आषाढ पौर्णिमा अर्थात गुरू पौर्णिमा 


 


 कल्याण /लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)


     ०५ जुलै, २०२० पासून वर्षावासास सुरूवात होत आहे. हा दिवस बौध्दांचा पवित्र उपोसथाचा दिवस आहे.
आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान बुध्दांनी पंचवर्गिय भिक्खूंना प्रथम धम्म सांगितला. दुःखाचे मूळ कशात आहे ? हे दुःख दूर कसे होऊ शकते त्याचा कार्यकारणभाव विशद केला. पूर्वी कोणीही कधीही न ऐकलेला धम्म सांगितला . अशाप्रकारे भगवान बुध्दांनी सर्वात पहिले धम्मचक्र फिरवले. त्यांचा उपदेश ऐकून पंचवर्गिय भिक्खूंना प्रज्ञा प्राप्त झाली. त्यांच्यातील अज्ञान दूर झाले. ते अहर्तपदाला पोहोचले.
अशा रीतीने संघात लोक येत राहीले आणि स्वतःचे जीवन
प्रकाशित करीत राहीले. हळूहळू भगवान बुध्दांचा*
धम्म जन सामान्यांचा जगण्याचा मार्ग झाला. विश्वाला भगवंताचा धम्म प्रकाशित करीत राहीला.


       तथागत भगवान बुध्दांना" जगत गुरू" म्हणून संपूर्ण जग आज ओळखते. आणि म्हणून या दिवसाला गुरू पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. संपूर्ण बौध्द जगतात या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. बौध्द उपासक /उपासिका सकाळीच तयार होऊन, पांढरे शुभ्र वस्र परिधान करून जवळच्या विहारात जातात.
       भगवान बुध्दाच्या प्रतिमेला धुप-दिप-उदबत्ती लावून मोठ्या श्रध्देने बुध्दपूजा-पाठ, वंदना म्हणतात. भिक्खू संघ त्यांना अष्टशिल प्रदान करतात. उपासक उपोसथ व्रत धारण करून अष्टशीलाचे कडक पालन करतात. विहारात विपश्यना करून स्वतःतील दोष घालवण्याचा प्रयत्न करतात.
या दिवशी भिक्खू लोकांच्या कल्याणासाठी धम्मदेसना,धम्म प्रवचन करतात.


      भगवंताचा धम्म कसा आदि कल्याण, मध्य कल्याण आणि अंतिम कल्याणकारी आहे, हे उदाहरणे देऊन समजावून सांगतात. अशा रीतीने आषाढी पौर्णिमा अर्थात  गुरू पौर्णिमा सर्व बौध्द राष्ट्रे मोठ्या उल्हासांत, आनंदानेसाजरी करतात.


     डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धम्म वाटेवर आणून जन्मोजन्मीचे आपल्या सर्वांचे कल्याण केले. आपणही त्यांचे अनुयायी म्हणून आणि एक बौध्द उपासक म्हणून बौध्द नितीनियमांचे पालन केले पाहिजे. दरपौर्णिमा, अमावस्या आणि महिन्यात येणाऱ्या दोन्ही अष्टमीच्या दिवशी विहारात जाऊन अष्टशील ग्रहण केले पाहिजे.
       या काळात जास्तीतजास्त धम्मचर्चा झाली पाहिजे. धम्मग्रंथाचे वाचन झाले पाहिजे. धम्म श्रवण केले पाहिजे. दान - शील - भावना वृध्दींगत केली पाहिजे. आपल्यातील राग, द्वेष, लोभ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंताचा धम्म हा तत्काळ फळ देणारा आहे. म्हणून भगवान बुध्द म्हणतात, " एहि पस्सिको " या आणि पाहा. जर तुमच्या बुध्दीला पटला तरच घ्या. जबरदस्ती नाही. भगवान बुध्द केवळ मार्गदाता आहेत. मोक्षदाता नाहीत. तेव्हा आपला सर्वांगिण विकास हा आपणच करावयाचा असतो.
" अत्ता हि अत्तनो नाथो " तुमचा स्वामी तुम्हीच आहात, दुसरा कोणीही तुमचा स्वामी / मालक नाही. स्वतः चा उध्दार हा स्वतःच करावयाचा असतो, म्हणून स्वतः स्वयंप्रकाशित व्हा. परप्रकाशित राहू नका. स्वतःचा प्रकाश स्वतः बना.


" अत्त दिप भव "


प्रज्ञासूर्य प.पूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञान चक्षूंना भगवान बुध्दांचा महान धम्म कळला, हाच मार्ग - धम्म माझ्या लोकांचे कल्याण करू शकतो अशी जेव्हा त्यांची खात्री झाली, तेव्हा त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौध्द धम्म स्वीकारला. भगवंताच्या पावन भूमीत पुन्हा
एकदा धम्मचक्राचा आवाज निनादला .....
 बुध्दं सरणं गच्छामि .
  धम्मं सरणं गच्छामि 
  संघं सरणं  गच्छामि 
  सब्बे सत्ता सुखी होन्तु,
 सब्बे होन्तु चं खेमिनो .
   सब्बे भद्राणि पस्सन्तु ,
   मा कञ्चि दुक्खमागमा ....!!
अर्थ  : सर्व प्राणी-जीव सुखी होवोत. सर्व  कुशल -क्षेम युक्त होवोत. सर्व शुभ पाहोत . कोणालाही कुठल्याही ```प्रकारचे दुःख प्राप्त न होवो.
साधू  साधू  साधू 


     आषाढी पौर्णिमा अर्थात येणाऱ्या  गुरू पौर्णिमेच्या
सर्व उपासक / उपासिकांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा !


       नमो बुद्धाय