घडईकार घडविणारा  बाप -भीमराव दुर्गे काका  काळाच्या पडद्याआड.


       
    ज्येष्ठ साहित्यिक कवी श्रीराम दुर्गे सर यांच्या वडिलांचे सोमवार दि. १२- १० -२०२० रोजी त्यांच्या धसवाडी ता अहमदपूर जि.लातूर येथे निधन झाले .या कोरोना आपत्तीत त्यांचे झालेले निधन ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे .गेल्या पाच सहा महिन्यात समाजातील ,नात्यातील ,मित्रमंडळी , जवळच्या काही व्यक्तींचे असे आकस्मिक जाणे यामुळे मानसिक धक्काच बसल्या सारखे झाले आहे .कुणाचे कसे सांत्वन करावे ,श्रद्धांजली कशी अर्पण करावी  हेच सुचतं नाही .मन बेचैन होते .यातना होतात .इच्छा असूनही काही सामाजिक सुरक्षा ,शासकीय नियम आणि वैयक्तिक काळजी,मनातल्या भीतीमुळे दुःखीत पीड़ित व्यक्ति वा त्या नातेवाईक यांच्या पर्यंत जाताही येत नाही .त्यामुळे काहींचे गैरसमज होत आहेत काहींजन समजून घेत आहेत . साहित्यिक श्रीराम दुर्गेसरांचे वडील हे नव्वदीत असणारे पण तब्बेतमात्र अगदी ठणठणीत आणि व्यवस्थित होती अजूनही ते एक कि.मी. असलेल्या शेतावर चालत जात असत असे असतानाहीया  त्यांचे असे आकस्मिक जाणे हे त्यांच्या दोन्हीही मुलांच्या मनाला यातना देणारी घटना आहे .ज्या बापाने स्वतःच्या कळत्या वयापासून दगड घडवून,माती तुडवून, पडेल ते ,मिळेल ते काम  केले .अनेकांची घरे दगडविटा वाहून बांधून दिली ,झोपडित राहाणाऱ्या या कारागिराची कला त्यांच्या परिसरात नावलौकीक प्राप्त होती .इतरांची घरे बांधताना भविष्यात आपल्या मुलांनी स्वतःच्या कष्टाने "बंगले "बांधावेत या दूरदृष्टीने स्वप्नं बघून अहोरात्र कष्ट करून त्यांना शिक्षण घेण्यास प्रेरणा दिली व रात्रंदिवस कष्ट केले . तसेच नात्यागोत्यातील व गावातीलही मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा दिली आपल्या पूर्वजांनी जी गुलामी केली ,अज्ञान अंधश्रद्धा जोपासल्या त्या त्यांनी पुर्णपणे नाकारून गवंडी कामाचा मार्ग स्विकारला व आपल्या मुलांनीही तो स्वीकारू नये  व सन्मानाने जगावे हा विचार अल्प शिक्षित असणाऱ्या या काकांनी  केला  .कारण डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार  आणि म.फुले ,शाहूमहाराज यांची सामाजिक परिवर्तन चळवळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा काही काळ सहवास यामुळेच त्यांचे विचार परिवर्तनवादी बनले .शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश ऐकला ,मानला   आणि आपल्या  श्रीराम आणि प्रदीप या मुलांना शिक्षण दिले .नातेवाईक यांचा विरोध पत्करून .श्रीराम दुर्गे यांना औरंगाबादच मिलिंद महाविद्यालयात शिक्षणासाठी  पाठवले.त्याचं काळात मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ जोर धरत होती , या चळवळीत श्रीराम दुर्गे सर वडीलांनी स्वीकारलेल्या बाबासाहेबांच्या विचारामुळेच सहभागी झालेआणि त्याच काळात सरांना  मोर्चे ,सभामधे सहभागी होण्याची संधी मिळाली  विविध नेत्यांचीभाषणे  ऐकायला मिळाली तसेच अनेक साहित्यिक, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सहवास लाभला आणि अनेक विचारवंतांचे  मार्गदर्शन  आणि विविधांगी वाचन यातून त्यांना चळवळ ,आणि लेखनाची दिशा कळली .  हे सगळे वडीलांनी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या मातीत आपल्या मुलाने शिकावे या श्रद्धेने औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठवल्यामुळेच घडले .अन्यथा सर कदाचित लेखनाकडे वळलेही नसते. आपला मुलगा शिकतोय, लिहितोय ,चळवळीत जातोय म्हणून  बापाने विरोध न करता प्रोत्साहन दिले याचेच हे फलित आहे .  पोरा तू  पदवीधर हो स्वतःच्या पायावर उभा रहा, तू तुझं भलं कर  .मला कितीही कष्ट करावे लागलेतरी चालेल  पण माझी मुलं शिकली पाहिजे  हे ध्येय त्यांनी उरात बाळगली होती . शिक्षण ,नोकरी ,बंगला ,गाडी कष्टाने मिळवा पण त्यासोबत समाजातील गरीब मुलांना मदत करायला शिका ही शिकवण  त्यांनी मुलांना दिली  .एक अल्पशिक्षित बाप केवढी मोठी शिकवण मुलांना देतो . हा आदर्श इतरांना प्रेरणा देणारा आहे .सर डी एड कॉलेजात प्राध्यापक होते ,अनुदानाचा प्रश्न असल्याने ती नोकरी सोडून  त्यांनी कोकणात गुरुकूल हायस्कूल मालघर ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथे नोकरी स्वीकारली .ते आता निवृत्त आहेत  धाकट्या प्रदीपलाही  वडिलांनी  एम.ई .मेकॅनिक पर्यंत शिक्षण दिले  तो मंत्रालयात  उच्चपदस्थ अधिकारी आहे.  थोडक्यात काय तर आपला  एक मुलगा प्राध्यापक , तर दुसरा इंजीनियर  व्हावा अशी मोठी स्वप्न दगडमातीत राबणारा कारागिर  आपल्या मुलांबाबत बघतो आणि रात्रंदिवस जीवापाड कष्ट करून ती पूर्ण करतो .  आज त्यांच्या सुनाही नोकरदार  आहेत यालाच म्हणतात सामाजिक परिवर्तनाचा विचार स्वीकारून स्वतःची परिस्थिती सुधारणे .दोन्हीही मुलांच्या  प्रगतीचे दिवस पाहून  वडील मनोमन समाधानी  होते .वयाच्या साठीपर्यंत  त्यांनी खूप काबाडकष्ट केले पुढील तीसवर्षे  मात्र  दोन्ही मुलांनी त्यांना काहीच कमी पडू दिले नाही. आलीकडचा काळ  काका काकींनी सुखात काढला. श्रीराम दुर्गे सरांनी शिक्षकी पेशा संभाळून साहित्यात नावलौकीक केला ."क्षितिजा पलिकडला सूर्य "कविता संग्रह याशिवाय "घडई  ,डोनेशन ,आत्मशोध ,जागल्या, चौथी क्रांती सह अनेक पुस्तके  लिहिली  त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून वडीलांनी दिलेले सामाजिक विचार  आणि त्यांचा रोखठोकपणा प्रतिबिंबीत होताना दिसतो सत्तावीस वर्षे सरांची माझी फक्त मैत्रीच नव्हे तर बंधुत्वाचे संबंध  आहेत,एका कार्यक्रमात ओळख .कवी साहित्यिक अरूणदादा  इंगवले ,साहित्यिक ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ते मा . प्रकाशजी देशपांडेसर आणि लोटिस्मा  वाचनालयाशी मी दुर्गे सरांमुळेच  जोडला गेलो,.या सर्वानी मला प्रोत्साहन सहकार्य दिल आहे . साहित्यामुळे आम्ही चिपळूण ,गुहागर ,खेड ,दापोली ,रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लिहिणारे एकत्र आलो .लोटिस्माच्या सभागृहात आमच्या काव्य मैफिली रंगतात विविध साहित्यिक कार्यक्रम पार पडतात .दुर्गे सरांविषयी आम्हा सर्वांना आदर आहे .दुर्गेसर सहज वास्तव लेखन करतात ,ते अत्यंत संवेदनशील आहेत .अनेक कटू अनुभव त्यांनी बालपण आणि,तरुणपणातही घेतले आहेत .सरांच्या घरी तासांनतास आमच्या गप्पा ,मैफिल रंगतात आई वडिलांच्या कष्ट त्यागाची माहिती देतांना  अनेकदा त्यांच्या डोळ्यांत  अश्रू वहाताना मी पाहिले आहे   .सर  आता चिपळूणला स्थायिक असले तरी गावाकडे सतत जाणे असतेच .दोन वेळा काकांची आणि माझी भेट झालेली आहे ,फार वेळ गप्पा नाही झाल्या पण ज्या झाल्या त्यातूनही त्यांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान वाटला आहे .1995/96दरम्यान सरांचीपहिली " घडई "कांदबरी प्रकाशित झाली .डोनेशन हा कथासंग्रह अशी अनेक पुस्तक आपल्या मुलाची प्रकाशित झाली ,शासनाने "अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन गौरव केला हे सर्व पाहून ऐकून ते समाधानी होते "घडई "ही वास्तव असणारी कांदबरीने साहित्यात श्रीराम दुर्गे या नावाची ओळख निर्माण केली .त्या साहितीकाला काकांनी दगड घडवीत घडवीत आपल्या मुलांचेही आयुष्य खऱ्या अर्थाने घडविले .सुख वैभव पाहिले दुःख एकाच गोष्टीच आहे ते म्हणजे अंतिम क्षणी बापाला खांदा देता आला नाही .या वयात आई एकाकी पडली .मरण अटळ आहे पण हा काळ असा येईल याची मनात किंचितही  कल्पना नसतांना आपला कष्टकरी बाप गेल्याची वेदना सरांना प्रत्येक्ष न भेटताही फोनवर बोलून स्पष्टपणे जाणवली .जुन्या पिढीतील अशा हिम्मतवान बापाने आपल्या पुढील पिढीला कष्टाचे ,त्यागाचे दिवस जावून सुखाच्या दिवसाची निर्भीडपणे अडचणीवर मात करण्याचा मार्ग दिला व त्यातूनच बंधू प्रदीपजी इंजीनियर आणि घडईकार श्रीराम दुर्गे घडले .दुर्गे परिवार यांच्या दुःखात आम्ही त्यांचा सारा मित्र परिवार सहभागी आहोत .सुरक्षितता ,शासकीय बंधन यांमुळे काही दिवस समक्ष भेट नसली तरी आमचे शाब्दिक बोलणे त्यांचे दुःख हलके करील .सरांनी स्वतःच्याही तब्बेतीची काळजी घेऊन वडिलांना अपेक्षित असणारे सामाजिक ,साहित्यिक कार्य जोमाने करावे हीच त्यांची खरी स्मुती जपल्याचे समाधान मिळेल .काकांना भावपूर्ण श्रद्धांजली!


कवी -राष्ट्रपाल भा .सावंत 
      कळमुंडी चिपळूण रत्नागिरी -414702
9403144356


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था, दहिवली तर्फे या वर्षी अगदी वेगळ्या पध्दतीने रक्षाबंधन सण साजरा
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image