एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी विविध घोषणा

 

मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी 



एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मागील काही दिवसांपासून निर्णयाचा धडाका लावलाय. आता सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय.एसटी महामंगळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्यात. एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. तसेच १० वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. या योजनेला धर्मवीर आनंद दिघे नाव देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय.

तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घ्यायचं असल्यास बिन व्याजी 10 लाख रुपये कर्ज देण्य़ात येणार आहे. अभिनेते आणि एसटीचे सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एसटी डेपोच्या बाजूला सिंगल स्क्रीन सिनेमा थिएटर बनवण्यात यावं, अशी विनंती केली. याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. समृद्धी महामार्गावर एसटी हळू चालवा, तसंच प्रवासाचा वेळ कमी होत असेल तर तिकिटाचा दरही कमी करा, जास्त दर घेऊ नका, अशा सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला केल्या आहेत.