रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोगाचे १०२ रुग्ण तर ९ कुष्ठ रोगी सापडले

 

रत्नागिरी/ लोकनिर्माण( सुनील जठार)

रत्नागिरी जिल्हा  आरोग्य विभागाने १३ सप्टेंबरपासून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत सुरु केलेल्या कुष्ठ व क्षयरोग शोध मोहिमेमध्ये आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील ८ लाख ३० हजार ३०६ लोकांची तपासणी केली आहे.त्यामध्ये जिल्हाभरात क्षयरोगाचे १०२ रुग्ण तर ९ कुष्ठ रोगी सापडले आहेत.

आरोग्य विभागाकडून कुष्ठ व क्षयरोग शोध मोहीम १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १,२६९ आरोग्य पथकांमध्ये २,५९६ कर्मचारी आणि २६२ सुपरवायझर काम करत आहेत . यामध्ये जिल्ह्यातील सुमारे १६ लाख २६ हजार ९२४ लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य पथकांकडून त्यापैकी जिल्ह्यातील ८ लाख ३० हजार ३०६ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे सर्वेक्षण केले जात आहे.