मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे यांजकडून)
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या शाहीर अमर शेखांच्या शाहीरीने सारा महाराष्ट्र ढवळून निघाला,ज्यांच्या शाहीरीने इथलं मवाळ मन जागृत झालं,इथल्या मातीच्या नसानसात लढ्याचा अंगार फुलला त्या शाहीर अमर शेखांच्या शाहीरीचा,लोकलढ्याचा वारसा घेऊन आलेल्या मल्लिका अमर शेख, हा वारसा फक्त घराण्याचा नव्हता हा वारसा चळवळीचा होता,हा वारसा विचारांचा होता. साहित्यिक अनुज केसरकर यांनी लेखिका मल्लिका अमरशेख यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. पुढे वडिलांच्या वारश्यावर न थांबता स्वतःच्या लेखणीने अढळ असे दृढ स्थान मल्लिका अमर शेख यांनी मराठी साहित्य विश्वात निर्माण केले आहे. कथासंग्रह,एकांकिका, नाटक, आणि चित्रपट,संहिता अशा विविध वाड्मय प्रकारात पाच तपाहून अधिक काळ लिहित्या राहिल्या. वाळूचा प्रियकर , देहऋतू, माणूसपणाचे भिंग बदलल्यावर अशा दर्जेदार काव्यसंग्रहाच्या लेखिकेवर आज उपासमारीची वेळ आली आहे.अशा प्रकारे एका लेखिकेच्या हाल अपेष्टा पाहून मन सुन्न झाले. मल्लिका शेखांसारखी हाडाची कलाकार माणसे आपल्या कला प्रांतात सतत कार्यमग्न असतात त्यात त्यांना स्वतःचाही विसर पडतो. कलेसाठी ,साहित्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालून जर वाट्याला ही अशी उपेक्षा येत असेल तर तुमचं सरकार म्हणून काय करायचं ? अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने आयुष्य जगताना अशा कलाकार , लेखिकेने काय करायचं ? असे परखड मत साहित्यिक अनुज केसरकर यांनी व्यक्त केले. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वतःवर असलेल्या मल्लिका अमर शेखांना आज ही उतारवयात रोजच्या जगण्यासाठी लढावं लागत.मुलाची प्रकृती नाजूक असल्याने संपूर्ण घर त्यांच्या लेखनावर चालायचे. तसेच कोरोना लॉकडाऊनच्या काळात तो ही आर्थिक पर्याय बंद झाल्याने रोजचा दिवस कसा जगायचा या विवंचनेत आज मल्लिका अमरशेख आहेत.
'मला उद्धवस्त व्हायचं 'हे त्यांचं गाजलेलं आत्मकथन.आपले विचार रोखठोकपणे व्यक्त करण्याचा निर्भीडपणा,विचारांचे स्वातंत्र्य ,परखडपणा, आणि स्पष्ट वक्तेपणा असलेली ही लेखिका अंधेरीतील्या लोखंडवाला परिसरात आपल्या छोटेखानी घरात आज कष्टदायी जीवन जगत आहे.
झोपलेल्या की झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य शासनाला ही आज त्यांच्याकडे बघायला वेळ नाही.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेच्या आमदारकीचे दिलेले आश्वासन पूर्ण करणे सोडाच,तुम्हाला विन्मुख जाऊ देणार नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा तोंड दाखवलेले नाही.शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळेंनी निवडणूक प्रचारापुरता मल्लिका अमर शेख यांचा उपयोग करून नंतर त्यांच्याकडे पाठ फिरवली असून खासदार शेवाळेंनी ही घोर फसवणूकच केली आहे, राहुल शेवाळे आपण सुसंस्कृत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहात, एका साहित्यिकाची ही अशी आपण केलेली घोर फसवणूक बरी नव्हे;त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जग येऊन आपण केलेली चुक सुधाराल अशी समस्त महाराष्ट्राला अपेक्षा आहे.तसेच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आपण ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत त्या महाराष्ट्रासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलेल्या अमर शेखांच्या मुलीचा, एका कलाकार साहित्यिकाचा,मल्लिका अमर शेखांचा विसर पडत असेल तर यांसारखे दुसरे दुर्दैव या महाराष्ट्राचे काय असू शकते.
ही कहाणी दुःखद मालिका एकाच मल्लिकेची नसून आज असे अनेक लोककलावंत साहित्यिक आज उपेक्षित जीवन जगत आहेत. आजारपणात दवाखान्याला जायला पैसे नाहीत,जवळची माणसे अशा वाईट काळात सोडून गेली आहेत.नामदेव ढसाळांच्या मृत्यूनंतर डोक्यावर झालेला
कर्जाचा बोजा आणि अनेक समस्यांचा डोंगर, पुस्तके , वर्तमानपत्रे , रॉयल्टी,मानधन अशा सर्वच बाजुंनी उपेक्षा इतकी भयावह आहे की रोजची जगण्याची लढाई लढताना ही मल्लिका शेख आजही हतसमुख पणे कुठलाही बडेजाव न करता हसतमुखपणे वावरत असतात. आभाळव्यापी माणसे अशीच असतात त्यांचं मोठेपण आपल्याला जपता यायला हवं.माणूस गेल्यावर त्याला अमुक तमुक पुरस्कार द्यायचे त्याचे पुतळे उभारायचे.जितेपणी हाल आणि मेल्यावर मान अशा विचित्र परिस्थितीत ही मल्लिका अमर शेखांसारखी माणसे जगत आहेत .त्यांच्या जगण्याला बळ द्यायला,सरकारचे डोळे उघडतील तेव्हा उघडतील तोवर अनेक सेवाभावी संस्थानी व्यक्तींनी आता पुढाकार घ्यायला हवा. मुळातच कणखर असलेल्या मल्लिका अमर शेख यांच्या कथा व फिल्म संहिता या चित्रपटासाठी घेऊन त्याबद्दल त्यांना मानधन कॉपीराईटचे पैसे मिळावेत. त्यासाठी आता अधिकाधिक निर्मात्यांनी पुढाकार घेऊन मल्लिका अमर शेख हा धगधगता चित्रपट जगलेल्या मल्लिका अमर शेखांवर आणि त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या कथांवर, साहित्य कृतींवर त्यांच्या दलित पँथरवर चित्रपट बनवायला आता पुढे यावे, असे मनोगत साहित्यिक अनुज केसरकर यांनी व्यक्त केले.
अनुज केसरकर
मोबा-8080336488
ईमेल-anujkesarkar1@gmail.com