चिपळूण लोकनिर्माण टीम
चिपळूण तालुक्यातील पालवण सावर्डेकरवाडी येथे १६ जून १९७२ मध्ये शासकीय निधीतून सार्वजनिक विहीर बांधण्यात आली. त्यावर २८६६ रुपयांचा निधी खर्च झाला; मात्र सध्याच्या स्थितीला ही विहीर अस्तित्वात नाही. ही विहीर चोरीला गेल्याची तक्रार पालवण सावर्डेकरवाडी येथील अशोक गणपत सावर्डेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. सार्वजनिक विहिरीबाबत सावर्डेकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, उपविभाग चिपळूण यांच्याकडे रजिस्टर नमुना क्र. ३९, स्थावर मालमत्ता नोंद ११६ अशी आहे. ही विहीर १६ जून १९७२ ला संपादित करण्यात आली. आठ बाय दहा फुटाच्या विहिरीसाठी २८६६ रुपये खर्च झाल्याची नोंद आहे; मात्र सध्याच्या स्थितीला ही विहीर अस्तित्वात नाही. पाणीपुरवठा विभागाकडे माहिती मागितली असता ती पुरेशी मिळत नाही. त्यामुळे ही विहीर चोरीला गेली असून तिचा शोध घ्यावा, अशी मागणी सावर्डेकर यांनी केली आहे.