या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे! लेखिका प्रा. विस्मया कुलकर्णी


       "या जन्मावर ,या जगण्यावर ,शतदा प्रेम करावे" हे स्वर्गीय अरुण दाते यांच्या आवाजातल  ,सन्माननीय कवी मंगेश पाडगावकर यांचे गीत म्हणजे मनावरचे मळभ दूर करून मनाची बॅटरी चार्ज करणारा एक प्रभावी टॉनिक आहे .खरच आपल्याला मिळालेल् आयुष्य हीएक परमेश्‍वरी देणगी म्हणा किंवा निसर्गाची कृपा म्हणा .कारण अध्यात्म असं सांगतं की ८४ं दशलक्ष योनी फिरून हा मनुष्य जन्म मिळतो .तर विज्ञान किंवा निसर्गाचा नियम असा आहे की अनेक स्पर्मस पैकी अगदी एखादा स्पर्म खूप सारी लढाई जिंकून आपलं अस्तित्व सिद्ध करतो आणि मग आईच्या पोटात बाळाचा जन्म होतो .म्हणजे मनुष्य जन्म हा फार मौल्यवान आहे ना. आपण आणि इतर प्राण्यांमध्ये असणारा मुख्य फरक म्हणजे आपण बुद्धिप्रामाण्यवादी माणसं आहोत आपण विचार करू शकतो .हे विचार, भावना ,संवेदना आपण शब्दात व्यक्त करू शकतो .यासाठी आपल्या मनातील विचारांची योग्य अशी मशागत व्हायला हवी. मनाच्या जमिनीचा पोत जितका सुपीक तितकी विचारांची बैठक पक्की.
          प्रभातसमयी उठल्यावर घराचा दरवाजा उघडून अंगणात प्रवेश करताच आपल्या परसबागेत फुललेली टवटवीत फुलं, त्यांच्या अंगभूत सौंदर्याला अधिक तजेलदार करणारी लाल-गुलाबी सूर्यकिरण ,पक्षांचा किलबिलाट ,हवेतला हवाहवासा वाटणारा गारवा, पानांचा हिरवागार रंग, त्यांना अधिक सुशोभित करणारे त्यांच्यावरती पडलेले दवबिंदु पाहिल्यावर वाटतं की सगळा निसर्ग जणू आपल्याला सुप्रभात म्हणतोय .नव्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किती आतुर असतो ना हा निसर्ग. म्हणजे निसर्गातला प्रत्येक घटक या जगात स्वतःच्या अस्तित्वाची भर घालून माणसाचं जगणं साजरा करण्याचा प्रयत्न करतो आहे.
     सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात आपल्या जगण्यातला उत्साह आणि उमेद वाढते .पण आज आजूबाजूला जर डोकाऊन पाहिलं, समाजातल्या अस्वस्थतेचा कानोसा घेतला की वाटतं रोजचं जगणं साजरा करण्याची ती उमेद आणि उत्साह कुठेतरी संपुष्टात येत आहे. आज समाजातल्या सर्व स्तरातल्या आणि थरातल्या लोकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना दप्तराचं ओझं ,पालकांच्या अपेक्षा, गृहपाठाचा ताण यासारख्या समस्या भेडसावतात .तरुणाई बेकारी,आवडीचं काम मिळणं, िळणार्‍या कामाचा मोबदला कमी पण कामाचे तास मात्र जास्त ,कामाच्या कंत्राटी पद्धतीमुळे नोकरीची अनिश्चितता आणि अशाश्वती अशा प्रश्नांच्या चक्रव्यूहात सापडली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे पण माणसांची मन जरा दूर गेल्याच सुद्धा भासत आहे .जगण्यात एक प्रकारची कृत्रिमता आली आहे . प्रौढांना या सगळ्या बदलांना सामोरं जाताना परिस्थितीजन्य ताण सहन करावा लागतो आहे .यामुळे हृदयरोग, मधुमेह अशा जीवनशैलीशी संबंधित रोगांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. बदलत्या समाज व्यवस्थेच फलित म्हणून की काय तर वृद्धांना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो आहे. श्रीमंतांची श्रीमंती रोग, गरिबांची नेहमीच दुखणी ,मध्यमवर्गीयांची अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होणारी ओढाताण हे तर आजच्या जगाच्या कानाकोपऱ्यातल्या माणसांचं अस्तित्व सिद्ध करणार सत्य बनत चालल आहे.
         अशा परिस्थितीत मानवी मनाची उमेद आणि उत्साह वाढवणारा मनाला आशावादाचा हमरस्त्यावर आणणारा रोजचं जगणं साजरा करायला शिकवणार मंत्र आहे 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे'.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधण्याची आणि अनुभवण्याची मनाला सवय लागली की आपोआप आपल्या जगण्यातला आनंद अंक कित्येक पटीने वाढत जातो. यासाठी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे सजगपणे पाहण्याची गरज आहे.
    अगदी साध्या झोपडीत राहणारी एक मजूर स्त्री जेव्हा आपल्या नवऱ्याला कामावरून घरी आल्यावर तव्यावरची गरम गरम भाकरी पानात वाढते तेव्हा पतीपत्नी यांच्यातील नात्याची ओढ आणि प्रेम त्रयस्थपणे आपण अनुभवू शकतो.मोलमजुरी करूनही अगदी मुलाची शाळा सुटताना वेळेत त्याला शाळेतून घरी न्यायला आलेली आई हे एक वासल्यल्याचे मूर्तिमंत उदाहरण.लग्न झाल्यावर सासरी राहून उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळाल्यावर पहिला पगार नवर्‍याच्या हातात देणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर नवऱ्या बद्दलचा अभिमान किंवा आई आणि पत्नीच्या विनंतीला मान देऊन सर्व व्यसन सोडून देणारा एक मुलगा, नवरा निरपेक्ष भावनेने वर्गातील मुलांना शिकवून निकालाच्या दिवशी आनंदित होणारी शिक्षिका  किंवा वडिलांप्रमाणेच सैन्यात भरती होऊन शौर्य गाजवणाऱ्या मुलाला शौर्य पदक मिळणार असतील अशा अगदी सामान्य घटनांपासून ते असामान्य नावलौकिक प्राप्त होऊ शकणाऱ्या असंख्य घटना सतत आजूबाजूला घडत असतात त्या घटना जर आपण सजगपणे अनुभवल्या तर या जगण्यावर आपलं प्रेम कित्येक पटीने वाढेल.
           नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या थांबतील मानसिक आणि मनोकायिक आजारांच्या रुग्णांची संख्या कमी होईल प्रेम आपुलकी सद्भावना परोपकार वात्सल्य यासारखा सकारात्मक भावनांची गुंफण करण्याची आपल्याला सवय लागेल आणि रोजचं जगणं अगदी सुरक्षित आणि आश्वासक बनेल आणि मग आपोआपच आपला जन्मावर आणि जगण्यावरचा प्रेम कित्येक पटीने वाढेल.