पाटण लोकनिर्माण ( विनोद शिरसाट)
पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकाल व मतदारांचा कौल आम्हा सर्वांना मान्य आहे . बाजार समिती विस्तार , प्रगतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वांनी कठोर परिश्रम घेतले होते . या परिश्रमातूनच गेल्या पाच वर्षात दोन पेट्रोल पंप व मल्हारपेठ येथील भव्य गोडावुनचे काम पूर्ण झाले. ज्यांनी ज्यांनी या विस्तारासाठी मदत केली त्या सर्वांचे मी शेतकऱ्यांच्यावतीने आभार मानतो. या निवडणुकीत काही मोजक्या मतदारांनी आर्थिक लालसेपोटी गद्दारी केल्याने आपला अनपेक्षित पराभव झाला. त्या गद्दारांना आपण भविष्यात नक्कीच धडा शिकवू , आपल्या झालेल्या चुका व गाफीलपणा लक्षात घेऊन यापुढे पुन्हा नव्याने गट व पक्ष बांधण्यासाठी सर्वांनीच सज्ज व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले ज्या स्वाभिमानी मतदारांनी 'शेतकरी विकास पॅनल ' ला प्रामाणिकपणे मतदान केले तसेच ज्या नेते , पदाधिकारी , कार्यकर्ते व युवक , माता-भगिनींनी ' शेतकरी विकास पॅनल ' च्या पाठीशी आपली ताकद उभी केली त्या सर्वांचे मी 'शेतकरी विकास पॅनल ' च्यावतीने आभार मानतो . आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ,निवडणुकात जय - पराजय होत असतो . एकूण ४२०० मतदारांपैकी काही मंडळींनी आर्थिक आमिषाला बळी पडून आपला स्वाभिमान गमावला असला तरीही ही मंडळी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत . परंतु उर्वरित हजारो स्वाभिमानी मतदार आजही आपल्यासोबत एकनिष्ठेने खंबीरपणे उभे आहेत हे सुध्दा आपण लक्षात ठेवले पाहिजे . परंतु असे असले तरी यात गद्दारी केलेल्या लोकांचीही दखल घेऊन यापुढे त्यांचाही योग्य तो विचार केला जाईल .
विरोधकांनी त्यांचा विजय कसा साजरा करायचा हा त्यांचा प्रश्न आहे . परंतु पाटणमध्ये या मंडळींनी आपल्या वाड्यासमोर विजयाचा शड्डू ठोकला असला तरी राजकारण , नैतिकता , संस्कार याचे त्यांनी भान राखले नाही याबाबत जनसामान्यांमधूनच तीव्र संताप व्यक्त होत आहे . आपण आजपर्यंत कोणत्याही विजयाने हुरळून अथवा पराभवाने खचून गेलो नाही , त्यामुळे बाजार समितीच्या विजयी कुस्तीमुळे त्यांनी हुरळून जाऊ नये . आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी तर देसाई घराण्यातील त्यांच्या मातापित्यांसह दस्तूरखुद्द शंभूराज देसाई यांनाही अनेकदा पराभवाची धूळ चारली होती मात्र त्यावेळच्या विजयात दादांनी आपले राजकीय संस्कार , नैतिकता कधीही सोडली नव्हती आणि हाच आपला राजकीय आदर्श व संस्कार याच्याही आठवणी आता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला होऊ लागल्या आहे . याच महाशयांचा यापूर्वी विधानसभेला तीन तीन वेळा पराभव झालेला आहे . यापुढेही अजून बऱ्याचश्या राजकीय कुस्त्या होणार आहेत. राजकारणामध्ये सत्ता येत जात असते त्यामुळे ' पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ' याप्रमाणे आपल्या सर्व प्रामाणिक , स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळातील संघर्षासाठी तयार रहावे . हा पराभव विसरुन या निवडणुकीत आपला आत्मविश्वास कुठे चुकला , आपण नक्की कुठे कमी पडलो , गाफील राहिलो या सर्व बाबींचे चिंतन करून यातून धडा घेऊया . आपल्या सर्वांचे एकमेव ध्येय या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच आहे. त्यामुळे निदान यापुढे आपापसातील मतभेद , गटांतर्गत गटबाजी , नाराजी विसरून आपण सर्वांनी एकसंघपणे संघटित होऊन या पुढची लढाई अत्यंत निखराने द्यायची आहे. यापुढच्या सर्वच निवडणुकात आपल्याला विजयाचा गुलाल अंगावर घ्यायचा असून यासाठी आता आपल्याला संघटनेची नव्याने बांधणी करायची आहे .
आपले नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवली पाहिजे व पक्षात युवक , युवतींना संधी दिली पाहिजे असे सुचक विधान केले होते. पाटण विधानसभा मतदारसंघातही आता ती वेळ आली आहे. येथून पुढे युवा कार्यकर्त्यांना प्रवाहात आणून त्यांना जास्तीत जास्त संधी दिल्या जातील. लवकरच मी स्वतः गावागावात जाऊन युवक व ज्येष्ठ मंडळींशी संवाद साधत बैठकातून युवा कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे . बाजार समिती निवडणुकीत ज्यांनी पैसे घेऊन गद्दारी केली त्यांना माझा एकच प्रश्न आहे की तुमच्यासमोर अशी काय मजबुरी , अडचण होती ? एकदा आम्हांला तुमची अडचण सांगून तर पहायचं होतं . मतदारांना पैसे वाटून त्यांचा सन्मान व स्वाभिमान हिरावून घेण्याची आपली संस्कृती नाही . आजपर्यंत पाटणकर गटाच्या स्वाभिमानी मतदारांच्या उदरनिर्वाहासह तालुक्यातील विकासात्मक ध्येयधोरणे , नवनवीन प्रकल्प , संस्था उभारणीतूनच संबंधितांना आयुष्यभराची भाकरी तथा रोजगार व व्यवसाय निर्मितीतून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व यापुढेही त्याच आदर्शांवर आपली वाटचालही राहणार आहे . आपण नेहमीच सर्वसामान्यांसह प्रत्येकालाच सन्मानाची व स्वाभिमानाची वागणूक देतो मात्र दुर्दैवाने तरीही काही मोजक्या लोकांनी , काही हजारात चार , दोन महिन्यांच्या आपल्या स्वार्थी सोयींसाठी स्वतःचा बहुमूल्य स्वाभिमान विकून संघटनेच्या पाठीत खंजीर खुपसला.मोठ्या दादांसारख्या देव माणसाला त्रास देऊन जी गद्दारी केली त्यासाठी त्यांना नियतीच नव्हे तर स्वतःची बायका , मुलेही कधीच माफ करणार नाहीत , त्यामुळे अशा गद्दारांचाही भविष्यकाळात योग्य तो समाचार घेतला जाईल . आता झाले गेले विसरून आपण सर्वांनीच नव्या जोमाने सर्वांगीण विकासाच्या ध्येयधोरणासाठी एकत्रितपणे आगामी लढाई लढूया आणि यात आपल्याला निश्चितच यश मिळेल असा विश्वासही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला .
यावेळी आजी-माजी पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.