दिवसभरातील महत्वाच्या ताज्या घडामोडी (रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, खेड, दापोली आणि पनवेल करिता)

 अपंगांचा कक्ष लवकरच कार्यान्वित


रत्नागिरी /सुनील जठार



      जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपंगांचा कक्ष लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती न.प. सभापती सोहेल मुकादम यांनी दिली. लॉकडाऊनच्या कालावधीत गर्दी होणारी ठिकाणे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. त्यात सिव्हिलमधील अपंग कक्षाचादेखील समावेश होता. अपंगांची गैरसोय दूर व्हावी याकरिता सदरचा कक्ष लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी सभापती सोहेल मुकादम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे केली होती. तसेच त्यासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली. अपंगांच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण थांबले असून त्यांची वैद्यकीय तपासणी अद्यापही सुरू झालेली नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून आठवड्यातील ठरलेल्या दिवशी प्रत्येकी २५ अपंगांना बोलावून त्यांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित अपंगानी सिव्हिलच्या कक्षात आपल्या नावांची नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी सोेहेल मुकादम ९७३०२२८९९९, सादिक नाकाडे ८३२९५३४९७९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


                   ★★★


महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा-
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरें
पनवेल/संपत सुवर्णा 
महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे, शिवसैनिकांनो सज्ज व्हा, अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आवाहन केलं आहे. काल रात्री  जिल्हाप्रमुख आणि उद्धव ठाकरेंमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यात थोड्या अडचणी आहेत पण त्यावरही आपण मात करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्या जिल्ह्यात विकास कामांवर भर द्यावा, अशा सूचना देखील ठाकरेंनी केल्या असल्याची माहिती आहे.


              ★★★
महाविकास आघाडीच्या तक्रारींची सुनावणी सुरू असताना चिपळूणच्या नगराध्यक्षांची उच्च न्यायालयात धाव
देवरुख /संदीप गुडेेकर



      चिपळूण नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी गेल्या साडेतीन वर्षात अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामे केली असून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असे आरोप करीत महाविकास आघाडीने जिल्हाधिकार्‍यांकडे बेकायदेशीरपणे केलेल्या १९ विकासकामांबाबतचे पुरावे सादर केल्याने व त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सादर केल्याने नगराध्यक्षा खेराडे यांनी आपला मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकार्‍यांकडे त्यांची सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करण्यासाठी त्यांनी धाव घेतल्याने आता नगराध्यक्षांनी आपल्या बचावासाठी पुरेपूर काळजी घेतली आहे. आता न्यायालयाच्या निर्णयावरच नगराध्यक्षांचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा सुरू आहे.


                ★★★


 विज कामगार  पोलवरुन कोसळला, कामगार सुदैवाने बचावला
खेड/लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)


    खेड शहरातील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राजवळ माळी नामक वीज कामगार काम करताना सर्व्हिस वायर तुटल्याने विजेच्या पोलवरून कोसळला. मात्र तेथील लोखंडी गेटच्या आधारामुळे पोल अडकला व कामगार बचावला.
मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राजवळ विजेच्या तारा दुरूस्त आणि तांत्रिक दोष दूर करण्यासाठी महावितरण कंपनीच्या खेड कार्यालयातील वीज कामगार विजेच्या पोलवर चढला होता. हा पोल तळाशी गंजलेला होता. सर्व्हिस वायर तुटल्याने पोल कलंडला. त्याला लोखंडी गेटचा आधार मिळाल्याने कामगाराने उडी मारून आपला जीव वाचवला. 
                    ★★★
 चिपळूण शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकाच्या मागे अवैधरित्या सुरू असणार्‍या मटका अड्ड्यावर छापा
 चिपळूण /लोकनिर्माण (ओंकार रेळेकर )


 


चिपळूण शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकाच्या मागे अवैधरित्या सुरू असणार्‍या मटका अड्ड्यावर मंगळवारी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १ हजार ९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोबरच एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश अनंत खळे (५०, खेंड कांगणेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. एल. चव्हाण यांनी याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली. खळे हा लोकांकडून पैसे स्विकारून कल्याण नावाचा मटका चालवित असल्याची माहिती चिपळूण पोलिसांनी दिली.
                      ★★★
 दापोली तालुक्यातील सोवेली गावात २६ वर्षीय महिलेने दोन लहान मुलांसह केली आत्महत्या
दापोली/ लोकनिर्माण (विशाल मोरे)
दापोली तालुक्यातील सोवेली गावात  सिद्धी ऊर्फ माधुरी प्रथमेश लाड  या २६ वर्षीय महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह  आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.  माधुरी हिने आपली दोन मुले प्रणित (३),स्मित( २). यांच्यासह सोवेली चव्हाण वाडीत एका विहिरीत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.