संरक्षित जंगलामध्ये होत असलेल्या वृक्षतोडीमुळे कोकणातील वनसंपदा धोक्यात* रत्नागिरी जिल्ह्यातील वनसंपदेकडे वनखात्याचे दुर्लक्ष!

 


खेड पोलिसांनी जप्त केलेला खैर रायगड जिल्ह्यातील संरक्षित जंगलातील

खेड /लोकनिर्माण ( प्रमोद आंब्रे)


 


          दोन दिवसांपुर्वी खेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त लाखो रुपयांचा खैर हा रायगड जिल्ह्यातील संरक्षित जागेतून कत्तल केलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कत्तल अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाली असल्याचा आरोप होत असल्याने हा प्रकार म्हणजे कुंपनानेच शेत खाण्यासारखा आहे. वनराजीचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे तेच अधिकारी केवळ पैशासाठी संरक्षित जंगलातील खैरांच्या बेसुमार कत्तलीकडे दुर्लक्ष करत आहेत हे निश्चितच दुर्दैवी आहे.
      कोकण हा निसर्गसमृद्ध प्रदेश आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात विपुल वनसंपदा आहे. मात्र काही समाजकंटक स्वत:ची तुंबडी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात खैर, साग, ऐन, शिवण, किंजळ, जांभूळ यासारख्या झाडांची कत्तल करून जंगले उजाड करत आहेत. कोकणच्या या समृद्ध ठेव्याचे रक्षण व्हावे यासाठी शासनाचे वनखाते कार्यरत आहे. वनराईचे रक्षण करण्याची जबाबदारी वनाधिकारी, वनपाल यासारख्या अधिकाऱ्यांवर आहे. मात्र इथे ज्यांच्यावर जंगलांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच अधिकारी जंगले उजाड करणाऱ्या समाजकंटकांशी हात मिळवणी करून आपले उकल पांढरे करत आहेत. दोन दिवसापुर्वी तुळशी विन्हेरे मार्गे चिपळूण कडे जाणारा ट्रक भरणे नाका येथे गस्तीवर असलेल्या खेड पोलिसांनी अडवला. या ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये लाखो रुपये किमतीचे खैराचे लाकूड असल्याचे निदर्शनास आले. चौकशी दरम्यान हे लाकूड मंडणगड तालुक्यातील अरविंद काते, विजय काते, विनोद काते आणि संदेश भिसे यांच्या  मालकीचे असून ते चिपळूण येथील कात कारखान्यावर नेले जात होते. 
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात येणाऱ्या निगडे, बिरवाडी, किन्हेरे, रेवतळे, भोमजाई, शिवथर, कर्कोझर, नेराव, या गावांच्या परिसरात असलेल्या जंगलात खैरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून या जंगलात तोडलेल्या खैरांची साल काढून हे लाकूड तुळशी विहेरे मार्गे चिपळूण येथील कात कारखान्यावर नेले जाते. वनखात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गेली अनेक वर्षे हा गोरखधंदा सुरुच आहेत. घनदाट जंगलातील औषधी वनस्पतींसह खैर,साग, शिसव, आपटा, हिरडा, जांभुळ, ऐन, किंजळ, मोहा, नाना, पायर, सातविन, करंज, शिंदी या प्रकारच्या झाडांची कत्तल करून हे समाजकंटक गब्बर झाले आहेत. 
         रायगड जिल्ह्यातून खैर घेऊन निघालेला ट्रक रायगडच्या हद्दीतून रत्नागिरीच्या हद्दीत येताना रायगडच्या वनअधिकाऱ्यांना किंवा रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांना का दिसत नाही, की दिसूनही दुर्लक्ष केले जाते हा संशोधनाचा विषय आहे. लाकुडतोड करणारे समाजकंटक या संदर्भात आवश्यक ती खबरदारी घेत असावेत त्यामुळेच तो वनअधिकारी किंवा पोलिसांना दिसत नसावा असा तर्क लावायला हरकत नाही. खेड पोलिसांनी भरणे नाका येथे हा ट्रक पकडला नसता तर बिनबोभाटपणे हा व्यवसाय अविरतपणे सुरुच राहिला असता. या पुढे तो सुरु राहणार नाही असे सांगता येत नाही. त्यामुळे वनखात्याने यामध्ये लक्ष घालून कोकणातील वनसपदा मूठभर समाजकंटकांची तुंबडी भरण्यासाठी नष्ट होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्यावरणप्रेमी संस्थांकडून होत आहे.