निघालो आज तिकडच्या घरी...- डॉ. निधी पटवर्धन

 


 


डॉ. निधी पटवर्धन या मूळच्या रत्नागिरीच्या. पण सध्या मुक्काम देवरुख. उत्तर प्रदेशातील देवरुख मध्ये अडकलेल्या सुमारे १५ आईस्क्रीम विक्रेत्यांना त्यांनी सर्वतोपरी मदत करून, इतकी की अध्यापन आणि योग प्रशिक्षणातून मिळालेली रक्कम देखील त्यांना देऊन टाकून त्या सर्वांना आपापल्या गावी पोहोचविण्यास मदत केली. या सर्वांशी त्यांचे अनोखे भावबंध जोडले गेले. कसे ? ते वाचा या छोटेखानी टिपणात.  


    गाव: देवरुख, तालुका: संगमेश्वर, जिल्हा: रत्नागिरी. राम निवास यादव.वय 39.राहणार रायपूर खास, जिल्हा अलिगड राज्य उत्तर प्रदेश. 2015 साली 26 मुलांना आईस्क्रीमच्या धंद्यासाठी घेऊन आला. 17 मार्चपासून धंदा बंद झाला 30 - 35 हजाराचा माल कोणीच आइस्क्रीम घेत नाही म्हणून फुकट गेला. रोजच्या तीस लिटर दुधाचा रतीब होता. दीड वर्षाचा दिपांशू कुशवाह ते 52 वर्षाचे ओम प्रकाश कुशवाह अशी सगळ्या वयोगटाची माणसे सोबत. 15 सायकल आणि सहा मोटर सायकल घेऊन आईस्क्रीमचा धंदा करणाऱ्या लोकांवर लॉक डाऊन मुळे आफत ओढवली. सारे गाव मदतीला आले. कोणी भाजी दिली, कुणी किराणा भरला, कोणी शिव भोजनाची व्यवस्था केली. मी त्यांना जमेल तसे काम मिळवून देऊ लागले, अगदीच घरात बसलोय असं वाटायला नको. अतिशय प्रामाणिक मेहनती आणि समंजस माणसं. सरकार आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. गावाने सर्वतोपरी सहाय्य केले आहेच. कोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोबत जात होतो‌.


    कुणी तहसील ऑफिस मध्ये बरोबर होतो. आज अखेरीस नंबर लागला तहसील कार्यालयाचा एक माणूस एसटीनं चिपळूण पर्यंत सोडायला जाणार आहे. गावातून दहा गाड्या सुटणार आहेत. एका गाडीत ही पंधरा माणसे असतील. रेल्वे गाडीने ती मथुरे पर्यंत जातील. उमा व गजा आमडेकरनं सोबत लाडू, चिवडा, बिस्कीट पुडे, तिखट मिठाच्या पुऱ्या, लोणचे, स्लाईस ब्रेडची पाकीटे दिली आहेत. गजा म्हणाला, " जेवूनच गाडीत बसायचं, नाहीतर तुमची तिकीटं कॅन्सल करतो, बघाच." शिवाय सरकारकडून सोबत पुलावाची पाकिटे गाडीत मिळणार आहेत.


    पण घरचं जेवण दिल्याशिवाय गाववाल्यांना चैन पडली नाही. मी पाच बॅच योग वर्ग घेऊन त्यातून जमा होणारी रक्कम त्यांच्या जेवणाखाण्याची साठी, उदरनिर्वाहासाठी वापरली. कोणासाठी काहीतरी करायला मिळणं नशीबानंच मिळतं. प्रत्येकालाच हे भाग्य मिळते असे नाही. मी नशीबवान!! सोबत 11000/- दिले आहेत, वाटेत कसलीही अडचण आली तर बरोबर असावेत. हे कार्य पूर्ण व्हावे ही श्रीं ची इच्छा होती. 15 माणसांचे कुटुंब माझे कधी झाले हे मला कळलेच नाही. दहा वाजता ही माणसं निघतील. आम्ही आमचे अश्रू लपवले. दोन्ही प्रकारचे...



पाच मे ला मोहित कुमार कुशवाहचं लग्न होतं. त्यादिवशी तो खूप रडला. त्याची पायरीवर बसून समजूत काढली. लॉक डाऊन नंतर दहाव्या दिवशी निराशेनं सायकल घेऊन गावी जायला निघालेला हिरालाल. त्याला पाठनं पळून मामानं परत आणलेलं.


मोहित कुमार जाता जाता म्हणाला, "दीदी, अच्छा हुआ नां, हमने धीरज रखा|" "हां रे, धीरज वही रखता है जो बहादूर है, इंतजार का अपना एक मजा है..", मी गोड हसून त्याला म्हटले. मामा म्हणाला," आये तो थे कमाने के लिए पर खाली हात जा रहे है" " मामा, तुम खुद जा रहे हो, वह घरवालों के लिये बडी बात है नं, पैसा कमाने के लिये जिंदगी पडी है मेरे बर्फ के गोले.. " असं म्हटल्यावर त्यानं हसून टाळी दिली. सारेच हसू लागलो.


    आता दसरा झाल्यावर हे लोक परत येतील. आम्ही नंतर एकत्र बसून अंगणात आईस्क्रीम खाणारोत!


 


 - डॉ. निधी पटवर्धन


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image