★★★


  रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्हे कमी व्हावेत यासाठी पोलिसांची सायबर साक्षरता मोहीम
रत्नागिरी /सुुुुुनील जठार
जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर साक्षरता मोहीम राबविण्यात येत आहे . लोकजागृती हाच त्याचा मुख्य उद्देश आहे . राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना सायबर गुन्हेही कमी होण्याचे नाव घेत नाहीत . जिल्ह्यातही सायबरचे गुन्हे वाढत असल्याचे दिसून येत असून , नागरिक मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत . त्यास प्रतिबंध व्हावा , या उद्देशाने पोलिसांनी जिल्ह्यात सायबर साक्षरता मोहीम सुरू केली आहे . 
     पोलीस अधीक्षक डॉ . मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर इलेक्ट्रॉनिक हेल्थ स्वच्चछता अभियान सिक्युअर्ड सोसायटी ( ehsAS ) नावाने मोहीम सुरु करुन बॅनर व सोशल माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे . नागरिकांनी बँक व एटीएम कार्डची माहिती देऊ नये . मोबाईलवर येणारा ओटीपी देऊ नये . यासह विविध विषयांवर बॅनर्स बनवण्यात आले असून , जागरुकतेसाठी जिल्ह्यात दर्शनी ठिकाणी ते प्रदर्शित करण्यात येणार आहेत . अशा सायबर फसवणुकीस बळी पडू नये , असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ . मोहितकुमार गर्ग यांनी केले आहे.


                           ★★★★

 वाकण गावचे हभप ज्ञानोबा साने यांचे निधन


         


 पोलादपूर /निळकंठ साने


   न्यायी,सुस्वभावी,प्रेमळ,शांत,जेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार, सद्गुरू भावे महाराज वारकरी सांप्रदयाच मार्गदर्शक ह.भ.प.ज्ञानोबा दादा साने यांचे आकस्मित निधन झाले.  साने परिवारावरच नव्हे तर परिसरातील संपूर्ण भागावर दुःखद शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायातला एक सेवाभावी कीर्तनकार हारपला असून त्यांचे कार्य अंखडीत चालू राहो अशा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली  अर्पण करण्यात आल्या.                               


                     ★★★★★


नगराध्यक्षांनी स्वतःचा विकास केला
 - महाविकास आघाडीचा पत्रकार परिषदेत केला आरोप



चिपळूण/सॊ. सोनाली मिर्लेकर 


  चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी शहराचा विकास करण्याऐवजी फक्त स्वतःचा विकास केला, असा हल्लाबोल आज शनिवारी महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला. शहरातील पाग महिला विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम, शिरीष काटकर,  सुधीर शिंदे, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, महंमद फकीर, अविनाश केळसकर, रतन पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. खताते यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीची सभा झाली, यात नगराध्यक्षांनी बेकयदेशीरपणे व सभागृहाला विश्वासात न घेता एकोणीस विकासकामे केली आहेत, त्यामुळे त्यांच्यावर १९६५चे कलम ५अ अन्वये अविश्वास ठराव मंजूर करून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. प्रताप शिंदे यांनी नवीन व्यक्तिमत्व आहे, नगराध्यक्षा होण्यापूर्वी त्यांनी आंदोलने केली, खेराडे चांगले काम करतील, असे वाटले होते. मात्र त्यांनी एकाधिकारशाहीने काम केले. बेकायदेशीरपणे कामे केली. वाढीव कामांना सभागृहाची मंजुरी न घेता स्वतःचे निर्णय स्वःता घेतले. त्यामुळे त्यांना बडतर्फ करावे, असा ठराव महाविकास आघाडीच्या सदस्यांनी केल्याचे सांगितले. शिरीष काटकर उमेश सकपाळ, अविनाश केळसकर, सुधीर शिंदे आदी सर्वांनीच नगराध्यक्षांच्या कारभारावर टीका केली.