राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी
कुणबी समाजाचे आधारस्तंभ, राजापुरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व आणि शेकडो गरीब कुटुंबांचा आधारवड असलेले प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजापूर शहरावर शोककळा पसरली.
![]() |
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सुमारे ४००० हून अधिक लोकांचा जनसागर लोटला होता.
हॅपी होमचे मालक असलेले प्रकाश कातकर यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ व्यवसायच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीही जपली. त्यांनी अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक हातभार लावला, तसेच शाळा आणि महाविद्यालयांमधील विविध कार्यक्रमांसाठी उदारहस्ते देणग्या दिल्या. गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलून त्यांनी त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. त्यांच्या ‘हॅपी होम’ या संस्थेच्या माध्यमातून राजापूर ते सिंधुदुर्ग या भागातील शेकडो तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला होता.
ते राजापूर अर्बन बँक संचालक,राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ सदस्य, कुणबी सहकारी पतपेढी संचालक, तसेच कुणबी समाजोन्नत्ती संघ पदाधिकारी,व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक पदावर त्यांनी काम केले आहे. त्यांच्या जाण्याने या तरुणांचा आधार हरपला आहे.
![]() |
आज सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समजताच राजापुरातील त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतक त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी दाखल झाले. सायंकाळपर्यंत त्यांचे पार्थिव राजापुरात आणण्यात आले, जिथे हजारोंच्या संख्येने शोकाकुल लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील अधिकारी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच कातकर कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झाले.
प्रकाश कातकर यांच्या निधनाने राजापूर शहराने एक उदार आणि समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची आणि आठवणींची राजापूरकरांना कायम आठवण राहील. परमेश्वर कातकर कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त होत आहे.