‘आमच्या संयमाचा अंत पाहू नका’ कोकण रेल्वे, आता तरी शहाणे व्हा! - संदेश जिमन

             


       निसर्गाचं अलोट वरदान लाभलेलं कोकण म्हणजे परशुराम भूमी. सृष्टीसौंदर्याचा अनमोल ठेवा असणारं कोकणचं वैभव तिथला निसर्ग आणि तिथली साधीभोळी माणसं यामुळे ओळखलं जातं. हे वैभव द्विगुणित करण्यासाठी तिथं आधुनिक काळाशी सुसंगत अशी प्रगती व्हावी, यासाठी कित्येकांनी आपले आयुष्य वेचले. अजूनही अनेकजण आपला कोकण प्रांत केवळ राज्यातच नव्हे तर देशातही नावलौकिक मिळवून कोकणी माणसाला ललामभूत ठरेल, अशा प्रकारे काम करत आहेत. त्यात महत्त्वाचा वाटा आहे तो दळणवळण साधनांचा. वाहतुकीची साधनं, रस्ते, वाहनमार्ग, सवलती, सुविधा यांची कोकणवासीयांनी कायमची आस लागलेली असते. विकासाच्या दृष्टीनं कामंही होत आहेत. पण ज्या वेगानं राज्यात इतर भागात प्रगतीचे वारे वेगाने वाहताहेत, त्या वेगाला कोकण मात्र मुकला आहे. कुठेतरी हा वेग आपल्या भागासाठीही कारणीभूत ठरावा, अशी त्या भोळ्याभाबड्या कोकणी माणसानं अपेक्षा केली तर त्यात वावगं काय? कोकणच्या निसर्गावर, तिथल्या तीर्थस्थळांवर, तिथल्या गडकिल्ल्यांवर, तिथल्या वाडी-माडींवर, तिथल्या समुद्रावर, किनार्‍यांवर, पर्यटनस्थळांवर, देवस्थानांवर, भटकंतीवर, माडा-झाडांवर, सण-उत्सवांवर, रुढी-परंपरांवर, श्रद्धा-अंधश्रद्धांवर, तिथल्या फळा-फुलांवर, खाद्यपदार्थांवर... इतकंच काय, भाऊबंदकीवरही आजवर भरभरून बोललं गेलं, लिहिलं गेलं. आंबे, काजू, फणस, नारळ यांचं तर हे नंदनवनच. समाजमाध्यमांतून तर कोकण हा परवलीचा शब्द असल्यासारखा कितीतरी व्हिडिओज् आणि शॉर्ट फिल्मस् मारा होताना दिसतो. प्रश्न काय आहे, याचा नाही तर काय नाही याचा आहे. आणि काय नाही यात प्रामुख्याने मुद्दा येतो तो रेल्वे प्रवासाचा. कोकण रेल्वे ही आपल्या सुविधेसाठी उभारलेली यंत्रणा आहे, आणि आपल्याला त्या यंत्रणेचा लाभ अतिशय विनासायास मिळणार आहे, ही कोकणी प्रवाशांची अपेक्षा दिवसेंदिवस कष्टप्रद होताना दिसते आहे. याला कारण आहे तो कोकण रेल्वे प्रशासनाचा दुजाभाव. महाराष्ट्रातल्या कोकणासाठी अस्तित्वात आलेली ही कोकण रेल्वे आता कोकणवासीयांशीच सवतासुभा करत असल्याचं दिसतं. ज्या रेल्वे यंत्रणेच्या नावात कोकण आहे, पण महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातल्या प्रवाशांना त्याचा म्हणावा तसा लाभ होत नाही, हे दुर्दैव आहे.
      कोकण रेल्वे म्हटले की सर्वात आधी नाव येतं आदरणीय मधु दंडवते यांचं. कोकण रेल्वे व्हावी यासाठी अथक झटणारे मधु दंडवते हे खर्‍या अर्थाने कोकण रेल्वेचे शिल्पकार. त्याचप्रमाणे जॉर्ज फर्नांडिस यांचेही श्रेय मोलाचे होते. कोकणवासीयांना स्वस्त, मस्त, कमी खर्चात, सुरक्षित, आरामात, सहजपणे गावी नेणारी रेल्वे यंत्रणा उभारावी, हे स्वप्न त्यांनी पाहिले. ते अस्तित्वात आले. अर्थात, शेकडो इंजिनीअर, हजारो कामगार, अधिकारी, लोकप्रतिनिधी, रेल्वे मार्गासाठी आपल्या जमिनी देणारे गावकरी सगळ्यांचेच श्रेय मोलाचे आहे. त्यात वादच नाही. त्यांचे ऋण महाराष्ट्रावर आणि कोकण रेल्वे प्रवाशांवर आहेत. दुर्दम्य इच्छाशक्ती, नैसर्गिक आणि भौगोलिक संकटांवर मात करत प्रचंड आत्मविश्वासानं सर्वसामान्यांसाठी कोकण रेल्वे मार्ग बांधला गेला. या मार्गावरून सुरू झालेली कोकण रेल्वे ही जागतिक पातळीवर नावाजली गेलेली ठरली. अर्थात, आता तो इतिहास झाला. त्या इतिहासाच्या पाऊलखुणांवर आधारीत पुढची पावलं टाकली गेली असती तर कोकण रेल्वेला सोन्याचे दिवस आले असते, असे आज म्हणावे लागत आहे. कारण, जो कोकणातला माणूस या कोकण रेल्वेला आपली मानतो, त्याच कोकण रेल्वेने कोकणी माणसाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. म्हणूनच, या सर्वसामान्य कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या शब्दरूपानं मांडण्याचा लहानसा प्रयत्न करतो आहे.
    रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असणारी कोकण रेल्वे प्रवाशांची संख्या लाखाच्या गणतीत आहे. सणासुदीला आणि एप्रिल-मे महिन्याच्या शाळांच्या सुट्टीत तर लाखो कोकणी माणसं आपल्या घराकडे-गावाकडे जातात. शिवाय कामानिमित्त सतत ये-जा करणार्‍यांची संख्याही कमी नाही. एरव्ही दिवाळी, गणपती, शिमगा आणि मे महिन्यातच असणारी कोकण रेल्वेची प्रवाशांची गर्दी तर आता बाराही महिने असते. पण त्या तुलनेत गाड्यांची कमतरता आहे. शिवाय आहेत त्या गाड्या मोजक्याच स्थानकांवर थांबे घेतात. गाड्यांच्या वेळाही अडीनडीच्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेत सतत लोंबकळत, गर्दीत कोंबाकोंबी करत, जीव मुठीत धरून प्रवास करणारा कोकणी माणूस मुंबईची लोकल ट्रेन परवडली, असं म्हणतो ते उगीच नाही. या गर्दीपायी कित्येकांचे अपघातात बळी गेले आहेत. त्याबद्दल कोकण रेल्वे प्रशासनाला काही देणे-घेणे नाही. प्रवाशांच्या सुविधेकडे कानाडोळा करणे हा दुटप्पीपणा सर्रास चालला आहे. त्याला आवर घालायची वेळ आली आहे.
आता तर चार महिने आधीपासून बुकिंग मिळते. पण ते लगेच फुल्ल होते. होळी, गणपती आणि एप्रिल-मे महिन्याची सुट्टी या कालावधीत कोकण रेल्वे ही हक्काची असली तरी तीच दुजाभाव करून आपल्या प्रवाशांवर अन्याय करते. पुरेश्या गाड्या नसल्याने लोकं वेटिंगमध्ये आशेवर ताटकळत राहतात. तिकडे यूपी, बिहारसाठी कित्येक गाड्या वारंवार सोडल्या जातात. त्यातून लाखो परप्रांतीय महाराष्ट्रात-मुंबईत येतात. तिथून राज्यभर हात-पाय पसरण्यासाठी सर्रास फिरत राहतात. पण या राज्यातला भूमिपुत्र मात्र आपल्या गावी जाण्यासाठी भिकार्‍यासारखा वाट बघत राहतो. पैसे मोजूनही त्याला सीट मिळत नाही. कुटुंबकबिला घेऊन गावी जाणार्‍यांचे तर हालच हाल होतात. याला जबाबदार कोण?
कोकण रेल्वे मार्गावर ज्या पॅसेंजर गाड्या आहेत, त्यांना एक्सप्रेसचा दर्जा देऊन प्रवाशांना आर्थिक भुर्दंड देण्याचा मनसुबा अतिशय चुकीचा आहे. रेल्वे प्रशासन हा खेळ का खेळत आहे, याचे कारण सापडत नाही. रत्नागिरी-दादर, मडगाव-रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी, सावंतवाडी-दिवा या गाड्या पॅसेंजर असल्यामुळे सर्वसामान्यांना परवडतात. कमी खर्चात कोकणी माणूस आपल्या गावी जाऊ शकतो किंवा गावाहून मुंबईला येऊ शकतो. शिवाय या गाड्या प्रत्येक स्थानकात थांबा घेतात, त्यामुळे सर्वच ठिकाणच्या प्रवाशांची सोय होत असते. पण आता कोकण रेल्वे प्रशासन कोकणातील ग्रामीण जनतेच्या असुविधेसाठीच या गाड्या एक्सप्रेस करण्याचा घाट घालते आहे, हे निषेधार्य आहे. रत्नागिरी-मडगाव (50101), मडगाव-रत्नागिरी (50102), दिवा-सावंतवाडी (50105) आणि सावंतवाडी-दिवा (50106) या पॅसेजरगाड्या प्रामुख्याने एक्सप्रेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला समस्त कोकण रेल्वे प्रवाशांचा कडाडून विरोध आहे. प्रवासी संघटना तर सातत्याने प्रवाशांच्या बाजूने लढत आहे. या प्रयत्नांना कोकण रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे.
      या मार्गावर कोकणी लोकांसाठी जास्त गाड्या का सोडल्या जात नाहीत? पुणे, विदर्भ या भागात जाणार्‍यांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वे मुबलक गाड्या उपलब्ध करून देते आहे. त्याचप्रमाणे कोकणासाठी गाड्या का नसाव्यात? सतत गोवा, केरळ आणि दक्षिण भारतात जाणार्‍या गाड्यांतील प्रवाशांसाठीच ही कोकण रेल्वे निर्माण झाली आहे का, असा प्रश्न विचारावासा वाटतो. रायगड, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्रवाशांनी काय पाप केलं आहे? त्यांच्यावर का अन्याय होतो सारखा-सारखा? कोकणी माणसाच्या प्रवासाबद्दलच्या अडचणी का समजून घेतल्या जात नाहीत? या अन्यायाविरोधात आवाज उठविणार्‍यांचा आवाज दाबला जातो किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या मागण्या सतत धुडकावल्या जातात. त्यांचा पत्रव्यवहार केराच्या टोपलीत पडतो. त्यांचे अर्ज, विनंत्या यांना फेकून दिले जाते. त्यामागे काय राजकारण आहे? या प्रश्नांची उत्तरं आता कोकण रेल्वे प्रशासनानं दिली पाहिजेत.
बाराही महिने कोकणात प्रवाशांनी खचाखच भरलेली तुतारी एक्सप्रेस ही गाडी आता मडगावला नेण्याचा-तिथून सोडण्याचा मूर्खासारखा निर्णय घेतला गेला. त्यात काय लॉजिक आहे, ते कळत नाही. या गाडीला कोकणात जास्त प्रवासी नाहीत, असं तकलादू आणि फालतू कारण सांगितलं गेलं. वास्तविक, ही गाडी कोकणाची असल्यामुळे इथल्या स्थानिकांना सोयीची आहे. पण ती गोव्याला नेण्याचा आणि तिथून फुल्ल करून आणण्याचा खटाटोप कशासाठी? गोवा साठी वेगळ्या गाड्या आहेतच. मग त्यांना आणखी ही गाडी कशाला? बरं, हा निर्णय झाल्यानंतर कोकणी माणसाला विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचा मोठेपणा दाखवावा की नाही? पण तो ही नाही. म्हणजे आपल्या नियमित प्रवाशांवर अन्याय करायचा आणि दुसर्‍या राज्यातील प्रवाशांना त्यांनी न मागता सुविधा द्यायच्या, हा कसा आतबट्ट्याचा कारभार आहे? याचीच समस्त कोकणवासीयांनी चीड आहे. यासाठी आता आंदोलने, रेल रोको, जाळपोळ अशी हिंसक मार्गाने प्रतििाया उमटणे कोकण रेल्वेला अपेक्षित आहे का?
करोनाच्या काळात उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांसाठी भारतीय रेल्वेने ज्या तातडीनं गाड्या सोडल्या, त्याच तत्परतेने कोकणच्या लोकांसाठी का सुविधा उपलब्ध करून दिली नाही? ई-पास, चेकिंग, नियम-अटी-कायदे-आदेश हे सगळे कोकणच्या लोकांसाठी लादले गेले. तेही कोकणी लोकांनी सहन केले. जागतिक महामारीचे संकट सगळ्यांनाच त्रासदायक  होते. त्यामुळे एप्रिल-मे महिन्याची सुट्टी, गणेशोत्सव या काळात कोकणी माणूस शांत बसला. त्यानं आततायीपणा दाखवला नाही. उर्मटपणा दाखवला नाही. तो संयमी आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याच्यावर तुम्ही अन्यायच करत राहाल. ज्या कोकणी माणसाच्या जिवावर कोकण रेल्वे प्रशासन कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवते, त्यांना मात्र वाळीत टाकल्यासारखं वागवलं गेले. लहान मुलं असो, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक असोत, कोकणची ओढ प्रत्येकाला असते. त्यांना प्रवास सुकर व्हावा, यासाठी विशेष गाड्यांची संख्या वाढवावी, आहेत त्या गाड्या नियमित चालवाव्यात, सातत्याने मागणी होत असलेल्या स्थानकांवर गाड्यांना थांबे मिळावेत, बाहेरगावच्या एक्सप्रेस गाड्यांना पास करण्यासाठी कोकण रेल्वेच्या गाड्या कुठेतरी तास-दीड तास विनाकारण उभ्या करून न ठेवणे अशा मागण्या सातत्याने होत आहेत. पण त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. परप्रांतीयांना स्थानिकांच्या उरावर बसवण्यासाठी भारतीय रेल्वे आणि आता कोकण रेल्वे जणू काही सज्ज झाल्याचे दिसते. बाहेरगावच्या गाड्या कशा सुसाट वेगाने पळतात. त्यांना महाराष्ट्रात कुठे अर्धा-एक-दीड तास थांबवले जात नाही. मात्र कोकण रेल्वे सतत मरगळलेल्या अवस्थेत कुठेतरी उभी राहते, तासनतास.
     कोविड काळात ज्या स्पेशल गाड्या सोडल्या त्या तर निर्धारित वेळेआधीच स्थानकांवर पोहोचून अर्धा-पाऊण तास उभ्या ठेवण्यात आल्या. त्यापेक्षा त्या सगळ्याच स्थानकांवर थांबवल्या असत्या तर सर्वच स्थानी जाणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळाला असता. पण हे शहाणपण कोकण रेल्वेला समजलं नाही, समजत नाही. दिवा, दादर-रत्नागिरी, मांडवी, तुतारी या गाड्यांचे दोन-तीस तास अतिजलद गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्याच्या नादात वाया जातात. तो प्रकार आतातरी थांबवला पाहिजे. गणेशोत्सव काळात ज्या गाड्या कोकण रेल्वेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या, त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी कोकण रेल्वे मात्र उदासीन आहे.
     आता अनलॉकची प्रक्रिया  वेगाने सुरू झाली आहे. सगळीकडे बर्‍यापैकी स्थिरस्थावर होत आहे. अशावेळी पर्यटक कोकणाकडे पुन्हा वळलेले दिसतात. एसटी, खासगी वाहने, आरामबसेस सुरू झाल्या आहेत. शिवाय हॉटेल, रिसॉर्टस्, समुद्र किनारे, पर्यटनस्थळं सुरू झालेली आहेत. जगण्याला वेग येत चालला आहे. गेले सात-आठ महिने ठप्प झालेला व्यवसाय-उद्योग पुन्हा श्वास घेत उभारी घेत आहे. कोकणातली आपली घरं, शेती, माणसं, गाव, तिथला निसर्ग, झाडं, माडी, वाडी याकडे आता पुन्हा कोकणी माणसाची पावलं वळताना दिसताहेत. अशा उत्साहाच्या वातावरणात कोकण रेल्वे मात्र उदासीन आहे. जणू अजून कोकण रेल्वे आजारी माणसासारखी रुग्णशय्येवर झोपलेली आहे, असा संशय येतो.
तेव्हा कृपा करा. जागे व्हा. कोकणात आता पुन्हा नव्या दमानं उद्योग-व्यवसायाचा जम बसतोय. पर्यटन वाढत आहे. अशावेळी कोकणात जाणार्‍यांसाठी कोकण रेल्वेने पुरेशी काळजी घ्यावी, नव्या गाड्यांची आखणी करावी, पुरेसे थांबे द्यावेत, अडचणी दूर कराव्यात, मुख्य म्हणजे कोकणी माणसाची पिळवणूक थांबवावी. कोकणी माणसाच्या सहनशीलतेच अंत पाहण्याची सीमा आता संपली आहे. शहाणे व्हा आणि आपल्या माणसांसाठी सुरू झालेली आपली गाडी पुन्हा आपल्या माणसांच्याच सेवेसाठी सज्ज करा. ही आपली माणसं कोकणची आहेत. प्रेमळ आहेत, शांत आहेत, संयमी आहेत. पण त्यांच्या संयमाचा कडेलोट झाला की हीच माणसं कुठलं रूप धारण करतील, त्याचा कोकण रेल्वे प्रशासनाला अंदाज नाही. ते रूप काय असेल, ते सांगायला लावू नका. तूर्तास इतका इशारा पुरेसा आहे. बस्स!