राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी
राजापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अनेकांचा आधारवड ठरलेले, अनेकांचे संसार मार्गी लावणारे, तरुणाच्या हाताला काम देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कातकर यांचे आज कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते. त्यांच्या अचानक जाण्याने निकटवर्तीयांना धक्का बसला आहे.
प्रकाश कातकर यांना दोन दिवसापूर्वी ब्रेन हम्रेज झाला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले होते. रत्नागिरी त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. येथे काहीच उपयोग न झाल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र कोल्हापूरला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ता हरपल्याने राजापुरात मोठी शोककळा पसरली आहे. नुकतीच त्यांना शिवसेना ऊबाठा उप तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती. राजापुरात त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. तसेच हॅप्पी होम बोअरवेल आणि इलेक्ट्रिकलचा ही त्यांचा व्यवसाय आहे. या माध्यमातून त्यांनी जवळपास १५० तरुणांना रोजगार दिला होता. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. राजापुरात ते अजातशत्रू म्हणून परिचित होते. राजापूर अर्बन बँकेवर ते बहुमतांनी निवडून आले होते.
त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एक सामाजिक कार्यकर्ता हरवल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. मुलगी ११ वी शिकत असून मुलगा 8 वी मध्ये शिकत आहे.