सुवर्णयोगकन्या रिद्धी बाचीम 


   २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग ही भारताच्या पुरातना परंपरेची भेट आहे. योग म्हणजे मनाच्या आणि शरीराच्या ऐक्याचे प्रतिक आहे. योग म्हणजे माणूस आणि निसर्ग यांच्यातील सामंजस्य. योग म्हणजे संयम आणि सातत्य यांमधील एक दुवा.


     भारताच्या या अमूल्य परंपरेला अनेकानी जपलंय, वृद्धिंगत केलंय. यात एक नाव नक्कीच आठवते ते म्हणजे रिद्धी क्रांतीकुमार बाचीम. आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून या योगकन्येविषयी अधिक जाणून घेऊ आजच्या या विशेष लेखामध्ये...


    चिपळूण ची कन्या रिद्धी बाचीम अगदी लहान वयापासूनच योग हा विषय आत्मसात केला आहे. वयाच्या ४थ्या वर्षापासून रीद्धीचे आजोबा कै. बाचीम गुरुजी यांच्या द्रष्टेपणाने आणि प्रोत्साहाने रिद्धीच्या योगाभ्यासाला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे तिचीदेखील योगामध्ये रुची वाढू लागली. तिच्या या रुचीला अधिक वर्धित करण्याचे संपूर्ण श्रेय जाते ते कोव्यास व्यायामशाळेला. कोव्यासच्या सर्वेसर्वा श्रीमती सुमतीताई जांभेकर त्याचप्रमाणे शिक्षक श्री. मनोहर पवार आणि श्री. मंगेश खेडेकर यांचे सुयोग्य मार्गदर्शन रिद्धीसाठी अतिशय उपयुक्त ठरले. शिकवलेल्या सर्व धड्यांचा परिपूर्ण अभ्यास करत रिद्धीची वाटचाल सुरु झाली पुढील टप्प्याकडे म्हणजेच योगासन स्पर्धांकडे.


    शालेय शिक्षणाचा श्रीगणेशा करतानाच रिद्धी पहिल्या स्पर्धेत सहभागी झाली त्यावेळेस ती ज्युनिअर केजी मध्ये होती. तिला स्टेज डेअरिंग मिळणे हाच केवळ हेतू होता. बक्षिसांची अपेक्षा न करता आपल्या सादरीकरणावर भर देण्याचे प्रयत्न करायचे हे ब्रीदवाक्य तिच्या मनात तिच्या गुरुवर्यांनी सुरुवातीपासूनच बिंबवले. याचा खूप मोठा फायदा तिला पुढील वाटचालीत मिळाला.


     स्पर्धेच्या या युगात आपले अस्तित्व टिकवायचे म्हणजे मेहनत हि आलीच. सरावानेच सादारीकरण उत्तम होते याची समज आल्यामुळे दिवसातून दोन वेळा आणि तेही पहाटे ४ ते ६ आणि संध्याकाळी ५ ते ७ अशा वेळेमध्ये रिद्धीची योग दिनचर्या सुरु झाली. रिद्धीलाही घरच्यांच्या तिच्याविषयीच्या अपेक्षांची कल्पना आली आणि ती अधिक मेहनत घेऊ लागली. तिची हि मेहनत फळाला आलीच आणि लवकरच महाराष्ट्र योगा संघामध्ये तिची निवड झाली. योगासन स्पर्धा म्हटल्या कि रिद्धीचे नाव आपसूकच यायला लागले आणि तिला जणू याची सवयच झाली. वयाच्या ५व्या वर्षापासूनच ते आजपर्यंत रिद्धीने अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत आपले वर्चस्व राखून ठेवले आहे. त्यापैकी काही महत्वाच्या स्पर्धा आणि त्यातील क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.


सन २०१४      योगविद्या गुरुकुल, नाशिक                            प्रथम क्रमांक


सन २०१४      मुंबई महापौर स्पर्धा                                  प्रथम क्रमांक


सन २०१४      विभागीय शालेय स्पर्धा                               प्रथम क्रमांक


सन २०१४      स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धा, आग्रा                        प्रथम क्रमांक


सन २०१४      पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा, मलेशिया                    चतुर्थ क्रमांक


सन २०१५      सर्व शालेय स्पर्धा                      


सन २०१६      नेशनल योग चैंपियनशिप स्पर्धा                                                 प्रथम क्रमांक


सन २०१६      योग कल्चर स्टेट चैंपियनशिप                                                  द्वितीय क्रमांक


सन २०१६      स्टेट योगा चैंपियनशिप                                                              प्रथम क्रमांक


सन २०१६      फेडरेशन स्पर्धा                                      प्रथम क्रमांक


सन २०१७      नेशनल योग चैंपियनशिप स्पर्धा                                                  प्रथम क्रमांक


सन २०१७      विभागीय स्कूल                                     प्रथम क्रमांक


सन २०१७      रिदमिक राज्यस्तरीय शालेय योगा                      प्रथम क्रमांक


सन २०१७      एम इ एस इस्तीत्युत ऑफ हेल्थ सायन्स                प्रथम क्रमांक


सन २०१७      औरंगाबाद मेयर कप स्पर्धा                            प्रथम क्रमांक


सन २०१८      ३७वी महाराष्ट्र स्टेट चैंपियनशिप मलकापूर                               द्वितीय क्रमांक


सन २०१८      मुंबई महापौर योग स्पर्धा                              प्रथम क्रमांक


सन २०१८      योग फेडरेशन ऑफ इंडिया                             तृतीय क्रमांक


सन २०१८      अनेक शालेय स्पर्धासोबत महर्षी पतंजली राज्यस्तरीय


योग पुरस्कार     


       आज हि सुवर्णयोगकन्या इयत्ता दहावीमध्ये एस.पी.एम स्कूल, परशुराम येथे शिकत आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरु केलेली योगतपस्या रिद्धी दररोज न चुकता करत आहे. यापुढील तिचे आयुष्यदेखील योगासाठीच असेल असा तिचा मानस आहे. रिद्धीसाठी योग म्हणजे सर्वस्व आहे. तिच्या मार्गक्रमणेत तिच्या गुरूंप्रमाणेच तिचे आई, वडील, काका, काकी, आजी, आजोबा यांची देखील अमुल्य साथ लाभली आहे. तिचा हा योगाप्रवास नक्कीच तिला उज्वल भविष्याकडे नेईल.