राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील - शपथविधीनंतर अजित पवारांची प्रतिक्रीया

मुंबई लोकनिर्माण टीम 



आम्ही मविआ सरकारमध्‍ये शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतच का जाऊ शकत नाही, असा सवाल करत अजित पवार यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले आहे. तसेच यापुढे राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रित निवडणूक लढवतील, अशी घाेषणाही त्‍यांनी केली.  महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज (दि.२ जुलै) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी अजित पवार म्‍हणाले, “देशातील आणि राज्यातील परिस्थिती पाहता देशाच्या विकासाला महत्त्व दिले पाहिजे, असे सहकार्‍यांशी चर्चा करताना लक्षात आले. त्यामुळेच आम्ही शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत, ते देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत.”


मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. केवळ राज्याच्या विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला. तसेच केंद्रातील सर्वाधिक निधी राज्याला कसा मिळेल. देशातील जनता सुखी कशी राहिल यासाठीच हा आम्ही निर्णय घेतला आहे. यापुढील सर्व निवडणूका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच लढवू, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आमच्‍याबराेबर सर्व आमदार आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्‍ट्रवादी काँग्रेसची स्‍थापना झालीच हाेती. आता विकासाचा विचार करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांना वेगळे निर्णय घ्‍यावे लागतात. त्‍यामुळे आम्‍ही सगळ्यांनी मिळून सरकारमध्‍ये सहभागी हाेण्‍याचा निर्णय घेतला आहे. आम्‍ही आगामी निवडणुका राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्‍हावरच लढवणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.


राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. कारण महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांना सध्या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांसह ३५ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता महाष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून, ते आता शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिल्याचे वृत्त एएनआयने दिली आहे. दरम्यान अजित पवार यांनी आज (दि.२ जुलै)उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीतील छगन भूजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी देखील मंत्रीपदाची  शपथ घेतली.