महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? या कार्यक्रमाचे २००० पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण

 

पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी 

  नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून, महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? विषयाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात २००० पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण केले आहेत.



 महिलांच्या मासिक पाळी सारखा संवेदनशील विषय गांभीर्याने घेऊन  समाजामध्ये असणाऱ्या रूढी, परंपरेच्या नावाखाली चालत आलेले मासिक पाळी बद्दल बरेच  समज - गैरसमज, अंधश्रद्धा समाजात पसरलेले आहेत. याच विषयावर डॉ दीपक खाडे (नॅचरोपाथ) जनजागृतीचे कार्यक्रम शाळा, कॉलेज, आदिवासी पाडे, गृहनिर्माण सोसायट्या मध्ये २०१७ पासून घेत आहेत.



 कुटुंबाकडून, समाजाकडून मासिक पाळी मध्ये कळत नकळत पणे जी वागणूक दिली जाते, त्याचे दुष्परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे आपल्या मुली आणि महिलांच्या मनावर होत असतात आणि झालेले सुद्धा आहेत. मासिक पाळी विषय हसत खेळत घेऊन महिलांच्या मनातील प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे काम करत आहेत.



       तसेच मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी तसेच बाजारात उपलब्ध प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांना होणाऱ्या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी जैविक सॅनिटरी नॅपकिन वापरण्याबाबत माहिती दिली जाते. त्याचबरोबर स्वच्छते बरोबर मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याबाबत माहिती दिली जाते.



 शैक्षणिक / करिअर कौंसलर म्हणून कार्यरत असलेले दीपक खाडे यांचे मासिक पाळी वरील जनजागृतीचे कार्य फक्त २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या निमित्तानेच नव्हे तर नियमितपणे अविरत सुरू आहे.