ध्येयपूर्तीची जीत - सीए अभिजीत ! लेखक - श्री. मनोज अंबिके (  पुस्तक परिक्षण  )


        ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने जिद्दीने मार्गक्रमण केले तर यश निश्चितच आपले स्वागत करेल पण प्रतिकूल परिस्थितीत जिद्द बाळगून मेहनत करून सीए  होण्याचं स्वप्न साकार करणाऱ्या अभिजीतच्या संघर्षमय जीवनयात्रेतील मैत्री आणि मानवतेच्या सुंदर गुंफणातून अभिजीतच्या जडणघडणीचा प्रेरणादायी आणि स्फुर्तीदायी वास्तववादी जीवनपट लेखक श्री. मनोज अंबिके यांनी आपल्या सहज सुंदर लेखणीने  ' स्लमडॉग सीए - एक संघर्षमय सत्यकथा ' या पुस्तकातून उभा केला आहे.
        वयाच्या २३ व्या वर्षी सन २०१२ मध्ये सीए होण्याचं स्वप्न साकार करणाऱ्या अभिजीत थोरात या तरूणाची संघर्षमय सत्यकथा वाचताना मन हेलावून जातं, डोळे पाणावतात आणि कथानकातील पात्रांबरोबरच अभिजीत या कथानायकाशी आपण एकरूप होऊन जातो.
        २०१७ मध्ये पुणे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन झाले असून प्रकाशन समारंभात सुप्रसिध्द अॅडव्होकेट मा. उज्वलजी निकम सर यांच्या हस्ते अभिजीतचा सत्कार करून गौरविण्यात आले आहे.
        आपल्या ध्येयावर निष्ठा असेल तर प्रतिकूल परिस्थितीही आपण बदलू शकतो आणि इच्छित ध्येयापर्यंत पोहचू शकतो हा सकारात्मक विचार अभिजीतच्या संघर्षमय जीवनाच्या वाटचालीतून मिळतो.
        आईचे संस्कार उज्जवल भविष्य घडवित असतात. अभिजीतच्या आईंचं कौतुकच नव्हे तर त्यांच्याही जिद्दीला सलाम ! त्या माऊलीनं पोटच्या गोळ्याला शेजारणीनं मागितलं म्हणून न देता स्वतः खस्ते खात कष्ट करून चांगल्या संस्कारांनी अभिजीतला आपलं म्हणून वाढवलं. त्या माऊलीचे धैर्य, सोशिकता आणि कष्ट करण्याची ताकद अभिजीतला पुढे पावलापावलावर बळ देत गेली. पुढे जातानाही अभिजीत भूतकाळातील आपल्या परिस्थितीला, आईच्या कष्टांना विसरला नाही. आईच्या कष्टाचे मोल शिकता शिकता कमवून शिकून अभिजीतने सार्थकी केले. आईच्या संस्कारामुळे मिळालेले हे यश हा अभिजीतने आईला मिळवून दिलेला सन्मानच आहे !
        सावत्र आई भावंडांनी अभिजीतला सावत्र समजलं नाही उलट आपलेपणाने त्यांनी अभिजीतला प्रेम, आस्था, माया दाखविली आणि अभिजीतनेही त्यांनाही सावत्र न समजता त्यांच्याही प्रेमाचा आदरच केला. नात्याचं हे एक चांगलं उदाहरण या संघर्ष कथेत पाहायला मिळतं.
        लहानपणी चार पैसे हातात यावेत यासाठी मित्रांच्या संगतीत काही उपद्व्याप घडूनही गेले पण मित्रांच्या संगतीत अभिजीतने वाईटाचा मार्ग वा व्यसनांना जवळ केलं नाही आणि मित्रांनीही त्याला आपल्यासारखं न बनवता त्याच्यातील चांगल्या गुणांना नेहमीच प्रोत्साहन दिलं. बाळूने अभिजीतला ' बाळकडू ' च देऊन वेळोवेळी नवी हिंमत दिली. प्रत्येक अडचणीच्यावेळी मार्ग दाखवून ' तू लढ ' असा आत्मविश्वास अभिजीत मध्ये दृढ केला.
        आईने दप्तर म्हणून शिवून दिलेली पिशवी आनंदाने शाळेत घेऊन गेलेल्या अभिजीतला वर्गातील मुलं चिडवू लागल्याने तो हिरमूसला मात्र ' दप्तरात काय आहे यापेक्षा डोक्यात काय आहे हे महत्तवाचं ' हा मोलाचा विचार शेखबाईंनी अभिजीतला दिला त्यातूनच नंबर आला तर मला दप्तर मिळेल या जिद्दीने मिळविलेल्या पहिल्या नंबरच्या बक्षिसाने अभिजीतला जीवनाची दिशा मिळाली.


' आशा पल्लवीत असतील मनात 
       तर मार्ग सापडतो यशाचा 
     प्रयत्नांना जोड कृतीची दिली 
     की आनंद मिळतो विजयाचा '


        अभिजीतच्या आयुष्यातील सर्वात महत्तवाचा ' टर्निंग पॉईंट ' असेल तर तो विक्रांतदादांनी केलेली अनमोल मदत !
समाज भले मला कोणत्या दृष्टीने पाहतोय यापेक्षा अभिजीत मधील चांगल्या गुणांची आणि जिद्दीची पारख विक्रांतदादांनी केली आणि योग्यवेळी त्यांनी केलेल्या अनमोल मदतीमुळेच अभिजीतच्या ध्येय निश्चितीला योग्य दिशा मिळाली. विक्रांतदादांनी केलेल्या मदतीचे एक प्रेरणादायी वास्तव समोर आलं आहे. योग्यवेळी योग्य मदत हे मानवतेचं सत्य विक्रांतदादांच्या मदतीने अधोरेखीत झालं आहे. विक्रांतदादांनी अभिजीत मध्ये आत्मविश्वास पाहिला आणि तू नक्की सीए होणार असं सांगितलं.
        झावरे सर, चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन त्याचबरोबर राठोड सरांनी सीए होण्याचं ध्येय दाखवून अभिजीतला नवी उर्जा दिली. अभिजीतने पुस्तकांना जवळ केलं आणि वेळेचा पुरेपूर वापर आपल्या ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यात केला. नरवडे सरांकडे काम करता करता त्यांच्याच ऑफिस मध्ये अभ्यास करत कॉम्प्यूटर शिकण्याचे वेड खरंच वाखाणण्यासारखं आहे. 
        बालमित्रांची साथ आणि प्रोत्साहन, पुण्यात रमेशची साथ, दत्तवाडीतील काकूंचा आधार, लायब्ररीयनचे मार्गदर्शन, नरवडे सर त्यांच्या पत्नी, अभिजीतचं दडपण दूर करणारा सुशील, योगेश सरांबरोबर जुळलेले बंध या सर्वांची अभिजीतच्या यशात मोलाची मदत झाली. अनेक अडचणी आल्या पण प्रत्येकवेळी मानवतेचं दर्शन घडविणारी माणसं अभिजीतला भेटली आणि अडचणीतून मार्ग निघत गेला.


' प्रयत्नांची चालावी वाट 
       वेचित यशाचे कण कण 
  उशीर असतो पण येतेच वेळ 
       आनंदाचे फुलण्या क्षण '
      
        इंटर्नशीप करताना प्रांजल सोबत जुळलेले सूर ... गुंतता हृदय हे ... प्रेमबंधात दृढ होऊन प्रेमाचे सुखद क्षण आयुष्याचे जोडीदार - जीवनसाथी बनण्यात सुखाचे झाले. आयुष्याच्या जोडीदाराची प्रांजलची सुयोग्य निवड दाद देणारीच आहे. त्याचबरोबर ध्येयपूर्तीच्या टप्प्यावर प्रांजलच्या आईवडिलांनी प्रांजळपणे दिलेला ' होकार ' आणि ' स्वीकार ' हा अभिजीतच्या जीवनातील यशपूर्तीचा महत्तवाचा भाग आहे. मोठा मित्र परिवार असलेले आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वपरिचित असलेले चिपळूण - कापसाळ येथिल रहिवाशी व पाटबंधारे विभागातून सेवा निवृत्त श्री. रविंद्र यशवंत बागवे व पोस्ट ऑफिस चिपळूण मधून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारलेल्या त्यांच्या पत्नी सौ. प्रज्ञा रविंद्र बागवे या दांपत्यांचा अभिजीत थोरात हा आता जावई आहे.


    ' प्रयत्नांचे झाले सार्थक की 
  आनंद रूतून राहतो काळजात 
    त्या आनंदाचा गंध दरवळतो 
        अनेकांच्या मनामनात '


        दुसऱ्याने केलेल्या मदतीचा सदुपयोग कराच पण त्याचबरोबर मदत मिळतेय म्हणून तुम्ही स्वतः दुबळे बनू नका तर मेहनत करून स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका हा एक चांगला संदेश अभिजीतच्या संघर्षमय जीवनपटातून तरूणांपुढे येतोय. 
        अभिजीतच्या यशाबरोबरच त्याला साह्य करणाऱ्या सर्वांचं योगदान मोलाचं आहे. जिद्द असेल तर परिस्थिती बदलता येते हे प्रेरणादायी स्त्रोत अभिजीतच्या संघर्ष कथेतून मिळते. काळ भविष्य घडवत असतोय पण सरलेला भूतकाळ कितीही मोठं झालो तरी विसरायचा नसतो हे अभिजीतच्या नम्रतेचं यश निश्चितच प्रेरणादायी आहे. अभिजीत मधील विनयशीलता, नम्रपणा , ध्येयाशी एकनिष्ठ प्रामाणिकपणा आणि जिद्दीला सलाम ! 
        ज्या परिस्थितीतून अभिजीत घडला, निश्चयाने सकारात्मक दृष्टीकोन बाळगून ध्येयाचं यशपर्व गाठलं त्या पर्वातूनही इतरांनाही घडविण्याच्या त्याच्या तळमळीला परमेश्वरी कृपा नक्कीच लाभेल !
        अभिजीत यांनी १० वर्ष निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीत काम करत CFO या पदापर्यंत मजल मारली. आता पुणे - नवी पेठ येथे आणि स्वतःच्या गावी शिरूर येथे एबी थोरात अॅण्ड कंपनी नावाने स्वतःचे ऑफिस सुरू केले आहे. ' ऑल इंडिया अकाऊंटस् ग्रोथ अॅण्ड डेव्हलपमेंट फोरम ' आणि लायन्स क्लब यांसारख्या संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. गरीब आणि गरजू मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आणि योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी ' नादान परींदे ' नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आहे. त्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये अनेक IAS , IPS , IRS , CA , CS , आणि  ICWA घडविण्याचं ध्येय त्यांनी हाती घेतलंय ही खूपच कौतुरास्पद बाब आहे.
        अभिजीत यांच्या भावी वाटचालीस आणि ' जीत ' अर्थाने अधोरेखीत संकल्पांना मनस्वी शुभेच्छा !


    ' आईच्या संस्कार शिदोरीतून 
       विनयशील नम्रतेतून प्रेरीत 
            स्लमडॉग सीए ची 
              ध्येयवेडी जीत ! '


        
        चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या मार्गावर असणारे  प्रेरणादायी आणि वाचल्यावर आपला दृष्टीकोन बदलायला लावणारे हे पुस्तक जास्तीत जास्त विद्यार्थी - तरूणांनी वाचावे अशी अपेक्षा आहे.


● ' स्लमडॉग सीए - एक संघर्षमय सत्यकथा '


लेखक - श्री. मनोज अंबिके 
माय मिरर पब्लिशिंग हाऊस, सहकार नगर - पुणे- २


संपर्क :- ९४२२३१६६८९


--- अभिजित शशिकांत पिसे
         ' अक्षरशिल्प ' 
( खेंड ) चिपळूण, ता. चिपळूण
     जि. रत्नागिरी - ४१५६०५
         -- ९९७५५५४०१४