अंतर्मनाची वेदना सांगणारी एकांकिका"सप्तपदी" - जेष्ठ साहित्यिक, कवी राष्ट्रपाल भा. सावंत

 

       'सप्तपदी' या नाटकाचे परीक्षण 

रविवार दहा सप्टेंबरला दुपारी साढेतीनला  "सप्तपदी"ही मुंबईस्थित स्थानिक कलावंत यांची एकांकिका पाहण्याचा अनपेक्षित योग जुळून आला. ही एकांकिका पाहून मी भारावून गेलो. माणसाच्या आयुष्यातील घटनावर आधारित त्यांच्या मरणाच्या प्रसंगातून त्याच्या जगण्याचे चित्रं समोर दिसते . त्यातून सप्तपदीचा अर्थ उलगडत जातोच पण आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं आहे, काय केलं पाहिजे  याचा बोध ही एकांकिका देते. 



लेखक दिग्दर्शक अनिकेत खेडेकर संकल्पना  रितेश पिटले, तर प्रमुख भूमिका मनिषा शिंदे, संतोष गायकर, श्वेता सावंत, रितेश पिटले सोबतीला तेरा सह कलाकार आणि अन्य संगीत, प्रकाश योजना , वेशभुषा, स्टेज कलाकार आणि नेपथ्य रोमंच देवळेकर या सर्वांनी एकजुटीने या प्रयोगाची निर्मिती केली, पहिला प्रयोग मुंबईत आणि दुसऱ्या प्रयोगाचे सादरीकरण रंगभूमी थिएटर चिपळूण मार्फत चिपळूणला केले. यातले बहुतेक सर्वच कलाकार इथले स्थानिक पण नोकरी व्यवसाय निमित्त मुंबईत आहेत.

कार्यक्रमाची सुरूवात सुश्राव्य अशा "ताल सुरांनी आळवितो मी रिद्धी सिद्धीच्या वरा" या गणानी होते, पडदा उघडताच एका कोपऱ्यात जीवन सार सांगणार भजन गाणारे गावकरी दुसऱ्या बाजुला खाटेवर मुख्य व्यक्तिरेखा "शांताराम" मरणाच्या प्रतीक्षेतआहे. त्याचा जीव जात नाही, पत्नीचा मृत्यू त्याच्या आधीच झालेला आहे.ती त्याच्या नजरेसमोर दिसते आहे.मुल परदेशात असून बापाच्या मरणाच्या अंतिम क्षणीही येतं नाहीत.उशाला त्याची मुलगी निता,दोन महिला धायमोकळून रडत आहेत .अन्य महिला मागे उभ्या, समोर एक बेवडा , बचत गट अध्यक्षा. प्रसंग दुःखाचा आहे पण पात्रांच्या हालचाली वक्तव्यातून विनोद निर्माण होतो.शांतारामचा जीव जातो. आणि खरं नाट्य इथून सुरू होत. स्वर्गात त्याला पत्नी भेटते अशी संकल्पना करून त्यांच्यातील संवाद नाटय लेखकांन, माणसाची मरणा नंतरही कशी घुसमट होते.आपणं कुणासाठी ,कशासाठी जगलो, काय कमवलं, जे जगायचं ते जगलोच नाही. असा त्यांना पश्चात्ताप होतो.लग्नात सप्तपदी झाल्यावर खऱ्या अर्थाने  वैवाहिक जीवनाला सुरुवात होते.सप्तपदी मधील मंत्राचा नीट अर्थ जाणून न घेताच जगलो. मला पुन्हा तुमच्याशी लग्न करून पुन्हा सप्तपदीच्या अर्था नुसार जगायचंआहे असं शांतारामची पत्नी म्हणते. यातून त्यांच्या जीवनातील घटना प्रसंग दाखविले आहेत.

 आपणं जे पेरतो तेच पुढं उगवत, शांताराम आई मुलांशी जसा वागला त्याची पुनरावृत्ती त्याच्या जीवनात झाली. यातील शांताराम संतोष गायकर, आणि त्याच्या पत्नीची भुमिका मनिषा शिंदे यांनी उत्तम केल्या आहेतच पण अध्यक्षा बाई म्हणून श्वेता सावंत यांची ,सरपंच अनिकेत खेडेकर आणि अप्पाची भूमिका साकारणारे रितेश पिटले अन्य कलाकार , दोन तीन मिनिट स्टेजवर येणारा बाल कलाकार ओम खोंडे, लोटे बाईची भूमिका,शांतारामची आईं सर्वांच्या भूमिका त्यांचा अभिनय दाद देण्यासारखाच आहे.

माणसातील सुसंवाद पैसा, प्रसिध्दी, अति हव्यासामुळे तुटत चालला आहे. लेखकाची लेखणी, संकल्पना ,दिग्दर्शन उत्तम आहे. पण एका तासात एक चांगला विषय त्रोटकपणे, घाईघाईत सांगण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला असला, प्रेक्षक यांना बोध होत असला तरी हाच विषय दोन अंकी नाटकात सविस्तरपणे, लिहिता,मांडता येईल. उंबरठ्याच माप नवरा बायकोने एकात्रितच ओलांडल पाहिजे, मुलीच्या जन्माने नाराज होणारे कुटुंब, मुलांवर आपणं नेमके कोणते आणि कसे संस्कार करावेत हा एक संदेश ही एकांकिका देते. 

छोटे छोटे दुर्लक्षित कलाकार अशा होशी रंगमंचावरच  पाहायला मिळतात, त्यांना आपणं दाद द्यायलाच हवी एका रात्रीत कुणी स्टार होत नाही. पण चिपळूण,रत्नागिरी जिल्ह्यतील असे अनेक कलावंत नावलोकिक मिळवत आहेत. अशातूनही पुढे मोठे कलाकार मिळतील ते मनोरंजन आणि प्रबोधन करतील. मरणाच्या प्रसंगातून ही नाटय आणि प्रबोधन कसे घडते यासाठी ही "सप्तपदी "एक नाटयआविष्कार म्हणून पहायला हवी. सर्व सहभागी कलाकार त्यांचे मार्गदर्शक सहकारी यांचे अभिनंदन . या एकांकिकेेचं दोन अंकी नाटक व्हावे अशी सदिच्छा!

"आठवणींच्या गोष्टी"

राष्ट्रपाल भा.सावंत .

९४०३१४४३५६