राजापूर अर्बन बँकेची अभिमानास्पद कामगिरी - ना. उदय सामंत

राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार)

 एका क्रेडीट सोसायटीचे बँकेत झालेले रूपांतर, सभासद, कर्जदार, ठेवीदार यांचा दृढ विश्वास आणि संचालक मंडळांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेला पारदर्शक कारभार यामुळेच आज कोकणातील एक अग्रगण्य बँक म्हणून राजापूर अर्बन बँकेने कोकणातच नव्हे तर राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे. राजापूर अर्बन बँकेची एकूणच प्रगती आणि वाटचाल ही तमाम राजापूर वासीयांसाठीच नाही तर आंम्हा सर्वांसाठीच अभिमानास्पद अशी आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी येथे काढले.येथील अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी सांगता सोहोळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून ना. सामंत बोलत होते. शहरातील पाटिलमळा येथील यशोदिन शृष्टी सभागृहात बँकेचे अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर   खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र ठाकूरदेसाई, बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, शताब्दी सांगता सोहळा समितीचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे सर्व संचालक आदि मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना ना. सामंत यांनी बँकेच्या एकूणच कामकाजाचे कौतुक केले. बँकेचा कारभार पादर्शक असल्यानेच बँकेने प्रगती साधल्याचे नमुद करत विद्यमान अध्यक्ष हनिफ मुसा काझी यांचेही ना. सामंत यांनी कौतुक केले. ते सगळयांनाच आपलेसे वाटतात त्यामुळेच ते चांगले काम करतात असेही त्यांनी नमुद केले. सहकारातील अनेक मोठया बँका कशा पध्दतीने बंद झाल्या हे आपण पहात आहोत, यात सभासदांचा दोष नव्हता तर काम करणाऱ्या त्या त्या संचालक मंडळाचा दोष होता म्हणून सभासदांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र राजापूर अर्बन बँकेने आपल्या पारदर्शक कारभाराने आणि सर्वसामान्य सभासद केंद्र बिंदू मानून काम केल्याने ही प्रगती साधल्याचे त्यांनी नमुद केले. आमच्या सारख्या चांगल्या राजकारण्यांनाही आता कर्जपुरवठा करा आंम्ही नक्कीच वेळेत परतफेड करू अशी मिश्कील टीप्पणीही ना. सामंत यांनी यावेळी केली.

राजापूर अर्बन बँकेने आपल्या कार्यपध्दतीने कोकणात नव्हे तर राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा गौरवशाली बँकेच्या कार्यक्रमाला येऊन आपली देखील उंची वाढली असेही ना. सामंत यांनी नमुद केले. बँकेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो अशा शुभेच्छा देतानाच भविष्यात सरकारकडून जे काही आवश्यक सहकार्य हवे असेल ते आपण कायमच देऊ अशी ग्वाहीही ना. सामंत यांनी यावेळी दिली.

प्रास्ताविकपर भाषणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या एकूणच प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी अनिल ठाकूरदेसाई, खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी यांनी बँकेला शुभेच्छा दिल्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात हनिफ काझी यांनी बँकेच्या आजपर्यंतच्या प्रगतीत त्या त्या काळातील सर्व संचालक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा मोलाचा वाटा असून आजपर्यंतची बँकेची प्रगती ही राजापूरकरांचा गौरव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी आणि आपले सहकारी संचालक मंडळ यांच्या सहकार्यातुनच बँक प्रगती साधत असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी ना. सामंत यांसह उपस्थित मान्यवरांचा बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रारंभी दिप प्रज्वलनाने या शतकमहोत्सव सांगता  समारंभ कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बँकेच्या शतकमहोत्सव सांगता समारंभा निमित्त बँकेला शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राजापुरातील प्रसिध्द छायाचित्रकार प्रदीप कोळेकर यांच्या शतकोत्तर काळातील राजापूर कसे होते या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचा शुभारंभही ना. सामंत व मान्यवरांच्या हस्ते झाला.  या कार्यक्रमाचे सुत्र संचालन अभिजित गोडबोले यांनी केले तर आभार उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांनी मानले.

या कार्यक्रमाला राजापूरसह जिल्हयातील विविध बँकांचे अध्यक्ष्, संचालक, अधिकारी , राजापूर अर्बन बँकेचे माजी संचालक, शहरातील नागरिक व्यापारी, सभासद वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.