खेड तालुक्यातील सुमारगडाच्या संवर्धनाचे काम लवकरच हाती घेणार- आमदार योगेश कदम

                  
                     
खेड /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे)


       शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुमारगडाची डागडुजी करणे, गडाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत आणणे ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी असून याच भावनेतून  गडाच्या सवर्धनाचे काम करण्याचा आपला प्रयत्न राहील अशी माहिती खेड-दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी दिली. 
      याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, खेड तालुका हा गड-किल्ल्यांचा तालुका आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गड-किल्ले म्हणजे खेड तालुक्याचे वैभव मानले जाते. गेल्या काही वर्षात गड-किल्लांची डागडुजी न झाल्याने सुमारगड, महिपतगड, पालगड, या किल्ल्यांची पडझड झाली आहे. गडाकडे जाणारे रस्ते सुस्थितीत राहिलेले नाहीत.गडावर जाणाऱ्या वाटाच बंद झाल्याने शिवप्रेमींना गडावर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे गडांकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता गडांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.
      गडांकडे जाणाऱ्या रस्ते एकदा का सुस्थितीत आले की गडांवर जाणाऱ्या शिवप्रेमींची संख्यावाढेल आणि आपोआपच शिवरायांच्या अफाट पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची निगा राखली जाईल. तालुक्यातील सुमारगडाचे सवर्धन करणे हे माझे लोकप्रतिनिधी या नात्याने कर्तव्य आहे आणि ते बजावण्यात मी कुठेही कमी पडणार नाही. सुमारगडाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत आणण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरु झाले असून हा निधी उपलब्ध होताच रस्त्याच्या कामाला सुरवात केली जाईल असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले.