खिडकी - लेखिका प्रा. विस्मया कुलकर्णी


  आमच्या लहानपणी रोज सकाळी पहिली आई उठायची, स्वयंपाक घरात शिरायची आणि लगेच खिडकी उघडायची. मार्च-एप्रिल महिन्यात आमची शाळा सकाळी असायची . मी अकरा बारा वर्षांची असताना तिच्याबरोबर उठत असे.तेव्हा दिवसही मोठा असायचा. नुकतंच झुंजूमुंजू झालेलं असायचं .खिडकी उघडल्याबरोबर ती सूर्यनारायणाला नमस्कार करीत असे .आणि तिच्या दिवसाची सुरुवात होत असे. सूर्यप्रकाश, पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळत वाहणाऱ्या पाटाच्या पाण्याचा आवाज ,बाहेर फुललेली फुलं आणि त्यांचा सुगंध सगळं खिडकी स्वयंपाक घरात घेऊन यायची.विज्ञानाच्या पुस्तकात शिकल्या प्रमाणे हवा खेळती राहण्यासाठी घराला समोरासमोर खिडक्या असाव्यात एवढच ज्ञान आणि त्याच प्रमाणात त्या खिडकीचे महत्त्व त्यावेळी माझ्या आयुष्यात होतं .पुढे पुढे मात्र ज्ञानाच्या ,अनुभवाच्या आणि जाणिवांच्या कक्षा रुंदावल्या लागल्यावर खिडकीचे अनोखं महत्त्व मला हळूहळू उमजायला लागलं.
       खरंतर खिडकीच असते आपल्यातील अमर्याद क्षमतांचा शोध घेण्याच्या प्रवासाची पायवाट. मनाची खिडकी उघडून आत्मविकासाच्या प्रकाशाचा कवडसा आत डोकावला कि सापडतो तो आयुष्यात अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करण्याचा राजमार्ग. क्षितीजाच्या अस्तित्वाची तमा न बाळगता प्रवासासाठी आवश्यक तेवढ्या प्रकाशाचा पुरवठा करत आपल्याला सतत मार्गक्रमण करायला  प्रोत्साहित करणारी ती एक दीपस्तंभ . मानवी प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संगणकामध्ये देखील महत्त्वाचं अंग आहे विंडोज. 
         शेजाऱ्यांशी सख्य निर्माण करण्यातही खिडकीचा मोठा वाटा. किती घाई असली तरी शेजार्‍यांना खिडकीतून हाय-हॅलो करून विचारपूस करण्याची संधी तीच उपलब्ध करून देते. आणि शेजारधर्म जपण्याची संस्कृती आणि परंपरा चालू राहते.
         फ्लॅट संस्कृतीमध्ये तर घरातच बाग फुलवण्याची संधी म्हणजे (गच्चीची) खिडकी . खिडकीमध्ये झाडांच्या कुंड्या ठेवून मालकीणबाई निसर्गाशी मैत्री करते. मग तिथे येतात छोट्या-छोट्या चिमण्या . त्या खिडकीजवळ उभं राहून घरातल्या बाळगोपाळांना चिऊ-काऊचा  घास भरवण्याचा त्या माऊलीचा आनंद काही वेगळाच.
          मनाच्या जाणिवांची खिडकी सतत उघडी ठेवली तर अखिल मानवजातीला भेडसावणारे प्रश्न चुटकीसरशी सुटतील. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न ,अमानवी वागणूक जात, धर्म ,पंथ ,भाषा यावरून निर्माण होणारे वादंग ,महासत्ता म्हणून मिरवण्यासाठी राष्ट्र राष्ट्रात निर्माण होणारा तणाव ,यांसारख्या प्रश्नांना उत्तरं शोधायची असतील तर समाज मनाच्या खिडकीची झडपे सदोदित उघडी ठेवायला हवीत. मग आपोआप माणुसकी, विवेक, सहकार्य ,आपुलकी, प्रेम यासारख्या सकारात्मक भावनांच्या वाऱ्याचा झोत सतत घोंगावत राहील आणि पृथ्वीवरील मानवजातीचा प्रवास सुखकर होईल.
            बसने, रेल्वेने प्रवास करताना आपल्याला विंडो सीट हवी असते .ती एक प्रकारचा एकांत पुरवते .आणि प्रवासातही बाह्य जगाशी आपल्याला जोडून ठेवते .खिडकीतून मंदपणे वाहत येणारा गार वारा मनाला उत्साहीत करतो.थोडक्यात सर्व ज्ञानेंद्रियांना प्रफुल्लित करण्याचं काम करणारी खिडकी मनात डोकावायला शिकवते .नकारार्थी विचारांची जळमटं काढून टाकायला मदत करते . तिथेही स्वच्छ सकारात्मक विचारांचा उजेड पसरतो . त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या खिडकीशी भावनिक नातं आपोआप निर्माण होतं. म्हणून आपल्या मनाची खिडकी सदोदित उघडी ठेवायला हवी.
                                                      - विस्मया कुलकर्णी