दत्तूअण्णा : एक निस्वार्थी समाजसेवक. - धर्मराज पाटील


   आपला अनुभव, ज्ञान, शक्ती, प्रतिभा या सर्वांसहित स्वतःच्या देहाला सामाजिक कार्यासाठी वाहून घेत आज सत्कृत्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू ठेवणाऱ्या श्री दत्ताराम पुंजाजी घुगे यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ! दहिसर मुंबई येथील संदेश प्रतिष्ठान आयोजित संवाद व्याख्यानमालेत श्री. घुगे यांच्याशी माझी ओळख झाली ती एक पत्रकार म्हणून. शब्दात ना कुठली गुंतागुंत आणि वागण्यात ना कुठले आडवळण असलेल्या या व्यक्तिमत्त्वाशी अगदी तोंडओळखीचे रूपांतर अल्प कालावधीत मैत्रीत झाले. वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी मैत्रीत वय विसरणारे व समोरच्याला वय विसरायला लावणाऱ्या या मधूर मित्राचे पैलू पुढील भेटींमध्ये हळूहळू उलगडत गेले.


     एक वरिष्ठ पत्रकार, लोकसंस्कृती लेखक, कवी, वक्ता, समाजसेवक, गुणवंत कामगार, रक्तदाता अशा अनेक बिरुदांनी समाजात वावरतांना श्री दत्ताराम घुगे यांचा उत्साह, आत्मविश्वास व कार्यक्षमता पाहून परिसरातील व संपर्कात आलेले दुरचेही अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, नेत्रचिकित्सा शिबीर, गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व शिष्यवृत्त्या वाटप, परिसरातील सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेणाऱ्या श्री. घुगे यांची 'दत्तूअण्णा' म्हणून ओळख निर्माण झालेली आहे.


दत्तूअण्णा ताडदेव येथून दहिसरमध्ये आले ते समाजकार्याची पार्श्वभूमी घेऊनच. स्वकर्तृत्वाला वाट हवी असेल अशा जीवनाची दुसरी इनिंग सुरू करणाऱ्या सेवानिवृत्त नागरिकांसाठी दत्तूअण्णा एक दीपस्तंभच आहेत. गरीबी स्वतः अनुभवत, जीवनातील अनेक संकटांवर मात करत, वाटेतील काट्यांना लीलया दूर सारत आपले अनुभवविश्व त्यांनी स्वतः समृद्ध केलेले आहे. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्र आणि आजच्या आधुनिक सामाजिक माध्यमांमधे त्यांचा मुक्त संचार मी जवळून पाहिलेला आहे. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला व लोकसंस्कृती यावरील त्यांचे लेखन वाखानण्याजोगे आहे. त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय व राज्यस्तरावर शासनाने व अनेक सामाजिक संस्थांनी प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करून घेतलेली आहे. माजी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते 'गुणवंत कामगार' हा राष्ट्रीय पुरस्कार, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती समाजसेवा पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले स्मृती समाजसेवा पुरस्कार, दीनबंधू पुरस्कार इत्यादी मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.


    माजी केंद्रीय मंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने केंद्रीय सत्तेत व माजी आमदार बी. ए. देसाई यांच्या सहकार्याने राज्य सरकारमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या श्री. घुगे यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळात चाळीस वर्षे सेवा करताना त्यांनी सामाजिक-सांस्कृतिक लोककलावंतांच्या समस्या स्तंभलेखन, व्यक्तिविशेष, व्यक्तिपरिचय इत्यादी सदरांमधून जगासमोर मांडल्या आहेत व आजही मांडत आहेत. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही जाणीव ठेवून विविध वर्तमानपत्रात व आपल्या 'महाभारत न्यूज 9' या युट्युब चॅनल वर सामाजिक समस्यांना वाचा फोडत असतात. नुकतेच त्यांचे माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू यांच्या जीवनावर आधारित 'गरुडझेप' हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे व अल्पावधीत वाचकप्रियसुद्धा झालेले आहे.


श्री घुगे यांच्या प्रत्येक भेटीत व सध्या कोरोना संकटकाळी फोनवरून गप्पागोष्टी करताना खऱ्या अर्थाने त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व मला प्रतीत होत आलेले आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात लोकजागृती करताना कोरोनायोद्धा म्हणून त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. समाजसेवेकरिता निस्वार्थ समर्पण करणारे, भक्कम वैचारिक अधिष्ठान असणारे, मित्रकलेची सर्वांगीण जाण असणारे, उत्साह-आत्मविश्वास-कार्यक्षमता यांचा त्रिवेणी संगम असणारे माझे मित्र दत्ताराम पुंजाजी घुगे यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त सुख-शांतीवर्धक व आयुष्य-आरोग्यवर्धक कोटी कोटी शुभेच्छा !


धर्मराज पाटील, विरार