राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)
दिनांक १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली एस टी बस धावली होती, त्याचे समरणार्थ एस टी महा मंडळाकडून प्रतिवर्षी १ जूनला वर्धापन दिन साजरा करण्यात येतो.
या वर्षी ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त 3 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सर्वत्र हा साजरा करण्यात यावा असे आदेश होते.
त्या आदेशानुसार आज ३ जून २०२३ रोजी राजापूर आगारात ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त अनेक प्रवासी, अधिकारी, कर्मचारी, व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.
या वेळी संपूर्ण राजापूर आगार स्वच्छ करण्यात आले होते. सर्वत्र झेंडू तोरणे, रांगोळ्यांनी सुशोभिकरण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे एक एसटी बस ही शुभेच्छा फलक व पानाफुलांनी सुशोभित करण्यात आली होती. त्या बससमोर उपस्थित सर्व मान्यवरांचे आगाराच्या वतीने श्रीमती पाटील आगार व्यवस्थापक यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते केक कापून, मिठाई वाटून आनंदाने वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना लोकनिर्माण वृत्तपत्राचे सहसंपादक श्री. सुनील जठार यांनी लालपरीची वाटचाल, बदलता रंगरूप आकार, ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ यांसह अनेक स्मृतींना उजाळा दिला. प्रा. जी आर कुलकर्णी यांनी एसटीची महती मार्मिक अध्यात्मिक उदाहरणे देऊन अनुभव विषद केले. उपस्थित विविध कामगार संघटनांच्या नेत्यांनी मनोगते व्यक्त केली. एसटी आगार प्रमुख श्रीमती शुभांगी पाटील यांनी एसटीच्या प्रगतीचा आढावा घेऊन उपस्थित मान्यवर व प्रवाशांसह सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी एसटी आगाराच्या सुशोभीकरणाला योगदान व सहकार्य देणारे सुवर्णकार श्री. आनंद मालपेकर, श्री. संजय पवार शिवसेना शहर प्रमुख, श्री. गोविंद चव्हाण माजी नगरसेवक, लोक निर्माण वृत्तपत्राचे सहसंपादक सुनील जठार इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बाकाळकर एसटी अधिकारी यांनी तर आपल्या सहकाऱ्यांसह समारंभाचे यशस्वी आयोजन करणारे श्री अशोक दातार यांनी आभार मानले.