संगमेश्वर/लोकनिर्माण (धनंजय भांगे)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील आणि पैसाफंड इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्विटी कांबळे हिची कोल्हापूर येथे झालेल्या क्रिकेट निवड स्पर्धेतून महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगसाठी निवड झाली आहे.वेळोवेळी मिळत असलेल्या पाठबळामुळे क्रिकेटमध्येच करिअर करणार असल्याचे स्विटीनेही सांगितले.
स्विटीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असल्याने सुरवातीला रबरी नंतर टेनिस चेंडूवर खेळणारी स्विटी हळूहळू सीझन बॉलवर सराव करू लागली. प्रकृतीने नाजूक असूनही काटक असणाऱ्या स्विटीने अल्पावधीतच सीझन बॉल सरावाने स्वतःचा वेगळा ठसा रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट जगतात उमटवला. पालकांच्या आणि क्रीडाशिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रेरणेमुळे तिने सतत सरावावर दिलेला भर तिला जिल्हास्तरावर नेहमीच यश देत आला. स्विटीचे वडील सुधाकर कांबळे यांनी तिला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आणि सीझन बॉल सरावासाठी आवश्यक सर्व साहित्य वेळच्यावेळी उपलब्ध करून दिल्याने स्विटीमधील आत्मविश्वास वाढत गेला. जिल्हास्तरावर विविध स्पर्धात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी स्विटी अष्टपैलू महिला क्रिकेटर आहे.