रायगड लोकनिर्माण प्रतिनिधी
रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली ३० ते ४० घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हा आदिवासी पाडा असून यथे साधारण २५० लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला. झोपण्यासाठी रात्री शाळेत गेल्यानं हे तरुण सुदैवानं बचावले, पण त्यांचे कुटुंबिय मात्र बेपत्ता आहेत. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे.
घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. अद्याप १०० हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. घटनेत सुदैवानं बचावलेल्या तरुणांनी आपला अनुभव सांगितला. इर्शाळवाडीतील ६ तरुण ही शाळेत रात्री साडेदहा ते ११ च्या दरम्यान झोपण्यासाठी गेली होती. दरड कोसळल्याचा आवाज तरुणांना आले आणि ते धावत डोंगराच्या पायथ्याशी आले. मात्र त्यांचे आई-वडील कुटुंबिय मात्र या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आपल्या कुटुंबियांच्या काळजीनं तरुण कासावीस झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांकडे हे तरुण सातत्यानं आपल्या आप्टेष्टांबाबत विचारणा करत आहेत. दुर्घटनेतून सुखरुप बचावले असले तरीदेखील आपल्या नातेवाईकांच्या ख्याली-खुशालीसाठी तरुणांचा आक्रोश सुरूच आहे. आमचे नातेवाईक कुठे आहेत? ते कसे आहेत? त्यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला वरती जाऊ द्या, अशी विवंचना वारंवार तरुण पोलिसांकडे करत आहेत.
घटनास्थळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत.