राष्ट्रपिता महात्मा गांधी ( जयंती निमित्ताने विशेष लेख) - लक्ष्मण राजे

                   


 


       देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रज सरकारच्या विरुद्ध अहिंसावादी या तत्वाचा वापर करून इंग्रजांना वठणीवर आणणारे महान क्रांतीकारक महात्मा गांधी! ९जानेवारी १९१५ साली काँग्रेसचे उदारमतवादी नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सल्ल्याने महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले.


     महात्मा गांधीजी गोपाल कृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरू मानत असत. त्यावेळी महात्मा गांधी भारतात परत आले त्यावेळी ते एक राष्ट्रवादी नेता, संयोजक आणि संघटक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळवली होती. महात्मा गांधी यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संतुलन आणि व्यवस्थेच्या आत मध्ये राहून काम करणे यासारख्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला होता. गोपाळकृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. भारतात आल्यावर गांधीजी देशातील विविध भागात जाऊन राजकीय, धार्मिक आणि सामाजिक विचार विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. देशातील सर्वसामान्य लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून ते खूप दुःखी झाले. भारतातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रह करण्याचा त्यांनी निश्चय केला.


     १९१५ साली बापू चंपारण या ठिकाणी गेले. गांधीजींनी तेथील अन्याय झालेल्या जनतेला एकत्र केले व त्यांना अहिंसेच्या मार्गाने मोठं आंदोलन करून  न्याय मिळवून दिला.महात्मा गांधीजी अहिंसेचे पुजारी असल्यामुळे त्यांनी असहकार, अहिंसा आणि  शांततामय विरोध ही तीन शस्त्रे वापरली.१९१९ साली पंजाब येथील जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे देशातील लोकांच्या मनात इंग्रज सरकार बद्दल भडका उडाला. देशात जागोजागी मोर्चे निघाले. ते मोर्चे दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारला खूप दमछाट करावी लागली. महात्मा गांधी यांनी जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी इंग्रज  सरकारचा निषेध केला. सन १९२० साली लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेचे संपूर्ण नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे आले. असहकार  चळवळीनुसार  देशातील नागरिकांना शासकीय कार्यालये, न्यायालय, परदेशी वस्तू, सहकारी शाळा-महाविद्यालये यांच्यावर  बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. सन १९२२ साली उत्तर प्रदेशातील राज्यातील गोरखपुर जिल्ह्याच्या चौरी चौरा भागात एका शांततापूर्वक झालेल्या मिरवणूकी वर पोलिसांनी गोळीबार केला. त्यावेळी गोळीबारा मुळे नागरिक फार चिडले.त्यांनी प्रत्युत्तर म्हणून पोलिस चौकी जाळून टाकली. या  जाळपोळीत एक पोलीस  अधिकारी व  २२ पोलिस ठार झाले. या घटनेची माहिती जेंव्हा गांधीजीना मिळाली तेंव्हा ते फार अस्वस्थ झाले. लोकांनी असे करायला नको होते.अहिंसेच्या  मार्गावर चालताना असे प्रसंग उद्भभवतातच. गांधीजींना वाटले की आपण लोकांना अहिंसेच्या मार्गावर चालायला लावले पण ते  इतके सोपे नाही, म्हणून त्यांनी असहकार चळवळ मागे घेतली. चौरीचौरा  प्रकरणी महात्मा गांधीजींना कैद  करण्यात आले. गांधीजींनी मार्च १९२२ साली सुरु केलेल्या यंग इंडिया नावाच्या साप्ताहिक पत्रिकेत त्यांनी  स्वतः तीन राजद्रोही लेख लिहिले, म्हणुन त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे त्यांना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला.


     गांधीजी कैदेत असताना  त्यांची तब्येत खराब झाली या कारणास्तव १९२४ साली त्यांची तुरुंगातुन सुटका करण्यात आली. काही दिवस ते  राजकारणापासून दूर राहिले.या काळा दरम्यान महात्मा गांधी यांनी स्वराज्य पक्षाचे सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील सदस्य यांच्यातील मतभेद दूर करण्यावर भर दिला. तसेच समाजातील अस्पृश्यता , दारू समस्या , आणि देशातील गरिबी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सन १९२८ साली ते  पुन्हा राजकारणात आले व पुन्हा  सक्रिय झाले. महात्मा गांधी राजकारणापासून दूर असताना सन १९२६ साली त्यांनी ब्रिटिश सरकारने संविधानात सुधारणा करण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली, परंतु ब्रिटिश शासनाच्या या समिती मध्ये एकही भारतीय नागरिक नसल्याने भारतीय पक्षांनी या कमिशनवर बहिष्कार टाकला. स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा असहकार चळवळ सुरू करू असा संदेश सरकारला देण्यात आला. राष्ट्रीय सभेतील सदस्य सुभाष चंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुणांची तर  तात्काळ स्वातंत्र्य द्यावे,अशी मागणी होती. इंग्रज सरकारला उत्तरासाठी काही कालावधी दिला होता. पण इंग्रज सरकारने काहीच उत्तर दिले नाही. परिणामी ३१ डिसेंबर १९२९ साली  लाहोर शहरात  जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भारतात ध्वज फडकावून संपूर्ण स्वराज्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला.या दिवशी काँग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला. २६ जानेवारी १९३० रोजी पहिला स्वातंत्र्यदिन सामूहिक शपथ विधी घेऊन साजरा करण्यात आला. साबरमती येथून गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली. ३८८ किलोमीटरचे आंतर पूर्ण करून पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी आपली नेहमीची प्रार्थना विधीआटपून महात्मा गांधी समुद्रकिनाऱ्यावर गेले व मिठाचे खडे उचलून इंग्रज सरकारने लावलेला मिठाचा कायदा मोडून टाकला.


    पहिल्या महायुद्धानंतर गांधीजींनी असे जाहीर केले की भारत देश दुसऱ्या महायुद्धात भाग बनणार नाही गांधीजींची या युद्धाबद्दल ही धारणा होती की हे युद्ध जरी लोकशाही स्वातंत्र्यासाठी लढले गेले तरी इंग्रज भारताला स्वातंत्र्य देणार नाही. युद्धाला सुरुवात  झाल्यानंतर गांधीजीनी स्वातंत्र्य  मागण्याचे आंदोलन सुरू केले.  या युद्धाच्या दरम्यान महात्मा गांधीजींनी इंग्रजाना *भारत छोडो* असा नारा दिला.  इंग्रज सरकारने भारतीय प्रतिनिधींना न जुमानता भारतीय नागरिकांना जबरदस्तीने युद्धात खेचले. हे युद्ध लोकशाही विरुद्ध असले तरी इंग्रज सरकार आपल्याला स्वातंत्र्य  देणार नाही, हे गांधीजींना माहित होते. कारण इंग्रज सरकारने असे कोणतेही आश्वासन दिले नव्हते. इंग्रज सरकार युद्धात व्यस्थ असलेले पाहून  गांधीजीनी भारत छोडो आंदोलन सुरू केले. या मोठ्या आंदोलनात सहभागी असणाऱ्या लाखो लोकांना इंग्रज सरकारने तुरुंगात टाकले, आणि हजारो आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला.  


      गांधीजींनी आणि त्यांच्या समर्थकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले जोपर्यंत स्वातंत्र्य नाही तोपर्यंत भारत देश युद्धात  सहभागी होणार नाही. गांधीजींनी इंग्रजांना स्पष्ट सांगितले आणि या चळवळीला जरी हिंसक  वळण  लागले तरी चळवळ थांबणार नाही असा इशारा दिला. महात्मा गांधी यांनी चळवळी दरम्यान  भारतीय जनतेला करा किंवा मरा असा मूलमंत्र दिला. भारत छोडो चळवळ देशभर पसरली गांधीजींना मुंबई येथे अटक करण्यात आली. गांधीजींना दोन वर्ष पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कैद करून ठेवले .


     तुरुंगात असताना त्यांना मलेरियाची लागण झाली, उपचारासाठी त्यांची  सुटका करण्यात आली.भारत छोडो चळवळीत जरी यश आले नाही तरी सर्व भारतीयांना एकत्रित करण्याचे काम गांधीजींनी केले होते.या चळवळीचा वणवा देशभर पसरल्यामुळे इंग्रजांनी महायुद्ध संपे पर्यंत भारत देशाची सत्ता भारतीयांच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन थांबवले. महात्मा गांधी दिल्ली येथील बिर्ला बागेत फिरत असताना  नथुराम गोडसे यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. महात्मा गांधीजीनां  गोळी लागून ते जमिनीवर कोसळले. महात्मा गांधी यांनी मृत्यूपूर्वी  आपल्या मुखातून 'हे राम' असे उदगार  काढले. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल ते संपूर्ण देशात राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणून ओळखले जातात. २ आॅक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात, 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.अशा महान क्रांतिकारक महात्मा गांधीजींना शत शत: प्रणाम !


Popular posts
रत्नागिरीत राष्ट्र सेवादल व्यक्तिमत्व विकास शिबीर
Image
बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न मा.आ.श्री.किरण पावसकर ( शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्थित सर्व रहिवासी कर्मचाऱ्यांना केले मार्गदर्शन
Image
पहलगम घटनेच्या निषेधार्थ यवतमध्ये सर्व धर्मीय कँडल मार्च काढून तीव्र निषेध
Image
महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
Image
पनवेल प्रेस क्लब संस्थेच्या अध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची निवड
Image