ज्याने चोच दिलेय तोच दाण्याचीही व्यवस्था करतो!

 


 


    निसर्गाने जन्मास घडलेल्या प्रत्येक जीवाच्या पोषणाची जबाबदारी निसर्ग पार पाडत असतो. कोणीही उपाशी राहणार नाही,ज्याच्या त्याच्या हाताला काम मिळून त्याला उदरनिर्वाह करणे सुलभ होईल अशी सुंदर योजना देवाने केलेली असते.त्याचे नियोजन फारच उत्तम असते! आपण डोळसपणे पाहिलं, चिंतन केलं तर हे आपल्यालाही पटेल. पण शिक्षणाचा हेतूच आपण बदलल्यामुळे आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. घेतलेल्या शिक्षणातून प्राप्त केलेल्या कौशल्यानुसार आपल्याला पोट भरण्यासाठी फक्त नोकरी अथवा व्यवसाय कसा करता येईल याकडेच विचारांचा कल झुकलेला दिसतो.


 


       सुमारे तीन महिने कोरोनाच्या जागतिक महा मारीत संपूर्ण जगच अडकलंय.मोठमोठे व्यवसाय, कारखानदारी इ.अडचणीत सापडले.त्यात काम करणारे अनेक हात सुद्धा थांबलेत.उच्चभ्रू मध्यमवर्गीय यांच्याकडे थोडेफार साठवलेलं आहे. त्यांची पाचावर धारण बसली तिथं हातावरच्या पोटाचं काय? त्यांची अवस्था तर बिकटच आहे त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे टीचभर पोटाची खळगी कशी भरावी ही विवंचना त्यांना सतावतेय.


   या सगळ्या प्रश्नात चिपळून नगरी सुद्धा आहे बरं! या चिपळून नगरीचा रखवालदार श्री जुना कालभैरव याचा मात्र करीश्मा काही वेगळाच आहे. या देवस्थान ट्रस्टच्या मंडळींनी गतवर्षी मंदीर जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले आहे. फारच नियोजनबद्ध काम सुरू झालेय. या देवस्थान ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या अनेक मंदिरांचा व परिसराचाही कायापालट करण्याचा मानस मंडळींनी मनी धरलाय. पण कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात माणसां अभावी सगळंच ठप्प झालं. तरीही गप्प राहतील ते भैरवसेवक कसले !


    रविवारी श्री कालभैरवाचा दर्शनासाठी मंदिरात गेलो.देवदर्शना नंतर श्री.पंकजशेठ कोळवणकर, श्री.समीर शेट्ये यांची भेट अनिवार्य असते. त्यानुसार सभोवार नजर टाकली. दैनिक सागर रंगमंच येथील कार्यालयात ही जोडी विचारमग्न दिसली. गप्पांच्या ओघात गांधारेश्वर मंदिरा कडे जाऊन येऊया असं समीरशेठ म्हणाले.सवयीप्रमाणे होकार दर्शवून आम्ही दोघे गांधारेश्वराच्या घाटावर गेलो. पहातो तर बदललेलं गांधारेश्वराच्या घाटाचं मनमोहक दृश्य! संपूर्ण घाटाचे अंतिम टप्प्यातील नूतनीकरण. पूर्वीपेक्षाही आकर्षक पद्धतीने घाटाचं काम सुरू असलेले दिसलं.विघ्नहर्ता ग्रुपने तर यापूर्वीच पडीक असलेल्या जागेत सुंदर बगीचा फुलवला होता. नागरिकांची सकाळ-संध्याकाळ रम्य होण्यासाठी, गणेश विसर्जनासाठी, मन प्रसन्न करण्यासाठी घाटाची डागडुजी करावी असा संकल्प ट्रस्टी मंडळींनी मनोमन केला होता. याची माहिती फक्त मनकवड्या श्रीकालभैरवाला होती आणि त्यांच्याच प्रेरणेने हे काम पूर्णत्वास जात होतं.


      अधीक तपशिलात शिरल्यावर श्री.समीर शेट्ये बोलते झाले. चिपळूण नगरीतील अनेक वाड्या-वस्त्या श्री कालभैरवाच्या अलौकिक महात्म्याच्या प्रेमात असल्याने आपलाही हातभार लावून खारीचा वाटा उचलावा अशी प्रत्येक भक्ताची इच्छा! त्यात मुरादपुरच्या भोईराज व कुंभार बांधवांची तर प्रबळ इच्छा होती की घाटाचे काम आपल्याच योगदानातून व्हावे, श्रमदानातून व्हावे. पण बांधकाम व्यवसायात रोजंदारीवर असलेल्या हातांना उसंत मिळत नव्हती आणि कार्य शेवटास जात नव्हते. अखेर दुर्दैव म्हणून तळ ठोकून राहिलेल्या कोरोनाच्या महामारी मुळे सगळ्यांचे हात थंडावले आणि यातच सकारात्मक विचारांनी समस्त कालभैरव भक्तगण, भैरव सेवक भोईराज कुंभार बांधव स्वतःहून पुढे आले. ट्रस्टी मंडळींकडून कामाचे स्वरूप समजावून घेऊन कामाला गती आली. पडेल ते काम करून हे कार्य सिद्धीस नेण्याच्या भोईराजांच्या गुणांमुळे श्री गांधारेश्वर घाटाला नवं सौंदर्य मिळालं.भैरवसेवक सर्वश्री कुंदन पवार,अमोल पवार यांनी सिमेंट,वाळू,डबर,जांभा यांची वाहतूक केली. बांधकामासाठी सर्वश्री दत्तात्रय नलावडे, मनोहर घाडगे, पिंट्या बुरंबाडकर,मनोहर शेडगे, प्रकाश कुंभार, निलेश कडू, गौतम गमरे, गणेश कुंभार,बबन साळवी आदींनी रोजंदारीवर काम केले. या सुशोभीकरणात घाटालगतच्या नदी पात्रात असलेल्या जांभळीच्या भल्या मोठ्या ओंडक्यांचा अडसर होता. त्याच्यावर बसलेली सुमारे पंधरा-वीस ब्रास पुळण साफ करून त्याला तेथून हटविण्यात मोठं काम भोईराज सेवा मंडळाच्या शिलेदारांनी केलं. आणि सुमारे वीस फूट लांब आणि सात-आठ फूट वेडीचे दोन मोठाले ओंडके चिपळून क्रेन सर्विसचे कालभैरव भक्त श्री मनोज भोजने यांच्या क्रेनमुळे नदीपात्रातून बाजूला झाले. या ओंडक्यांवरील गच्चझाडी तसेच मंदिर परिसरातील धोकादायक झाडीमुळे मंदीर परिसराच्या सौंदर्यात बाधा येत होती. या कामी श्री. सतीश शेडगे आणि सहकारी यांनी बहुमोल सहकार्य केले.


      श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टच्या मनात होतं की ही सेवा भोईराज मंडळींच्या मनाप्रमाणे त्यांनी करावी. पण योग येत नव्हता. परंतु लॉकडाऊन च्या काळात व्यवसाय पूर्णत ठप्प झाल्याने भेडसावणाऱ्या विवंचनेतही चोच देणाऱ्याने दाण्याचीही सोय केली आणि योग्य मोबदल्यात परिसर सुशोभिकरण झाले.


 


*शब्दांकन - श्री. प्रकाश गांधी गुरुजी*


 


------------------------------------------------------------------------


 *श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण अंतर्गत श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिर येथील गणेश विसर्जन घाटाचे नूतनीकरण सुशोभीकरण लॉक डाऊनच्या कालावधीत बांधकाम क्षेत्रात रोजंदारीवर काम करणारे स्थानिक भैरवसेवक भोईराज , कुंभार मंडळी यांनी १ महिनाभरात पूर्ण केले.👇



 


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image