लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)
पंचायत समिती खेड यांच्या सूचनेप्रमाणे ग्रामपंचायत गुणदे च्या वतीने १३ जुलै रोजी संपूर्ण गावात वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समितीने दिलेल्या दोनशे झाडांमध्ये आणखी तीनशे झाडांची भर ग्रामपंचायतीने घातली आणि पाचशे झाडांचे वृक्षारोपण गुणदे येथील ग्रामदैवत, अंगणवाड्या व जिल्हा परिषद शाळांच्या परिसरात करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तेरा जुलै रोजी वृक्षारोपण करण्याच्या लेखी सूचना सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. या सूचना पंचायत समिती मार्फत सर्व ग्रामपंचायतींना लेखी दिल्या गेल्या.सूचनांबरोबरच पंचायत समितीच्या वतीने गुणदे ग्रामपंचायतीला दोनशे झाडे देण्यात आली होती.या दोनशे झाडांमध्ये गावातील ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे तीनशे झाडांची भर घालून एकूण पाचशे झाडे गुणदे गावामध्ये लावली.या झाडांमध्ये प्रामुख्याने देशी झाडांचा समावेश होता. यावेळी गुणदे ग्रामपंचायतचे सरपंच श्री. रवींद्र आंब्रे, उपसरपंच सौ.कांदेकर, ग्रामविकास अधिकारी श्री. दुर्गेश्वर रोकडे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,कर्मचारी,गावातील ग्रामस्थ,सर्व अंगणवाडी सेविका,जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षिका व शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सरपंच श्री. रवींद्र आंब्रे म्हणाले,'आमचे गाव हे आधीच निसर्ग संपन्न आहे.परंतु तरीही वाढते ग्लोबल वार्मिंग आणि वाढती लोकसंख्या यांचा विचार करता भविष्यात प्राणवायूचा तुटवडा जाणवू शकतो. आणि म्हणूनच शासनाने दिलेल्या सूचनेचे स्वागत करत आम्ही त्यामध्ये आणखी तीनशे झाडांची भर घालून हे वृक्षारोपण करत आहोत.आणि त्याचे संवर्धन ही आम्ही जबाबदारीने करू.त्यासाठी आम्हाला आमचे सर्व ग्रामस्थ सहकार्य करतील याची खात्री आहे.