७५ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास तर सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता

 

मुंबई / लोकनिर्माण प्रतिनिधी



महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वातील सरकारने सर्वसामान्यांना खूश करण्यासाठी चांगल्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यापैकीच एक निर्णय म्हणजे पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. पंच्चाहतरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्याबसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. 

 तर राज्यातील या नव्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.  राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली.

वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट २०२२ पासून मिळेल. त्यामुळे आता हा महागाई भत्ता ३४टक्के इतका होईल.