आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीची आरोग्य संचालकांमार्फत चौकशी करा - विक्रांत जाधव

 


देवरुख /संदीप गुडेकर


      कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना पहिल्या टप्प्यात जिल्हा रूग्णालयाकडून वाटप करण्यात आलेल्या आर्सेनिक अल्बम गोळ्या रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात तयार करण्यात आल्या होत्या. गोळ्या तयार करण्याचा परवाना नसताना गोळ्या तयार करुन त्याची वाढीव दराने खरेदी करण्यात आली आहे. संबंधित प्रकाराची आरोग्य संचालकांमार्फत चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव यांनी स्थायी समितीत केली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक गुरूवारी झाली. कोरोना कालावधीत प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू होते. एप्रिलनंतर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली होती. त्याचवेळी जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करण्याचा निर्णय झाला. त्या गोळ्या तयार करण्याचे काम कोणत्याही अधिकृत कंपनीला देण्यात आले नाही. त्या जिल्हा शासकीय रूग्णालयातच बनविण्यात आल्या होत्या, असा आरोप विक्रांत जाधव यांनी केला.
जिल्हा रूग्णालयातील औषध निर्माण विभागाकडून एका वैद्यकीय अधिकार्‍याच्या देखरेखीखाली गोळ्या बनविण्यात आल्या. संबंधित डॉक्टरना अशा प्रकारे गोळ्या बनविण्याचा कोणताही अधिकार नाही. ते डॉक्टर रूग्णाला तपासून गोळ्या देऊ शकतात. परंतु अशा प्रकारे विक्रीसाठी करू शकत नाहीत. त्या गोळ्यांच्या बॉटल्सवर एक्स्पायरी तारीख, बॅच नंबर, परवाना नंबर अशी कोणतीही माहिती दिलेली नव्हती. तसेच त्यांच्याकडे अशा गोळ्या तयार करण्याचा परवानाही नव्हता. औषध खरेदीचे कोटेशन बनवून न घेताच तज्ञ कंपनीला काम दिलेले नाही. तसेच गोळ्यांचे दरही अवाच्या सव्वा लावण्यात आले आहेत. असे मुद्दे विक्रांत जाधव यांनी मांडले.