रत्नागिरी लोकनिर्माण टीम
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन एसटी बसस्थानकांचे काम रखडले आहे. गेली पाच वर्षे या हायटेक एसटी स्थानकांचे काम रखडले असून, चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा या स्थानकांचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल यानिमित्त व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा आणि चिपळूण या तीन बसस्थानकांचे काम एकाचवेळी २०१७ मध्ये सुरू झाले. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी या कामांचे भूमिपूजन केले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या पालकमंत्री व परिवहनमंत्री अनिल परब यांनी या कामाकडे दुर्लक्ष केले. आता मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे या प्रकल्पाकडे लक्ष देतील का, असा सवाल एसटी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
हायटेक बसस्थानकासाठी रत्नागिरीला १० कोटी, चिपळूणला तीन कोटी ८० लाख, तर लांजासाठी एक कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक आहे. रत्नागिरीसाठी आणखी कोट्यवधीचा निधी पालकमंत्री सामंत यांनी मिळवून दिला. मात्र, वाढीव निधीअभावी चिपळुणातील हायटेक बसस्थानकाचा आराखडाच बदलल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे चिपळूण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रत्नागिरी बसस्थानकाचे काम ३६ महिन्यांत, तर लांजा व चिपळुणातील काम २४ महिन्यांत होणे अपेक्षित होते. मात्र, या इमारतीचा पाया उभा राहू शकला नाही. काही ठिकाणी उभारलेले लोखंडही गंजून गेले आहे. मुंबई-गोवा महामार्गादरम्यान चिपळूण मध्यवर्ती बसस्थानक केंद्रस्थानी आहे. या ठिकाणी २४ तास एसटीची सेवा सुरू असते. मात्र, स्थानकाची इमारत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पूर्वी जुनी इमारत बरी होती, असे म्हणण्याची वेळ आली आहे.