आठवणी पावसाच्या - कवी - अभिजित पिसे

 


        निळ्या आभाळात पांढुरके ढग गर्दी करू लागतात तेंव्हा प्रतिक्षेची विण वाढवित मनात दाटून येतात सरींच्या आठवणी ! आठवणी पावसाच्या सुखावतात मनाला. तर कधी पापण्यांचे काठ ओलावून राहतात. रिमझिम सरींत चिंब झालेलं अल्लड बालपण, थरारत्या गारठ्यात सजणीच्या सहवासातला ऊबदार क्षण, रिमझिम धारांच्या संगतीत बहरून आलेलं जीवनगीत अन् ओल्या स्पर्शसुखात फुलारून आलेली पाऊसप्रित. तिचं चिंब भिजणं, व्याकुळ होणं अन् अधिर मनाला आस लावून रिमझिम बरसणाऱ्या सरी आजही हूरहूर लावतात मनाला ...
        पाऊस बरसतच असतो अन् पाऊस ओली आठवण पुढे सरकत राहते. धूंद मधुर क्षणांनी रोमांचित करीत राहते. स्वप्नांच्या दुनियेत प्रितीचे पंख लावून आपण मुक्त विहारत असतो. मोहरत्या डवरत्या आठवणींत भान हरवून गेलेलो असतो.
        आठवणी बालवयात पावसात ... पाण्यात कागदी होड्या सोडल्याच्या ... पाटी दप्तर पाठीशी मारून ... एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत भिजल्याच्या ... आठवणी कुमार वयात ... नजरेत प्रतिक्षेची विण वाढवित ... रोज तिची वाट बघण्याच्या ... आठवणी रिमझिमत्या पावसात ... छत्रीशिवाय ... एकमेकांचा हात हातात गुंफून ... ओले चिंब चिंब झाल्याच्या ... आठवणी ओल्या तन - मनाने एकमेकांच्या ... धूंद मिठीत अन् डोळ्यात डोळे मिसळून ... गुजगोष्टी केल्याच्या ... आठवणी रोमरोमांच फुलकित करीत ... नसानसांत शहारल्याच्या ... अशा आठवणी कितीतरी मयूरपंखी ... ओल्या आठवणी पावसाच्या ...
        तिच्या इवल्याशा फुलपाखरी छत्रीत ... रिमझिमत्या पावसात ... दोघेही भिजलो होतो ... गारठा पळवून एकमेकांच्या ऊबदार सहवासात ... अवचित मिठीत बिलगलो होतो ... रोमरोमांत सतार झंकारली होती ... आरोह अवरोहाच्या उन्मादक लाटा ... नसानसांत भिरभिरत होत्या ... ओठावरचे शब्द केंव्हाच मुके झाले होते ... एक अमामिक भिती प्रणय जागवित होती ... आस मनाची आयुष्य गुंफित होती ... अशा पाऊसवेळी ... दोघेही दंग चिंब पावसात ... अशा पाऊसवेळी दरवळला मृद्गंध श्वासाश्वासात ...
        अशीही एक आठवण ... काळजावर कोरलेली ... एका रिमझिमत्या कातर संध्याकाळी ... चिंब ओल्या स्वरांनी भिजलेली ... हात हाती घेत तिचा तिला विचारलं होतं ... पाऊस आल्यावर मोर नाचतो की ... मोर नाचल्यावर पाऊस येतो ?... थरथरत्या स्वरात ती म्हणाली ... माहित नाही मला ... पण ... खरं सांगू ... तू भेटलास की माझा मनमोर ... प्रितीचे मोरपंखी रंग उधळीत नाचतो ... तेंव्हा तना - मनात पाऊस दाटून येतो ... हृदयाला स्पर्शतो चिंब भिजवतो ... अगदी तुझ्यासारखा ... मनामनातूनी निथळतो ... सुखावलो मी अन् चुंबिले तिला ... अन् धुंवाधार पाऊस ... सरीसारखी ती मला बिलगलेली ... अशीही एक आठवण काळजावर कोरलेली ...
        पाऊस बरसतो ... बहर फुलारून येतो ... तन - मन चिंब करतो ... भावनांना कुरवाळतो ... अंतःकरणात दडलेल्या दाटलेल्या ... आठवणीही जागवतो ... मग आठवणींच्या उमाळ्याने डोळ्यातूनही धारा बरसतात ... पाऊस ओल्या स्मृती तिच्या ... अजूनही आयुष्य गुंफतात ... आठवणी आठवणी पावसाच्या ... डोळ्यासमोरून सरकत राहतात ... पाऊस दाटून येतो अन् व्याकुळ मनमोर पिसारा फुलारून नाचताना तिच्या संगतीतल्या पाऊस ओल्या आठवणी मनात फेर धरून नाचतात ... आठवणी आठवणी पावसाच्या ... नवं आयुष्य गुंफतात.
        पहिल्या पाऊस आठवणींच्या ... किती गोळा करू गारा 
        तिच्या आठवणींच्या सरींत येती ... पहिल्या पाऊसधारा


*' पावसात कसं चिंब चिंब भिजावं*
  *रेशिमधारांत चिंब निथळताना* 
  *ओल्या सरींसारखं कुणाच्यातरी मनात* 
  *आठवणींचं मोरपिस बनून रहावं '*


--- *अभिजित* *शशिकांत* *पिसे*
         ' *अक्षरशिल्प* ' 
( *खेंड* ) *चिपळूण*, *ता*. *चिपळूण*
     *जि*. *रत्नागिरी* - *४१५६०५*
         -- *९९७५५५४०१४*


Popular posts
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोक निर्माण मराठी ई-वृत्तपत्र
Image
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह(दादर) निवासस्थानी काही अज्ञात इसमानी हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ अटक करा - कामोठे रिपाईची मागणी
Image
आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडीचा वेध. ( चिपळूण, खेड, देवरुख, मुंबई, पोलादपूर आणि कोल्हापूर)
Image
मन: सामर्थ्यदाता या सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या अनुभवसंकिर्तना सह भक्तीरसनाचा सत्संग सोहळा उत्साहात संपन्न
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image