युवा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी माहिती कार्यशाळेचे आयोजन - प्रो.डॉ. व्ही. आर. गुरव

पाटण/ लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड)

शिवाजी विद्यापीठाच्या युवक महोत्सवाचे आयोजक महाविद्यालय संघाचे मार्गदर्शक प्राध्यापक, सहभागी विद्यार्थी यांना कला प्रकारांच्या ओळख व निकषांची माहिती करून देणे व माहिती अभावी होणाऱ्या चुका टाळण्यासाठी या युवा महोत्सव माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रो.डॉ.व्ही.आर. गुरव यांनी केले. ते येथील बाळासाहेब देसाई कॉलेज मध्ये आयोजित ‘ एकदिवसीय युवा महोत्सव माहिती कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोयना शिक्षण संस्थेचे संचालक संजीव चव्हाण होते. तर मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. पवार,कार्यशाळेचे समन्वयक डॉ. पांडुरंग ऐवळे,सहसमन्वयक प्रा. एस.एस. पवार,नँक समन्वयक डॉ. प्रशांत फडणीस   प्रा. दिपक दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

        डॉ. गुरव पुढे म्हणाले की, विद्यापीठाने युवक महोत्सवाची नियमावली बनवली आहे.या नियमावलीत विविध सांघिक व वैयक्तिक कला प्रकारांची सविस्तर माहिती व नियम आहेत.ही नियमावली सहभागी प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी अभ्यासावी. युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी व फी भरण्यासाठी यावर्षी पासून ऑनलाईन पोर्टल चा उपयोग करण्यात येणार आहे. पदवी स्तरावर शिक्षण घेत असलेला कलाकार विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर प्रवेशात ५% कोटा राखीव ठेवला आहे. यापुढे कलाकार विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरच्या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळते.शिवाजी विद्यापीठाने राज्यातील व राज्याबाहेरील विद्यापीठांशी सांस्कृतिक देवाण घेवाणाचा उपक्रम सुरु केला आहे.त्यामुळे महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.

         या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून निलेश सावे,अमोल बावकर,वैभव सतरंगे, विजय जाधव,गौरव बंडबे,साहिल जोशी,नितीन शिंदे,समर्थ जावीर,यांनी काम पहिले.यावेळी त्यांनी कला प्रकार सादर करताना होणाऱ्या चुका त्यामधील बारकावे याविषयी मार्गदर्शन केले.

        अध्यक्षीय मनोगतात संजीव चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांना ज्या कला प्रकारात आवड आहे.त्यात प्रामाणिकपणे काम करावे.कार्यशाळेमुळे कलाकार विद्यार्थ्याना मोठा फायदा होईल.तज्ञाच्या मार्गदर्शानामुळे चुका कमी होतील.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस.डी.पवार यांनी केले तर आभार कार्यशाळा समन्वयक प्रा.डॉ. पी.जे.ऐवळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दीपक पाटील व डॉ. विनायक राऊत यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. या कार्यशाळेसाठी सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



(पाटण: मार्गदर्शन करताना डॉ. गुरव सर व इतर पदाधिकारी छाया: श्रीगणेश गायकवाड)