♦' *व्यसन :- सामाजिक चिंता* '♦ - अभिजित पिसे


       


        तंबाखू , गुटखा चघळणे, सिगारेट ओढणे, दारू पिणे ही ' क्रेझ ' तरूणवर्गात झपाट्याने वाढत आहे. अंमली पदार्थांचे सेवन वाढत आहे. व्यसन करणं ही फँशनच झाली असून व्यसन असणं हे प्रतिष्ठेचं समजलं जाऊ लागलंय. परिणामी युवापिढीला लागलेली ही व्यसनाधिनतेची किड चिंतेचा विषय बनली आहे. कोणत्याही गोष्टीला विरोध केला की ती करण्याचा अट्टाहास तरूणांत अधिक असतो म्हणूनच तंबाखू, गुटखा, सिगारेट यांवर बंदी घालूनही त्यांची विक्री आणि सेवन सर्रास चालूच आहे.
        व्यसनांच्या आहारी जाऊन तरूणपिढी आपलं जीवन उद्धवस्त करत आहे. शाळा, महाविद्यालयातील मुलं सुरूवातीला ' फॅड ' म्हणून या वस्तूंचं सेवन करतात मग इतरांच्यात ' इंप्रेशन ' वाढून तो सवयीचा भाग होऊन व्यसन जडतं. या वस्तूंपासून होणारे दुष्परिणाम समजत असूनही केनळ फॅशन म्हणून व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. 
        व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरूणपिढीला नैतिक जबाबदाऱ्यांची जाण राहिलेली नाही. व्यसनी माणसांच्या संगतीत जाऊन तरूणवर्ग अनेक अवैध धंद्यात ओढला जातो. जुगार, मटका खेळणे, त्या पैशांतून चैन करणे, व्यसन करणे, व्यसनासाठी चोऱ्या,लुटमार, खून यांसारखे प्रकार तरूणांकडून घडतात. व्यसनी व्यक्ती कौटुंबिक स्वास्थ बिघडविते. व्यसनासाठी पत्नी - मुलांना मारहाण असे प्रकारही घडतात. परिणामी अनेक संसार उद्ध्वस्त होताना दिसतात. दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणे, तंबाखू, गुटखा, पान  खाऊन रस्त्यावर, इमारतींच्या भिंती, जिने यांवर थुंकीच्या पिचकाऱ्या उडविणे, नशेच्या धुंदीत दमदाटी - दादागिरी करून इतरांना त्रास देणे, तसेच तरूण मुली महिलांची छेड काढणे, अपशब्द बोलणे असे सामाजिक स्वास्थ बिघडविणारे प्रकार घडतात.
        व्यसनमुक्तीसाठी शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. तंबाखू , गुटखा , सिगारेट यांवरील बंदी आवश्यक आहे आणि ही बंदी शाळा, कॉलेज यांपूरती मर्यादित अंतरापर्यंत न राहता पूर्णपणे बंदी घालणं आवश्यक आहे. व्यसनांच्या समुळ उच्चाटनासाठी तंबाखूजन्य पदार्थांचं उत्पादनच बंद करायला हवं. नुसती बंदी म्हणून चालणार नाही तर प्रत्यक्ष कृती झाली पाहिजे. त्यादृष्टीने तंबाखू , गुटखा , सिगारेट व तत्सम तंबाखूजन्य पदार्थ यांची खरेदी - विक्री करणारे दोघांवरही कारवाई व्हायला पाहिजे. व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरूणपिढीला त्यांच्या दुष्परिणामांची माहिती देण्याचे काम प्रसार माध्यमांनी करायला हवं. 
        एकूणच व्यसन ही समस्या तरूणपिढीचे जीवन अंधारमय करणारी आहे. व्यसनांचे दुष्परिणाम वेळीच समजून आणि स्वतःच्या मनावर पटवून घेऊन व्यसनांच्या आहारी न जाण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा ठेवण्याची गरज आहे. व्यसनांच्या आहारी जाऊन तंबाखू , गुटखा , सिगारेट , दारू  यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा चांगले छंद जोपासा , खेळाचा आनंद घ्या , पर्यटन स्थळांना भेटी देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या , चांगली पुस्तके घेऊन वाचनाची आवड निर्माण करा. तरूणांनो ' हे जीवन सुंदर आहे तुम्ही त्याचे सौंदर्य आहात ' हे विसरू नका. जीवनाकडे ध्येयदृष्टीने पाहा. व्यसनांपासून दूर राहून भाविपिढीलाही व्यसनांपासून रोखा. व्यसनमुक्त जीवन जगून आपला विकास करून समाजाचे पर्यायाने राष्ट्राचे हित साधा ●


--- *अभिजित* *शशिकांत* *पिसे*
         ' *अक्षरशिल्प* ' 
( *खेंड* ) *चिपळूण*, *ता*. *चिपळूण*
     *जि*. *रत्नागिरी* - *४१५६०५*
         -- *९९७५५५४०१४*