शिक्षकांच्या लेखणीतून... राजेश सोहनी

 


 


शिक्षक आणि शाळा यांच्यामधलं नातं अतिशय घट्ट असतं. शाळा शाळेतील सहकारी आणि विद्यार्थी म्हणजे शिक्षकासाठी दुसरं कुटुंबच असतं. विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शाळेची आठवण येते त्याचप्रमाणे शिक्षकाला देखील शाळेचे पुन्हा पुन्हा स्मरण होतच राहते. सुट्टीत घरी असतानाही शिक्षक मनाने शाळेतच असतात. असेच एक तनाळी शाळेचे *शिक्षक श्री. राजेश सोहनी सर* यांच्या लेखणीतून शाळेबद्दलची आपुलकी स्नेह पुढील लेखात पहावयास मिळत आहे. त्यांनी शब्दबद्ध केलेले शाळेचे मनोगत येथे देत आहोत.



*अन् शाळा बोलू लागली* …..


लॉकडाऊन नंतर अनेक दिवसांनी मी माझ्या शाळेत गेलो.शाळेचे फाटक उघडून आत प्रवेश केला. प्रथम ज्ञान मंदिराला नतमस्तक झालो अन् आशाळभूत पण तितक्याच भुकेल्या नजरेने शाळेकडे नजर भिरभिरवू लागलो.कोपरा न कोपरा नजरेतून न्याहाळत होतो. अन् अचानक … नमस्कार गुरुजी!... एक साथ नमस्ते !...आणि टाळ्यांचा आवाज कानी घुमू लागला...क्षणभर काहीच समजेना …सर्व वर्ग बंद आहेत …शाळेत विद्यार्थी नाहीत…मी कोणत्याही वर्गात गेलो नाही…मग माझे स्वागत अगदी मराठ मोळ्या वातावरणात कोण करतय ? अहो गुरुजी ! मीच …हो! मी आपली शाळा …तनाळी शाळा …काहीच उमजेना…मग भानावर आलो ... अन् ऐकतो व पाहतो तर काय …मित्रानो! चक्क माझी शाळा मला हाका मारीत होती …माझ्याशी घडाघडा बोलू लागली होती !!मी हि तिला नमस्कार केला .काय गुरुजी ? किती वाट  पहातेय मी तुम्हा सर्वांची ! कुठे आहात तुम्ही सर्वजण ? अन् माझी चिमणी पाखरं ? खरंतर कुठे जाण्याच्या आधी असं कधीच घडलं नाही कि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं नाही. पण ..पण यावेळी मात्र मला न सांगताच सर्वजण निघून गेलात…मी म्हटलं घाई गडबडीत कदाचित विसरला असाल …याल दोन ,चार दिवसांनी ..म्हटलं मार्च महिना …परीक्षा आहेत… येतील सर्व…त्यानंतर इयत्ता सातवीचा निरोप समारंभ …सगळं कस नियोजित असत  तुमचं …ठरलेल्या दिवशी अन् ठरलेल्या वेळेत …माझी ही छोटी छोटी पाखरं मला सोडून पुढील शिक्षणासाठी जाणार !त्यांना भेटायचं राहून गेलं .किती वाट  पहात होते ! गेली सात वर्षे ज्यांना अंगाखांद्यावर खेळविली ती मला सोडून जाणार होती..दुःख तर होतचं ..पण माझ्या  या क्षणिक दुःखापेक्षा माझ्या मुलांची भविष्यातील स्वप्ने साकार करायला त्यांना पुढील शिक्षण घेणे गरजेचे आहे तेव्हा त्यांना निरोप तर द्यायला हवाच! या प्रसंगी चेहेर्‍यावर आसू न आणता हासू ठेवून निरोप द्यायचा …तेही यंदा नाही .मग मात्र मी जरा घाबरले….काळजीत पडले…विचार करू लागले. पण कोणाला विचारावे ? कुणीच दृष्टीस पडेना !गुरुजी, तुम्ही आणलेला सोनचाफा…तो पहा.. पार सुकून गेला..अबोलीची फुले सुकून गेली..सदाफुलीचे झाड कोमेजून गेले..कमळाची फुले तर कधी उमललीच नाहीत …कारण त्यानाही वाटले त्याच्याभोवती फिरणारे छोटे छोटे भुंगे शाळेत येईनासे झालेत  …नारळाचे  झाड विरहाने गतप्राण झाले…तुम्ही लावलेला पांढरा चाफा कधी फुललाच नाही…कुंडीतील तुळसही झुरून गेली…तुम्ही उभारलेली वाचन कुटी वादळ वाऱ्याबरोबर उडून गेली…सांगता सांगता शाळेला अश्रू अनावर झाले …मधेच हुंदका देत म्हणाली.. अन् माझे हाल तर काय सांगू? कुणीच नाही बोलायला..कुणीच नाही खेळायला …सगळं कसं शांत! …हि शांतता मला खाऊ लागली ..मी एका वेगळ्याच तणावाखाली गेले.. अन् वेड्यासारखी तुम्हा सर्वांची वाट  पाहू लागले…काय न काय सांगू …दशा दशा झाली ! मग मी विचार करू लागले..डिसेंबर - जानेवारी मध्ये क्रीडास्पर्धाच्या निमित्ताने मला खूप सजवलं ,नटवल होत ना ..गोकुळ भरलं होत ना शाळेत ! कदाचित कुणाची नजर तर लागली नाही ना !अशा एक ना अनेक शंका कुशंका मनात घर करू लागल्या .आज तुम्हाला पाहिले… मनाला नवी उभारी आली…तुमच्या पाठोपाठ ग्रामस्थही आले. पण अजुनही माझी मुले मला दिसत नाहीत… कधी येणार ती? मला त्यांना भेटायचंय…त्यांच्याशी खूप खूप बोलायचंय… त्यांच्याशी खेळायचंय , बागडायचंय  … पुनश्च एकदा पाटीवर अक्षरे गिरवायचीत …परीपाठापासून ते गृहपाठापर्यंत सर्व उपक्रम सुरु करायचेत ..पाढे ,कविता म्हणायच्या आहेत …संगणकाशी मैत्री करायचेय ..परसबागेतील फुलांसोबत शाळेतील कोमल ,निर्मल कळ्यांना स्वछंदपणे  उमलू द्यायचेय.…पुन्हा नव्याने उत्साहपूर्ण व जोशपूर्ण सुरुवात करायचीय …गुरुजी ! मग कधी सुरुवात करताय?इतक्यात शाळेच्या फाटकाच्या आवाजाने भानावर आलो. शाळा कधी सुरु होईल याचा विचार करू लागलो. आदेशाची वाट पाहू लागलो . अन् नकळत प्रार्थनेच्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या…“हि आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जसा माउली बाळा”


 राजेश सोहनी,


    चिपळूण


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image