काळ्या मातीत मातीत ... कवी - अभिजित पिसे

 


 


        बरसलेल्या पाऊसधारांनी सृष्टीत जीव आलेला. वातावरणात विलक्षण गारवा अन् आश्वासक होऊन राहिलेली चिंब धरा.... मोत्यांच्या दाण्याचे सपान डोळ्यात साठवून बळीराजा सुखावून गेलेला. आता काळ्या मातीच्या कुशीत बीज अंकुरू लागलेले. नभ ओथंबताना थेंब अन् थेंब पावसाचा संजिवक होऊन सृष्टीला जीवनअर्थ देत राहिलेला.


        कसं रूसलं आभाळ ... रान माझं करपलं ... सपान गेलं जळून ... माझं काळीज फाटलं ... शिवार झालं ओसाड ... गेली पाखरं पल्याड ... उरातील वेदना ... दडे पापणीच्या आड ... जगावं की मरावं ... डोळं आभाळाला लागलं ... दया आली देवाला ... आज आभाळ उतरलं... आभाळमाया बरसली ... सारं रान गारावलं ... धरणीमायेच्या कुशीतून ... हिरवं तन तरारलं ... आता फुलेल माझं शिवार ... शुभ्र दाण्याचं दिस येतील ... माझ्या हिरव्या रानात ... गाणी पाखरं गातील ...


        उतरे भरून आभाळ ... धरतीच्या डोईवर ... हळूवार गंध मातीचा ... चाले झर्रर्र झर्रर्र नांगर ... अंकुरे बीज ... काळ्या मातीच्या कुशीत ... हिरव्या शिवाराचं सजे ... सपान डोळ्यात ... फांदीवर किलबिल ... ओलेे चिंब पक्षी ... लाल काळ्या मातीवर ... सजे हिरवळीची नक्षी ... ओठात पाखरांच्या गोड मंजूळ वाणी ... पानापानात सळसळ ... शिवारात पाऊसगाणी ... उतरे भरून आभाळ ... टळो दुष्काळ दुष्काळ ... नदी नाल्यात पाण्याचा ... नाद खळखळ खळखळ ...


        निळ्या आभाळात ... नभ भरून काळा आला ... थेंबाथेंबाने सरींत ... पाऊस बरसत आला ... शेतात माझ्या सोनं पेरून गेला ... डोळ्यात शिवाराचं ... सपान देऊन गेला ... धरती न्हाऊन गेली ... रान झालं हिरवंगार ... मनी चैतन्याची जाग आली ... फुलून हसलं शिवार ... शेतात माझ्या ... खळाळलं पाणी ... जागलं सपान पावसाला ... पिक आलं सोन्यावाणी ...


 


         *तहानलेल्या भूईला* 


         *तृप्त मिळाला थेंब* 


         *जीव देऊन सृष्टीला* 


        *जीवनअर्थ झाला थेंब*


 


--- *अभिजित* *शशिकांत* *पिसे*


         ' *अक्षरशिल्प* ' 


( *खेंड* ) *चिपळूण*, *ता*. *चिपळूण*


     *जि*. *रत्नागिरी* - *४१५६०५*


         -- *९९७५५५४०१४*