महिला खेळाडुंवरील अन्यायाविरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा

 ,

पाटण /लोकनिर्माण (विनोद शिरसाट)

 राष्ट्रीय महिला कुस्तीपट्टूंवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या खा. बृजभूषणसिंह यांना अटक करा नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत पाटणसह परिसरातील तमाम क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंबरोबरच समाजातील विविध घटकांनी पाटण तहसीलदार कार्यालयावर पायी निषेध मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांचे निवेदन स्विकारण्यास तहसीलदारांनी वेळ न दिल्याने संतप्त आंदोलक महिला व युवतींनी थेट त्यांच्या केबीनमध्ये धडक देत त्यांना घेराव घातला. शासन जनतेच्या दारी, की जनता शासनाच्या दारी असा जाब विचारत आपला संताप व्यक्त केला. यावेळी तहसीलदार रमेश पाटील यांना आंदोलकांनी निवेदन सादर केले.



     राष्ट्रीयस्तरावरील खेळाडुंवर झालेल्या अन्यायाविरोधात खा. बृजभूषणसिंह यांचा निषेध करण्यासाठी पाटणसह परिसरातील क्रीडा क्षेत्रातील युवक-युवती खेळाडुंनी व समाजातील विविध घटकांनी एकत्रित येवून पाटणमध्ये सोमवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील झेंडाचौकातून हा निषेध मोर्चा निघाला तो लायब्ररीचौक मार्गे पाटण तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चामध्ये आंदोलकांनी भारत माता की जय...खा. बृजभूषणसिंह यांना अटक करा नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. मोर्चा हा तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर अनेक खेळाडूंसह समाजातील घटकांनी आपल्या तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करत खा. बृजभूषणसिंह यांचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी आंदोलकांचे निवेदन स्विकारण्यासाठी तहसीलदार रमेश पाटील यांनी वेळ न दिल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता थेट तहसीलदारांचे केबीन गाठले व त्यांना जाब विचारला. निवेदन स्विकारण्यासाठी दोन मिनिटे बाहेर चला अशी विनंती आंदोलक वारंवार करत होते. मात्र तहसीलदार आपल्यावर मतावर ठाम होते. काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. राष्ट्रीयस्तरावरील महिला खेळाडुंवर होणाऱ्या अत्याचारविरोधात पाटणमध्ये युवती, महिला मोठ्यासंख्येने एकत्रित आल्या होत्या. मात्र त्यांच्या भावनेचा विचार न करता तहसीलदार आपल्या केबीनमध्ये बसून राहिले. मग हे जनतेचे कसले प्रशासन? तहसीलदार कोणत्याही राजकीय पक्षाचे नसतात, सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच असतात. देशात सर्वत्र या घटेनचा निषेध होत असताना तहसीलदारांना याचे गांभिर्य नसेल, कॅबीनमधून बाहेर येण्यास त्यांना वेळ नसेल ही खेदाची बाब आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला व युवतींमधून उमटत होत्या.

       अखेर केबीनमध्येच तहसीलदार रमेश पाटील यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात म्हटले आहे, आपल्या भारत देशाला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. तसाच खेळाचाही अभिमानास्पद गौरवशाली इतिहास आहे. या देशात खेळ व खेळाडू घडवण्यासाठी शालेय शिक्षणापासून ते आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील क्रीडा क्षेत्रातील सर्व घटक, तन, मन, धन अपूर्ण कार्यरत असतात. ज्या कुस्ती खेळाडूंवर अन्याय झाला आहे ते सर्व खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक विजेते आहेत. भारतातील प्रत्येक माणसासाठी ती प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत. जर या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडुंवर अन्याय होवूनही त्यांचे म्हणणे ऐकले जात नसेल तर भविष्यात खेळ व खेळाडू यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची भिती व्यक्त होत आहे. अशा खेळाडूंवर अन्याय करणाऱ्या खासदार बृजभूषसिंह यांचा तमाम क्रीडा क्षेत्रातील व समाजातील सर्व घटकांच्यावतीने निषेध व्यक्त करतो. या खेळाडुंनी केेलेल्या त्यांच्यावरील आरोपांची शहानिशा करून आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सातारा, जिल्हाधिकारी, तहसीलदार पाटण यांना देण्यात आल्या आहेत. या आंदोलनामध्ये पाटणसह परिसरातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक, युवक, युवती, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.