खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !

 

खेड - लोटे/ लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)  खेड तालुक्यातील लोटे येथील महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोड तयार होऊन सुद्धा खेड आगाराच्या खेड - चिपळूण धावणाऱ्या लोकल बस सर्व्हिस   रोडवरून न जाता काँक्रीटच्या रस्त्यावरून धावत आहेत.

परिणामी खेड चिपळूण दरम्यानचे लोटे पंचक्रोशीतील प्रवासी तसेच विद्यार्थ्यांमध्ये बसची वाट बघत नक्की कुठे थांबायचे असा संभ्रम निर्माण झाला आहे .

            विद्यार्थी व प्रवासी काँक्रीट रोडवर थांबले तर चिपळूण आगाराच्या बस  सर्व्हिस रोडवरून जात आहेत त्यावेळी धावत त्यांना सर्व्हिस रोडवर यावे लागते. तसेच याउलट सर्व्हिस रोडवर बसची वाट पाहत थांबल्यानंतर खेड आगाराच्या बस काँक्रीट रोडवर जातात आणि पुन्हा या प्रवासी आणि विद्यार्थ्यांना धावपळ करत  काँक्रीटच्या  रस्त्यावर बस पकडण्यासाठी धाव घ्यावी लागते . या गोंधळात काँक्रीटच्या रोडवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एखाद्या वाहनाने या धावपळ करणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे . याबाबत लोटे पंचक्रोशीतील नागरिकांनी खेड आणि चिपळूण या दोन्ही आगारांना सविस्तर पत्र दिले असून ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन चिपळूण आगाराच्या सर्व बसेस आता सर्व्हिस रोडवरून धावत आहेत .याबाबत , लोटे पंचक्रोशीतील प्रवासी वर्गाने चिपळूण आगाराचे आभार देखील मानले आहेत .परंतु ,खेड आगाराच्या बसेस या विद्यार्थी व प्रवाशांची विनंती धुडकावून लावत आहेत , आणि आपला मनमानी कारभार चालू ठेवून सर्व बसेस काँक्रीट रोडवरूनच हाकत आहेत .तसेच , खेड - चिपळूण या लोकल फेऱ्यांसाठी यापूर्वी खेड आगाराच्या साध्या बसेस धावत होत्या , या साध्या बससाठी लोटे ते चिपळूण असे २५ रुपये तिकीट होते. मात्र , गेले आठ ते दहा दिवस खेड आगारातून शिवशाही बस खेड - चिपळूण अशा लोकल फेरीसाठी सोडण्यात येत आहे . या शिवशाही बसची मागणी प्रवासी वर्गांकडून केली नाही किंवा अन्य कोणी केली नाही .मात्र, खेड आगारामध्ये बसचा तुटवडा असल्या कारणाने ती शिवशाही बस सोडण्यात येत आहे ,असे खेड आगाराकडून पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सांगण्यात आले. या बसमध्ये पासधारक विद्यार्थ्यांना घेतले जात नाही. तसेच लोटे ते चिपळूण प्रवासासाठी २५ रुपयांऐवजी चाळीस रुपये मोजावे लागत आहेत , यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे , तसेच इतर प्रवाशांना सुद्धा नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. म्हणून ही शिवशाही बस तात्काळ बंद करून त्याच्या जागी साधी बस पूर्ववत सोडण्यात यावी आणि सर्व साध्या लोकल फेऱ्या या सर्व्हिस रोडवरूनच   गेल्या पाहिजेत, अन्यथा लोटे पंचक्रोशीतील ग्रामस्थ खेड बस स्थानकात येऊन ठिय्या देऊन बसतील. असा इशारा पंचक्रोशीतील प्रवासी वर्ग तसेच विद्यार्थी वर्गाकडून दिला गेला आहे .

Popular posts
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अखंडीत वितरीत होणारे लोकनिर्माण मराठी ई - वृत्तपत्र
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image