घाणेखुंट कोतवली रस्त्याची दुरवस्था, ढोपरभर पाण्यातून मार्ग काढत शाळकरी मुले जातात शाळेत. जिल्हा परिषद च्या रस्ते विभागाचे दुर्लक्ष, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात.


लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)

खेड तालुक्यातील घाणेखुंट, कोतवली, सोनगाव रस्त्याची दुरावस्था झाली असून शाळकरी विद्यार्थ्यांची आणि वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य दिसून येत शाळकरी मुले कामगार वर्ग आणि ग्रामस्थांचे येथून मार्ग काढताना हाल होत आहेत.

         मुंबई गोवा महामार्गावरील लोटे येथून निघणारा घाणेखुंट, कोतवली, सोनगाव,धामणदेवी,पेढे असा हा ग्रामीण मार्ग  एकूण २७ किलोमीटरचा आहे.यातील दोन किलोमीटर चा रस्ता हा घाणेखुंट गावातून जातो. मात्र गेली दोन-तीन वर्षे या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडत आहेत आणि पावसाळ्यामध्ये या रस्त्याची अक्षरशः चाळण होत आहे. घाणेखुंट, कोतवली, सोनगाव येथील शाळकरी मुले, ग्रामस्थ, औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जाणारा कामगार वर्ग, आजारी रुग्ण याच रस्त्यावरून रोज ये जा करतात. मात्र इथे असलेल्या खड्ड्यांमुळे यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे पादचारी विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या अंगावर चिखल उडतो, त्यांचे कपडे खराब होतात. याबाबत घाणेखुंट ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधित विभागांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून या रस्त्याच्या डागडूजी बाबत विनंती केली गेली आहे.एवढ्यावरच न थांबता ग्रामपंचायतीने स्वतः खर्च करून गेली दोन वर्षे या रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. परंतु मुसळधार पावसामुळे या पंचायतीने केलेला खर्चही वाया जात आहे.म्हणून आता तिन्ही गावातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत,असे घाणेखुंट चे सरपंच श्री.संतोष उर्फ राजू ठसाळे आणि माजी सरपंच श्री. अंकुश काते यांनी सांगितले.



 अवघ्या दोनशे मीटरवर घाणेखुंट, कोतवली, सोनगाव रस्त्याची झालेली दुरावस्था.