सत्ता असो वा नसो, मतदारसंघाच्या विकासासाठी कधीही कमी पडलो नाही: सत्यजितसिंह पाटणकर

 

पाटण/ लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड)

 सत्ता असो वा नसो पाटण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कधीही कमी पडलो नाही. सतत पाटण मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी, जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी धडपडत राहीलो, असे पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर गुजरवाडी येथील विकास कामांच्या भुमिपुजन समारंभामध्ये बोलताना म्हणाले.           यावेळी माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर, सौ. उज्ज्वला लोहार, सुभाषराव पवार, दिनकरराव घाडगे, अविनाश घाडगे,  हिंदुराव सुतार, सरपंच शंकरराव घाडगे, विलासराव घाडगे,  राजाराम मोळावडे, सर्जेराव घाडगे, संदीप लोहार व ग्रामस्थ उपस्थित होते.



        यावेळी पुढे बोलताना पाटणकर म्हणाले, गेली ७-८ वर्षे आपल्याकडे आमदारकी नसली तरी मी घरात बसून किंवा पाटण तालुका सोडून बाहेर जाऊन मुक्काम ठोकलेला नाही. पराभवाने खचून न जाता ग्रामपंचायती, नगरपंचायत पासून अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सत्ता खेचून आणल्या. आदरणीय माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर दादांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून मतदारसंघातील तळागाळातील लोकांसाठी विकासकामे आणली. डोंगराळ भागातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. आमदारकी नसल्याने, मोठ्या प्रमाणावर विकास कामे  आणण्यासाठी मर्यादा येत असतानाही नेटाने लढून आदरणीय पवार साहेब, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार , माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून जेवढ्या जास्त प्रमाणात विकास कामे आणता  येतील तेवढी आणली. पण आमच्या विरोधकांना हे आवडलं नाही. त्यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितले, अजितदादा आमच्या विरोधकांना जास्त विकास कामे, जास्त निधी देतात. वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारमुळे पाटण तालुक्यातील जनतेचा चारही बाजुंनी चौफेर विकास व्हायला पाहिजे होता.  पण तसं  घडलं नाही. विरोधकांच्या माध्यमातून का होईना आपल्याच मतदारसंघाचा विकास होतोय, जनतेच्या समस्या सुटत आहेत हे पाहून आमच्या मा. मंत्री महोदयांनी खुष व्हायला पाहिजे होतं पण नेमकं याच्या उलटं झाले. ज्या शिवसेना पक्षाने यांना भरभरून दिलं, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः येऊन लाल दिवा दिला, शिवसेना प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री पद दिले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून हे महाशय वेगळे झाले. यांच्या या कटकारस्थानामुळे उद्धव ठाकरेंनी जेव्हा वर्षा बंगला सोडला तेव्हां मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असतानाही मला प्रचंड वाईट वाटले. मग निष्ठावंत शिवसैनिकांची काय अवस्था झाली असेल हे देवच जाणे.आत्ता जरी महाविकास आघाडी सरकार नसले तरीही यापुढे पाटण तालुक्यातील जनतेसाठी दुप्पट ताकदीने काम करणार असेही ते यावेळी म्हणाले. 

           शेवटी बोलताना पाटणकर म्हणाले,  गुजरवाडी गावातील गावकऱ्यांनी जशी दादांना मोठ्या निष्ठेने साथ दिली तसेच ते आज माझ्याही पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. हीच माझी ताकद आहे. ५० खोके मिळवण्याऱ्यांना पैसा मिळवूद्या पण मला माझ्या जनतेचे प्रेम मिळवायचं आहे, माझ्या जनतेचा विकास साधायचा आहे. येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे. पाटण मतदारसंघातील जनतेला आता विकास हवा आहे. अशीच तुमची साथ राहुदे हा सत्यजितसिंह पाटणकर फक्त तुमच्या विकासासाठी लढणार, खोके देणाऱ्यांच्या मागे कधीही नाही पळणार. असा विश्वासही त्यांनी यावेळी जनतेला दिला‌.