भ्रष्टविचार थांबवा - लेखन - कु.रुणाली राजेंद्र पांचाळ

               


      देशाला महासत्ता बनवण्याच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन तरुणाई झटून काम करतेय.पण देशाला लागलेली भ्रष्टाचाराची किड हा यातला मोठा अडसर ठरतो आहे.
बाळा दुकानात जाऊन ५ रुपयांची कोथिंबीर घेऊन ये आणि २ रुपये तुला ठेव ही भ्रष्टाचाराची पहिली पायरी आहे. सुरुवात अगदी आपल्या घरापासूनच होते.मुलाने आपल काम ऐकावं म्हणून आईवडील किती सहजपणे बोलून जातात. पण पुढे हीच सवय घातक ठरते. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच हळु हळु भ्रष्टाचाराचं बीज फोफावत. आज अशी कोणती संस्था आहे जिथं भ्रष्टाचार होत नाही? मुलांना चांगल्या शाळेतून प्रवेश मिळावा म्हणून द्या डोनेशन, अनधिकृत बांधकाम अधिकृत दाखवायचं आहे म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चहापाणी द्या. प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार.
        भ्रष्टाचार ही गोष्ट जर मुळापासून नष्ट करायची असेल तर त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतः पासूनच करायला हवी. स्वतः प्रामाणिकपणे काम करायला हवं. सरकारने त्यांच्या भ्रष्ट अधिकारी तसेच भ्रष्टाचाराला प्राधान्य देणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी. भ्रष्ट लोकांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळते.देशात असुविधा, विषमता निर्माण होते. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कामाला वाव द्यायला हवा.
        भ्रष्टाचार वाढण्याचे मुख्य कारण आपणच आहोत.भ्रष्टाचारात पैसे घेणाऱ्या पेक्षा पैसे देणारा सुध्दा जबाबदार असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई होत नाही.त्यामुळे दुर्दैवाने कायद्याचा धाक हा राहिलाच नाही. कायद्याचा धाक हा असायलाच हवा.कायदा आणखी कडक व्हायला हवा. यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला  आळा बसेल. आपल काम लवकर व्हावं यासाठी आपण चहापाण्यासारखा सोपा शब्द वापरून सहज पैसे देतो. जोपर्यंत आपण लाच देऊ तोवर समोरची व्यक्ती ती घेणार.
         हव्या असणाऱ्या सुखसोयी वेगवेगळ्या मार्गांनी मिळवणं म्हणजे भ्रष्ट्राचार. या अशा भ्रष्ट्राचाराला प्राधान्य आपणच देतो आणि आपणच बळी पडतो. सध्याच्या झटपट जीवनात प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट झटपट हवी असते. जेव्हा ती गोष्ट त्याला लगेच मिळत नाही तेव्हा तो पळवाटा शोधत असतो. त्यातलीच ही एक पळवाट म्हणजेच भ्रष्टाचार.हल्ली लाच दिल्याशिवाय कुठलच काम पूर्ण होत नाही. म्हणजेच आपण लाच देऊन आपल पूर्ण काम करून घेतो. अर्थातच आपण भ्रष्टाचाराला खत पाणी घालतो.जर आपण सर्वांनी खतपाणी घालणे बंद केलं तर भ्रष्टाचार बंद होऊ शकतो. हे सर्व रोखण्यासाठी आपल्यात सुधारणा करायला हवी. शिक्षण यंत्रणा असो, कला, क्रीडा क्षेत्र असो किंव्हा सरकारी कारभार प्रत्येक क्षेत्रातील कामात पारदर्शकता आणणं गरजेचं आहे.जर प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवर भ्रष्टाचार विरोधी लढ्यात खारीचा वाटा उचलला तर नक्कीच भ्रष्टाचाराला आळा बसेल.त्यासाठी तरुण मंडळीने एकत्र यायला हवं ही काळाची गरज आहे. तरुणाईनेच पुढाकार घ्यायला हवा.लेखन - कु. रुणाली राजेंद्र पांचाळ.
जोगेश्वरी (पूर्व)
मुंबई.


〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️